"स्वाभिमानी'कडून शिरोळमधून पुन्हा सावकर मादनाईक

गणेश शिंदे
सोमवार, 4 जून 2018

जयसिंगपूर - शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सावकर मादनाईक यांच्या नावाची घोषणा करुन खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूकीचे मैदान मारण्याची तयारी सुरु केली आहे. श्री मादनाईक यांच्या उमेदवारीने विधानसभेच्या लढतीचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे.

जयसिंगपूर - शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सावकर मादनाईक यांच्या नावाची घोषणा करुन खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूकीचे मैदान मारण्याची तयारी सुरु केली आहे. श्री मादनाईक यांच्या उमेदवारीने विधानसभेच्या लढतीचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे. विधानसभेला अद्याप दिड वर्षांचा अवधी असताना खासदार शेट्टी यांनी सर्वप्रथम उमेदवारी जाहीर करुन हरवलेला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याची व्युहरचना आखली आहे. 

अकिवाट (ता. शिरोळ) येथे आयोजित विकासकामांचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्यात खासदार शेट्टी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत स्वाभिमानीकडून पुन्हा सावकर मादनाईक यांना संधी देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे यावेळी देखील श्री मादनाईक यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य तसेच आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती राहिलेल्या श्री मादनाईक यांनी कोट्यवधींच्या विकासकामातून "स्वाभिमानी'ची प्रतिमा उंचावली आहे. प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असणारे नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. 

चळवळीच्या माध्यमातून त्यांनी खासदार शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्‍यात सुरु ठेवले आहे. खासदार शेट्टींचे सुरुवातीपासूनचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख राहिली आहे. स्वाभिमानीच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणारे ते एक प्रमुख शिलेदार म्हणून ओळखले जातात. 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीत त्यांना 50 हजार मते मिळाली.

विद्यमान आमदार उल्हास पाटील, माजी आमदार स्व. डॉ. सा. रे. पाटील आणि शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर अशी चौरंगी चुरशीची लढत तालुक्‍याने पाहिली आहे. विधानसभेला अद्याप दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना खासदार शेट्टी यांनी 2019 साठी श्री मादनाईक यांच्या नावाची घोषणा केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

मादनाईक यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याने आता निवडणूकीच्या हालचाली गतीमान होणार असून बेरजेच्या राजकारणाकडे नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. इचलकरंजी शहराच्या अमृत जल योजनेला कडाडून विरोध करुन संभाव्य उमेदवारांनी निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा असतानाच खासदार शेट्टी यांनी मादनाईक यांच्या नावाची घोषणा करुन तालुक्‍यातील विरोधकांनाही तयारीची संधी दिली आहे. 

संभाव्य लढतीचे चित्र

शिवसेना - आमदार उल्हास पाटील
स्वाभिमानी - सावकर मादनाईक
भाजप - अनिलराव यादव
कॉंग्रेस - गणपतराव पाटील
राष्ट्रवादी - राजेंद्र पाटील-यड्रावकर

Web Title: Kolhapur News swabhimani Candidature to Savkar Madnaik from Shirol