स्वच्छतेची लोकचळवळ गतिमान व्हावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहीम अतिशय उपयुक्त आहे.’’ भविष्यात प्रतिष्ठानच्या वतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याची निर्गती करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. 

कोल्हापूर - स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहीम अतिशय उपयुक्त आहे.’’ भविष्यात प्रतिष्ठानच्या वतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याची निर्गती करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदांडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

कोल्हापुरात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छता मोहीम राबवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, विशेष कार्य. अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी स्वच्छ भारताचा संकल्प करून संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानास देशवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याची निर्गती करताना सुक्‍या कचऱ्यापासून कांडी कोळसा, तर ओल्या कचऱ्यापासून खत, गॅस व वीज निर्मिती असे उपक्रम हाती घेण्यात प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा.’’

अनेक ठिकाणी स्वच्छता
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात रस्ते, कार्यालये स्वच्छ करण्यात आली. आजच्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, छत्रपती प्रमिलाराजे रुगणालय, न्याय संकुल, तहसील कार्यालये, पोलिस अधीक्षक कार्यालय, उत्पादन शुल्क, अँटी करप्शन ब्युरो, प्रांताधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, वन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुरातत्त्व विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, सिंचन भवन, बांधकाम भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महापालिका, महापालिकेचे शहरातील दवाखाने यांच्यासह शहरातील प्रमुख चौक व रस्ते स्वच्छ करण्यात आले.

१०० टन कचऱ्याची निर्गती
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय कार्यालयाच्या आवारात व शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविली. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरातील तसेच करवीर, शिरोळ, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल, गगनबावडा आणि हातकणंगले अशा नऊ तालुक्‍यांत स्वच्छता मोहीम हाती घेऊन शासकीय कार्यालयांचा परिसर, रेल्वे स्थानक स्वच्छ करण्यात आले. या मोहिमेत तीन हजारांहून अधिक सदस्यांनी सहभाग घेतला. आजच्या स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानच्या वतीने शहर व जिल्ह्यातील सुमारे १०० टन कचरा संकलित केला.
 

Web Title: kolhapur news Swacchata Abhiyan