साखरेत क्‍विंटलला ४०० रुपयांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

सांगली - केंद्र सरकारने यंदा किमान साखरेचा भाव प्रतिक्विंटल २,९०० च्या खाली येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यानंतर गेल्या चार दिवसांत साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सांगली - केंद्र सरकारने यंदा किमान साखरेचा भाव प्रतिक्विंटल २,९०० च्या खाली येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यानंतर गेल्या चार दिवसांत साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिक्विंटल २,५५० रुपयांपर्यंत घसरलेले दर २,९६० रुपयांपर्यंत वधारले आहेत. साखरेच्या दरात मोठ्या घसरणीच्या तक्रारीनंतर केंद्र शासनाने विलंबाने निर्णय घेतला. यामुळे कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जाण्याचे वाचतील. पर्यायाने कारखान्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंकांचाही एनपीए वाढण्याची भीती कमी होत आहे.  

केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी ८,५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा ६ जूनला केली आहे. यातून केवळ २,५४० कोटी रुपये शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, इतर देणी दिली जाणार आहेत. केंद्र शासनाने यंदा किमान साखरेचा भाव प्रतिक्विंटल २,९०० च्या खाली येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे गेल्या चार दिवसांत साखरेच्या दरात वाढ होत असल्याने साखर कारखानदार व बॅंकांसमोरील पेच काही प्रमाणात कमी होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

साखर कारखानदारांनी यंदा साखरेला किमान २,९०० ऐवजी ३,२०० रुपये दर मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे केंद्राने दुर्लक्ष केले आहे. केंद्राने एफआरपीचा कायदा करताना साखरेचे दर प्रतिक्विंटल ३,४०० ते ३,५०० रुपये होते. चांगल्या दरामुळे साखर हंगामात गाळप झालेल्या उसाला एफआरपीची ठरलेली रक्कम देण्यास मदत झाली. मात्र, काहीच दिवसांत या दराचा आलेख कोसळला होता. कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देता आली नाही. राज्यातील साखर कारखान्यांकडे सुमारे १,९०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

केंद्र शासनाच्या पॅकेजमधून कारखानदारांना फारशी रक्‍कम हाती लागली नाही तरी साखरेचे दर प्रतिक्विंटल २,९०० रुपयांच्या आत येणार नाहीत, या धोरणाच्या अंमलबजावणीने साखरेच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी, कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जाण्याचे वाचले. साहजिकच बॅंकांना बसणारा फटकाही टळणार आहे.
- प्रतापसिंह चव्हाण, 

मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बॅंक

Web Title: Kolhapur News Sugar rate hike by 400 Rs