...आणि अंबाबाईच्या पूजेचं फूल चुकलं!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कोल्हापूर - आज सुमेधाचं निधन झालं आणि अंबाबाईच्या पूजेचं फूल चुकलं. गेली बारा-तेरा वर्षे न चुकता देवीच्या अलंकार पूजेच्या वेळी सुमेधा स्वतः विणलेली फुलाची वेणी घेऊन मंदिरात येत होती. वेणी श्री पुजकांकडे देऊन देवीला हात जोडून परत जात होती. ही वेणी मूर्तीवर चढली की, देवीचे रूप खुलत होते. या इतक्‍या वर्षांत तिनं देवीचं फूल कधी चुकवलं नाही; पण आज तिच्या मृत्यूमुळे तिच्या हातचं देवीचं फूल चुकलं.

कोल्हापूर - आज सुमेधाचं निधन झालं आणि अंबाबाईच्या पूजेचं फूल चुकलं. गेली बारा-तेरा वर्षे न चुकता देवीच्या अलंकार पूजेच्या वेळी सुमेधा स्वतः विणलेली फुलाची वेणी घेऊन मंदिरात येत होती. वेणी श्री पुजकांकडे देऊन देवीला हात जोडून परत जात होती. ही वेणी मूर्तीवर चढली की, देवीचे रूप खुलत होते. या इतक्‍या वर्षांत तिनं देवीचं फूल कधी चुकवलं नाही; पण आज तिच्या मृत्यूमुळे तिच्या हातचं देवीचं फूल चुकलं. देवीला सोने, नाणे, चांदीचे अलंकार वाहून तिची पूजा होत नसते तर रोज फूल वाहिलं तरी देवीला ती पूजा पोहोचत असते. हा संदेश छोट्याशा आयुष्यात ही कृतीतून तिने दाखवून दिला.

सुमेधा बेडके या तरुणीच्या चटका लावणाऱ्या मृत्यूची ही शोककथा आहे. ती अंबाबाईची भक्त. घरची स्थिती चांगली; पण तिने देवीसाठी रोज वेणी विणून देण्याचे व्रत स्वीकारले. स्वकमाईतून ही सेवा द्यायची म्हणून कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये नोकरी स्वीकारली. त्या पैशातूनच ती फुले विकत घ्यायची, रोज वेणी बनवायची व न चुकता डब्यात वेणी ठेवून ती मंदिरात यायची. अलंकार पूजेच्या अगोदर पुजाऱ्याकडे ती वेणी पोहोचवायची. देवीला हात जोडायची व बाहेर पडायची. गेल्या बारा वर्षांत तिच्या हातचे फूल कधी चुकले नाही. गेले काही दिवस प्रकृतीचा त्रास जाणवत होता; पण गंभीर स्वरूप नव्हते.

कालही तिने नेहमीप्रमाणे मंदिरात वेणी दिली व सायंकाळी दवाखान्यात दाखल झाली. आज मात्र तिला मंदिरात येता आले नाही. अर्थात त्यामुळे तिच्या हातची वेणी देवीच्या डोई माळली गेली नाही. आज सायंकाळी बोलता बोलताच तिचे निधन झाले. तिच्या मृत्यूचे वृत्त पोहोचताच सगळेजण हळहळले. 

देवीसोबत फोटो काढून घ्यायला दररोज अनेकांची धडपड असते; पण ही सुमेधा रोज देवीला वेणी अर्पण करायची; पण कधीही तिने त्याचा गवगवा केला नाही. सुमेधा म्हणजे मंदिरातल्या पूजेचा एक घटक होती.
- धनाजी जाधव, 

मंदिराचे व्यवस्थापक 

भक्ती कशी असावी, याचे सुमेधा ही प्रतीक होती. अत्यंत साधी नि:स्वार्थी ही तरुणी देवीला न चुकता वेणी अर्पण करायची आणि स्वतःसाठी काही नाही; पण सर्वांना सुखी ठेव, एवढ्या तीन शब्दांत प्रार्थना करायची.
- रवी माईनकर, 

मंदिरातील सेवेकरी

Web Title: Kolhapur News Sumedha Bedake no more

टॅग्स