वसगडेतील नवविवाहितेची कळंब्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - हातावरची मेहंदी आणि अंगाला लागलेली हळद सुकण्याआधीच माहेरी आलेल्या नवविवाहितेने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी महेश सूर्यवंशी (वय १९, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा) असे तिचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते.

पोलिस व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती, त्रिमूर्ती कॉलनीत सतीश चौगले पत्नी, तीन मुली व एका मुलासोबत भाडेकरू म्हणून राहतात. ते सोनारकाम करतात. त्यांची मोठी मुलगी शिवानीचा विवाह वसगडे (ता. करवीर) येथील महेश सूर्यवंशी याच्याशी २५ एप्रिलला झाला. शिवानी पाच दिवस सासरी राहून माहेरी आली.

तिच्या लहान भावाला पोटदुखीचा त्रास असल्याने त्याला रुग्णालयात ठेवले होते. त्यामुळे आई-वडील त्याच गडबडीत होते. काल महेश व शिवानी जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आल्यानंतर ते तिला पुन्हा माहेरी सोडून निघून गेले.
आज सकाळी आई-वडील भावाला ठेवलेल्या दवाखान्यात गेल्यावर शिवानीने गळफास घेतला. हे काही वेळानंतर तिच्या दोन्ही बहिणींच्या लक्षात आले. त्यांनी ओरडा करताच शेजारी जमले. त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

संसाराचा सारीपाट उधळला
दहा दिवसांपूर्वी शिवानीशी विवाह झालेल्या पती महेश सूर्यवंशी यांना ही घटना समजली. तसे ते सैरभैर अवस्थेत नातेवाईकांसह सीपीआरमध्ये दुपारी आले. शिवानीला पाहून त्यांना भोवळ आली. स्वप्नांच्या दुनियेत रंगलेल्या या जोडप्याचा संसाराचा सारीपाट असा उधळला. 

Web Title: Kolhapur News Suicide incidence in Vasagade