कोरिवडेच्या शिक्षकाचा शेळी, कुक्‍कुटपालनातून वस्तुपाठ

रणजित कालेकर
गुरुवार, 14 जून 2018

आजरा - शेळीपालन व कुक्‍कुटपालन या व्यवसायाबाबत अनेकजण नाके मुरडतात, पण हा व्यवसाय लाभदायी ठरू शकतो, हे कोरिवडे (ता. आजरा) येथील धनाजी सयाजी देसाई यांनी दाखवून दिले आहे. आजरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाची नोकरी सांभाळत शेळीपालन व देशी कोंबडीपालन त्यांनी केले आहे.

आजरा - शेळीपालन व कुक्‍कुटपालन या व्यवसायाबाबत अनेकजण नाके मुरडतात, पण हा व्यवसाय लाभदायी ठरू शकतो, हे कोरिवडे (ता. आजरा) येथील धनाजी सयाजी देसाई यांनी दाखवून दिले आहे. आजरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाची नोकरी सांभाळत शेळीपालन व देशी कोंबडीपालन त्यांनी केले आहे. बंदिस्त शेळीपालनामध्ये तीन वर्षांत साडेचार लाख, तर देशी कुक्‍कुटपालन व्यवसायात एक वर्षात दीड लाख मिळवले. त्यांनी यातून युवकांना नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.

देसाई यांची कोरिवडे येथे पाच एकर शेती आहे. त्यांना लहानपणापासून शेतीची आवड होती. शेती व पशुपालन उद्योगात काहीतरी करावे ही त्यांची जिद्द होती. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संगणक शिक्षकाची नोकरी करतच त्यांनी या व्यवसायात लक्ष घातले. चार वर्षांपूर्वी शेतात छोट्या स्वरूपात उस्मानाबादी दहा शेळ्या व एक बोकड घेऊन व्यवसाय सुरू केला. यासाठी सोळा बाय तीसचे शेड उभा केले. दोन वर्षांनंतर शेळ्यांची संख्या चारपट झाली. त्यांच्या खाद्य, पाणी याची सोय शेडजवळच केली.

त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. तयार झालेले बोकड व पाटी (मादी शेळी) यांची किलोवर फॉर्मवर ते विक्री करत आहेत. त्यांनी दुसरे शेड उभा केले असून, त्यांच्याकडे आता लहान-मोठ्या ८० शेळ्या आहेत. या व्यवसायाला जोड म्हणून त्यांनी देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला. कोल्हापूर येथील शासकीय कुक्‍कुटपालन केंद्रातून गिरीराज व सातपुडा जातीच्या दोनशे कोंबड्यांची पिले आणून छोट्या शेडमध्ये त्यांचे पालनपोषण केले.

दोनशेची पहिली बॅच तीन महिन्यांत विकल्यानंतर त्यांना ८० हजार रुपये मिळाले. यामध्ये पन्नास हजारांचा नफा मिळाला. शासन व खासगी संस्थाकडून शेळीपालन व कुक्‍कुटपालन उद्योगाबाबत प्रशिक्षण दिले जाते. शासनाच्या योजनाही आहेत, पण त्याकडे कितीजण गंभीरतेने पाहतात हा प्रश्‍न आहे. त्यांना प्राचार्य वाय. बी. पाटील व घरच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रोत्साहन व सहकार्य मिळत असल्याचे ते सांगतात.

शेळीपालन व्यवसायात किमान दीड वर्षे फायदा मिळत नाही. यामुळे अनेकांनी विविध कारणांमुळे हा व्यवसाय सोडला, पण हा व्यवसाय सहा महिन्यांत दामदुप्पट होते. यातून शेतीसाठी खत मिळते. देशी कोंबडीपालनामध्ये कमी खर्चात, कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळू शकते.
- धनाजी देसाई,
जिजाई ॲग्रो फॉर्म, कोरिवडे

यू टयूबवर चॅनेल
देसाई यांनी ‘यू टयूब’वर जिजाई ॲग्रो फॉर्म नावाने चॅनेल बनवले आहे. यामध्ये कुक्‍कुटपालन व शेळीपालनातील आपल्याला आलेले अनुभव व सल्ले ते दर आठवड्याला व्हिडिओ स्वरूपात टाकत असतात. यातून या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना माहिती मिळते.

उस्मानाबादी शेळीपालन करून चांगले व्यवस्थापन केले आहे. नफाही चांगला मिळाला आहे. कुक्कुटपालनही उत्तमप्रकारे केले. युवकांनी प्रेरणा घेण्याजोगे आहे.
- पी. डी. ढेकळे,
पशुधन विकास अधिकारी, आजरा

Web Title: Kolhapur News Sunday Farmer special story