स्वच्छ हात..बरबटलेले हात..

सुधाकर काशीद
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

कोल्हापुरात अरुण पांडव या एका तरुणाचा असाच बुटाच्या लाथा मारून शाहूपुरी पोलिसांनी बळी घेतला. ते पोलिस आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. सनी पोवार याचा वडगाव ठाण्यात झालेला मृत्यू ताजा आहे. त्यातलेही आरोपी पोलिस शिक्षा भोगत आहेत. त्यानंतर वारणा येथे चक्‍क दरोडा घातला म्हणूनच पोलिसांवर कारवाई चालू आहे. तोवर काल सांगलीत पोलिसांनी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार केला.

कोल्हापूर -  श्रीपतराव ऊर्फ श्री. ब. माने नावाचे एक पोलिस निरीक्षक ३० वर्षांपूर्वी कोल्हापुरात होते. त्यावेळी शाहूपुरी, राजारामपुरीच्या हद्दीत एका ठरावीक टोळीची दादागिरी. या टोळीचा दादा असा की, त्याला पकडायला त्याच्या वस्तीत गेले की, पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकून पोलिसांनाच पळवून लावले जायचे. श्रीपतराव मानेंनी ही माहिती घेतली आणि ‘‘हा काय बिहार आहे का?’’ म्हणत ते ठरावीक पोलिसांसह वस्तीत घुसले. थोडा विरोध झाला. पण मानेंनी त्या दादाला पकडलेच आणि चक्‍क त्याच्या हातात बेड्या नव्हे तर त्याला दोरखंडाने बांधून, अनवाणी पायाने त्याच्या वस्तीतून चालवत ठाण्यात आणले. म्हटलं तर मानवी हक्‍क कायद्यानुसार त्या दादाची अशी धिंड काढणे बेकायदेशीर. पण सर्वांनी या कारवाईचे स्वागत केले. त्याला कारण एकच होते की, श्रीपतराव माने यांचे हात हप्त्यापासून लांब होते. त्यामुळे आपल्या स्वच्छ हाताच्या बळावर ते अशी कारवाई करू शकले.

अशीच दुसरी कारवाई त्यावेळच्या अतिरिक्‍त पोलिस प्रमुख मीरा बोरवणकर यांची. गंगावेशीतील रेगे तिकटीला खुले आम दारूचा अड्डा चालू असायचा. हप्ता घेऊन लाचार झालेल्या पोलिसांत कारवाईचे धाडस नव्हते. एक दिवस मीरा बोरवणकर रेगे तिकटीला आल्या. सोबत फक्‍त दोनच पोलिस. थेट दारूच्या गुत्त्यावर पोहोचल्या. दारू गुत्ता मालकासह इतर चार-पाच जणांना त्यांनी भर रस्त्यात फोकळून काढले. पाच-सहाशे लोकांनी बोरवणकर मॅडमचा हा प्रताप पाहिला आणि अख्ख्या जिल्ह्यात बोरवणकर मॅडमचा दरारा झाला. बोरवणकर मॅडम हे का करू शकल्या? कारण त्यांचे हात स्वच्छ होते. 

पण काल हप्ते खाऊनही पुन्हा कारवाईचे नाटक करणाऱ्या सांगली पोलिसांनी आपल्या बरबटलेल्या हातांनी एका संशयित आरोपीचे जीवन संपविले. आधीच विश्‍वास गमावलेल्या पोलिस खात्याला आणखी मलीन केले. पोलिसांची दहशत, भीती, वाईट प्रवृत्तीच्या लोकांना जरूर असली पाहिजे, हे खरे आहे. पण भीती दाखवत एखाद्याचा जीव घेण्याइतपत मुर्दाडपणा सांगली पोलिसांनी दाखवला.

कोल्हापुरात अरुण पांडव या एका तरुणाचा असाच बुटाच्या लाथा मारून शाहूपुरी पोलिसांनी बळी घेतला. ते पोलिस आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. सनी पोवार याचा वडगाव ठाण्यात झालेला मृत्यू ताजा आहे. त्यातलेही आरोपी पोलिस शिक्षा भोगत आहेत. त्यानंतर वारणा येथे चक्‍क दरोडा घातला म्हणूनच पोलिसांवर कारवाई चालू आहे. तोवर काल सांगलीत पोलिसांनी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार केला. या प्रकरणातील कोथळे हा खरोखरच वाटमारीतला आरोपी होता की नाही, हा पुढचा भाग आहे. पण त्याच्या मृत्यूने खाकी वर्दीतील मग्रुरीचा भयाण चेहरा पुढे आला. काही पोलिसांतील मग्रुरी हा लोकांत चर्चेचा, संतापाचा मुद्दा होताच. त्याला सांगली पोलिसांतल्या एका घटकाने बळ दिले.

पोलिस तपास व गुन्ह्यातले बारकावे शोधताना आरोपी मनापासून पोलिसांना सगळं काही सांगेल असे नक्‍कीच नाही. त्यामुळे ‘थर्ड डिग्री’ हा प्रकार सुरू झाला. ही ‘थर्ड डिग्री’ म्हणजे काय? आरोपीने गुन्हा कबूल करावा, तो कसा केला याची सुसंगत माहिती द्यावी, म्हणून त्याचा केला जाणारा छळ. त्या छळाचा भाग म्हणून त्याला पट्ट्याने फोकळणे, बर्फावर झोपवणे, बॅटरीच्या सहाय्याने झटके देणे हे प्रकार अनेक वेळा टीकेचे लक्ष्य ठरले. वास्तविक गुन्ह्याचा तपास अधिकाऱ्यांच्या कौशल्यावर, तर्कसंगतीवर, पुराव्याच्या साखळीवरच अवलंबून असतो. पण प्रत्यक्षात थर्ड डिग्रीचा फॉर्म्युला वापरला जातो.

पुढे खटला दाखल केला जातो. आजवर कोठडीत आरोपींचे जे मृत्यू झाले, त्या सर्व प्रकरणात ही थर्ड डिग्री जगासमोर आली. त्यामुळे पोलिस ठाणे म्हटले की तेथे ठोकतातच ही समजूत घट्ट होत गेली आहे. परिस्थितीही तशी आहे. पोलिसांचे जवळून निरीक्षण केले की, काही पोलिस नक्‍की सरळ असतात. आपण भलं आपलं काम भलं असे जगत असतात. काही अधिकारीही असे चांगले असतात. पण दुसऱ्या प्रकारचे काही अधिकारी व काही पोलिस मग्रुरीचे प्रतिक असतात. आणि तेच पोलिस खात्याची प्रतिमा काळी करतात. हे मग्रूर पोलिस आरोपी नव्हे तर केवळ कमाईच्या संधी शोधतात. ते कधीही गणवेशात नसतात.

काही वर्षांपूर्वी ते सारे सफारीत असायचे. आता गॉगल, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, जीन्स, स्पोर्टस्‌ शूज, कानाला मोबाईल, हातात चांदीच्या साखळ्या, गंडे दोरे बांधून कायम पोलिस ठाण्याच्या दारात उभे असतात. त्यांना शहरातले सर्व काळे धंदे माहीत असतात. पण त्यांच्या आशीर्वादाने हे धंदे बिनधास्त चालू राहतात. काही वरिष्ठांनाही असेच पोलिस लाडके असतात. कारण ते पडेल ते काम करत असतात. या पोलिसांच्या तोंडात शिवीचीच भाषा असते आणि कामगिरी दाखवण्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते.

पोलिस ठाणीही प्रसिद्धीचा नवा स्टंट ठरतील
 हे पोलिस इतके मग्रूर असतात की ते आपल्या ठाण्यातील इतर सरळमार्गी पोलिसांनाही कमी लेखतात. अशाच वृत्तीच्या पोलिसांकडून सांगलीतील कृत्य घडले. एका तरुणाचा अशा पोलिसांमुळे बळी गेला. पोलिसांच्या वर्दीला काळिमा लागला. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. आता तर कोल्हापूरात आय.एस.ओ. पोलिस ठाणी करायची तयारी चालू आहे. त्यातून पोलिस ठाण्याची इमारत चकाचक होणार आहे. पण काही पोलिसातील,अधिकाऱ्यांतील मग्रुरी वृत्ती तशीच राहिली तर आय.एस.ओ. पोलिस ठाणीही प्रसिद्धीचा नवा स्टंट ठरली तर ते आश्‍चर्य नसणार आहे.

 

Web Title: Kolhapur News suspected death in police custody special story