पीक कर्जाच्या परतफेडीवरच प्रोत्साहन अनुदान

निवास चौगले
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  कर्जमाफी योजनेतील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी घेतलेल्या पीक कर्जाचीही परतफेड करावी लागणार आहे. तरच त्यांना या योजनेतील प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या नव्या नियमामुळे प्रामाणिकपणे कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांचीही यादी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त लाभ या योजनेचा मिळणार नाही, अशीच ही व्यवस्था केली आहे. याविरोधात शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. 

राज्य शासनाने जुलै २०१७ मध्ये शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. यानुसार १.५० लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही १५ हजार ते २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे. ३० जुलै २०१६ पर्यंत न भरलेल्या कर्जापैकी दीड लाखाचे कर्ज माफ होणार आहे. दीड लाखापेक्षा कर्ज जास्त असेल तर जास्तीची रक्कम भरल्यानंतरच संबंधितांचे दीड लाखाचे कर्ज माफ होणार आहे.

यासाठीचे निकष, अटी पाहिल्या तर किती शेतकऱ्यांना लाभ होईल, याची कल्पनाही करता येणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना कमीत कमी १५ हजार, तर जास्तीत जास्त २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. 

५ जुलै २०१७ला नवा अध्यादेश काढून या कर्जासाठीही जाचक नियम बनवला आहे. सन २०१५-१६ सालात घेतलेले पीक कर्ज तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी भरावेच लागणार आहे, पण त्याचबरोबर यावर्षी म्हणजे २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाचीही परतफेड ३१ जुलै २०१७ पर्यंत करावी लागणार आहे. यावर्षी कर्ज परत केलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

यावर्षी मार्चनंतर घेतलेल्या कर्ज फेडीसाठी पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंत मुदत आहे. पण हेही कर्ज प्रोत्साहनपर अनुदान मिळायचे असेल तर ते ३१ जुलै २०१७ पूर्वी भरणे आवश्‍यक आहे. हा नवा अध्यादेश असे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवणारा आहे. जुलै २०१७ पूर्वी यावर्षी घेतलेले कर्ज परत न करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. एकीकडे कर्जमाफी केली म्हणून सांगायचे आणि दुसरीकडे त्याचा कोणाला फायदा मिळणार नाही, अशी व्यवस्था करायची असाच हा प्रकार आहे. 

पीक कर्जाचा कालावधी असा 
ऊसासाठी कर्जाचा परतफेडीचा कालावधी १८, खरीप पिकांसाठी तो १३ , तर ज्वारी, बाजरीसाठी तो १२ महिन्याचा आहे. खरीपाचे कर्ज मार्च ते एप्रिल या कालावधीसाठी दिले जाते. १ एप्रिल २०१७ नंतर कर्ज दिले तर त्याची परतफेड पुढील वर्षी ३० जून २०१८ पर्यंत करावी लागते. पण नव्या नियमामुळे हे कर्जही ३१जुलै पूर्वीच भरावे लागणार आहे. 

Web Title: kolhapur news subsidy on crop loan repayment