कोल्हापूरात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी पडझड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

कोल्हापूर - वादळी वारे, गारांसह जिल्ह्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी चारनंतर जोरदार पाऊस झाला. काही भागात तर गारांचे सडेच्या सडे पडले. दरम्यान, वळवाच्या या सरींनी महाद्वार रोड, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीसह प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यावर काही काळ तारांबळ उडाली.

कोल्हापूर - वादळी वारे, गारांसह जिल्ह्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी चारनंतर जोरदार पाऊस झाला. काही भागात तर गारांचे सडेच्या सडे पडले. दरम्यान, वळवाच्या या सरींनी महाद्वार रोड, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीसह प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यावर काही काळ तारांबळ उडाली.

काल रात्री पावसाने तडाखा दिला; पण अर्ध्या-पाऊण तासानंतर पूर्णपणे उघडला. आज सकाळपासून मात्र पुन्हा उष्मा जाणवू लागला. दुपारी तीनपर्यंत उन्हाच्या झळा तीव्र होत्या. त्यानंतर मात्र ढग दाटून आले आणि गार हवाही सुटली. सायंकाळी मात्र वादळी वाऱ्याने घरांचे छत, होर्ल्डिंग्ज उडून गेली. काही ठिकाणी झाडेही कोसळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील विविध ठिकाणी सुमारे तासभर जोरदार पाऊस सुरू राहिला. त्यानंतर तो पूर्णपणे उघडला. या पावसाने काही ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाला. पावसाने उघडीप दिल्यानंतर विद्युतपुरवठा सुरळीत झाला.

भोगावती-राधानगरी वाहतूक विस्कळीत
शाहूनगर ः कौलव व घोटवडे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भोगावती-राधानगरी रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वादळाने अनेक घरांवरील पत्रे व कौले उडून गेली. 

मिणचे खोऱ्यात धुमाकूळ
कोनवडे : भुदरगड तालुक्‍यातील मिणचे खोरा, हेडवडे, कूर, कोनवडे परिसरात गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. म्हसवे येथे वादळी पावसामुळे वीज खांब कोसळले. मोरेवाडीत घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. मोरेवाडी येथील संजय पाटील यांच्या घरावरील पत्रे उडाल्यामुळे दोन लाखांचे नुकसान झाले. शुभम धोंडिराम कांबळे व पवन धोंडिराम कांबळे यांच्या घराचे पत्रे उडून पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल कोसळला.

ऊस पीक भुईसपाट
असळज ः परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस झाला. असळज परिसराला जवळपास एक तास झोडपून काढले. विजेमुळे वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. उंच वाढलेल्या आडसाली ऊस पिकाचे वाऱ्यामुळे नुकसान झाले.

खांब कोसळल्याने वीज गेली
भेडसगाव : परिसरातील पाच-सहा गावांत आज दुपारी सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झाला. दुपारी दोनच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणचे विजेचे खांब वाकले तर काही ठिकाणी वीज तारांवर झाडे पडल्याने खांब उन्मळून पडले. शिवारे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प होती. तसेच हारुगडेवाडी येथे वीज तारांवर झाड पडल्याने विजेचे चार खांब कोसळले आहेत.

हलक्‍या सरी
आंबा ः वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह आंबा भागात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. दुपारपासून आंबा, मानोली, चांदोली, निनाई परळे भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत विजांचा कडकडाट होता.

वाहतूक विस्कळीत
सरूड ः सरुड, शिंपे, सवते, कापशी, वाडीचरण परिसरात वळवाच्या पावसाने घरे व जनावरांच्या शेडांचे मोठे नुकसान झाले. दुपारी दोनच्या सुमारास अचानक वादळी पावसासह विजेचा कडकडाट सुरू होऊन शेतकरी वर्गासह येथील वीट व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. वादळी वाऱ्याचा जोर एवढा होता, की अनेक बुजुर्ग व आबाल वृद्धांनी असे वारे कधी पाहिलेच नसल्याचे सांगितले. शिंपे येथे घरावरचे पत्रे व कौले उडून गेली. विजेचे खांबही कोसळले. सरूडमध्येही पन्नास घरावरची कौले उडून गेली. सरूड-बांबवडे, सरूड-कोकरूड, सरूड-सागाव येथे रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

काटेभोगावात छत उडाले
पुनाळ ः परिसरात पावसाने घरांचे, काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले. माजनाळ, काटेभोगाव येथे घरांचे छत उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. माजनाळ (ता. पन्हाळा) येथे बाबूराव पोवार यांच्या घराचे छत उडून गेले. सरदार गुंडू पाटील, दाजी शिवराम पाटील, आनंदा अर्जुना पाटील, महादेव गणपती पाटील व प्राथमिक शाळेच्या इमारतीची कौले उडाली. काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील दीपक भवड, सुरेश पाटील, सुरेश भवड, चांदू पाटील यांच्या घरांचे मिळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वीज खंडित 
हळदी - वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज खंडित झाली. ‘महावितरण’चे मुख्य अभियंता दिवाण व उपअभियंता चौगले यांच्या पथकाने वीज पुरवठा सुरळीत केला.
 

Web Title: Kolhapur News story wind in District