श्रीमंतापेक्षा गरीब माणसं प्रामाणिक - सुधा मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

कोल्हापूर -‘श्रीमंत माणसांपेक्षा गरीब माणसं प्रामाणिक असतात, याची प्रचिती मी देवदासी पुनर्वसन कार्यातून घेतली. या महिलांनी बॅंकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभारले. कर्ज फेडले. स्वावलंबी बनल्या. त्या तीन हजार महिलांनी एक गोधडी मला भेट दिली. ती गोधडीच मला जगण्याची ऊब व लेखनाची ऊर्जा देते’, असे मत प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी येथे व्यक्त केले. 

येथील मेहता पब्लिकेशन हाऊसतर्फे ‘तीन हजार टाके’, ‘गरुड जन्माची कथा, ‘सर्पाचा सूड’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. या वेळी त्या बोलत होत्या. अनुवादक लीना सोहनी, डॉ. सुनीलकुमार लवटे, अनिलकुमार मेहता उपस्थित होते.
मूर्ती म्हणाल्या, ‘‘सीमा भागात देवदासींच्या पुनर्वसनाचे कार्य सुरू केले. त्या महिलांचाही विश्‍वास नव्हता; पण त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचा माझा हेतू समजल्यावर त्यांचा विरोध मावळला. महिलांच्या पुनर्वसनासाठी बॅंकांकडे कर्ज मिळून देण्यासाठी गेले; मात्र बॅंकांनी कर्ज नाकारले.’’

त्या म्हणाल्या, ‘‘आयुष्यात आपण जन्माला कशासाठी येतो; तर शिक्षण, लग्न, चांगले घर, परदेश दौरा... यांपेक्षा वेगळे काही करायचे ठरविले. मी एक हिऱ्याचा दागिना खरेदी केला, तर तीन कोटी लागतील असा अंदाज बांधला; पण त्या हिऱ्याचा आनंद मलाच होता. त्याऐवजी त्या महिलाच माझ्यासाठी हिरे आहेत असे समजून हिऱ्यांचे दागिने घेण्याऐवजी तेच पैसे बॅंकेला गॅरंटी दिले. तेव्हा देवदासी महिलांना कर्ज मिळाले.’’

देवदासी महिलांनी माझा सत्कार केला. या वेळी काही महिला म्हणाल्या, ‘‘तुमच्यामुळे आमच्या आयुष्याची घडी बसली. त्याप्रति भेट म्हणून आम्ही तीन हजार महिलांनी टाके घालून तयार केलेली गोधडी तुम्हाला भेट देत आहोत.’’ त्या महिलांची कथा सांगणारे ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक घडले, असेही मूर्ती यांनी सांगितले. डॉ. लवटे, लीना सोहनी यांनी मनोगत व्यक्त केले.   

कोल्हापूरशी आत्मीयतेचे नाते 
६०-६५ वर्षांपूर्वी वडील कोल्हापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर होते. माझी बहीण येथे जन्मली. तिचे नाव ‘महालक्ष्मी’ ठेवले. त्यामुळे या भागातील भाषा-संस्कृतीविषयी आत्मीयता आहे. म्हणून मला येथे येण्यास आवडते.’’

Web Title: Kolhapur News Sudha Murti comment