स्वच्छ विद्यालय स्पर्धेत कोल्हापूरची पाटी कोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

राज्यातील १५ शाळांचा केंद्रातर्फे गौरव - जिल्हा परिषद नापास झाल्याचे स्पष्ट

कोल्हापूर - स्वच्छ भारत अभियानात देशात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही ‘स्वच्छ विद्यालय’ नाही, हे केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या पुरस्कारावरून स्पष्ट झाले आहे. 

राज्यातील १५ शाळांचा केंद्रातर्फे गौरव - जिल्हा परिषद नापास झाल्याचे स्पष्ट

कोल्हापूर - स्वच्छ भारत अभियानात देशात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही ‘स्वच्छ विद्यालय’ नाही, हे केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या पुरस्कारावरून स्पष्ट झाले आहे. 

स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील १५ शाळांना राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने शुक्रवारी गौरवण्यात आले. त्यांत कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेचा समावेश नाही. या वेळी तीन राज्ये, ११ जिल्हे व १७२ शाळांना विविध श्रेणींत गौरवण्यात आले. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रलयाच्या वतीने वर्ष २०१६-१७ साठी देशभरातील सर्व शाळांना ‘स्वच्छता विद्यालय पुरस्कार’  स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार देशभरातील २ लाख ६८ हजार शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयांची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक बदल व क्षमता विकास या मानकांवर शाळांची निवड झाली. यासाठी तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील समित्यांनी गुणांकन करून शाळांची निवड केली आहे. 

देशातील एकूण १७२ शाळांची निवड अंतिम स्पर्धेसाठी केली होती. त्यात महाराष्ट्रातील १५ शाळांचा समावेश आहे. आज या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशस्तिपत्र आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे व नगर जिल्ह्यातून प्रत्येकी दोन शाळांनी हा पुरस्कार पटकाविला. यात कोल्हापूर जिल्हा परिषदेची एकही शाळा नाही. हागणदारीमुक्त अभियानात जिल्ह्याला देशात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतरच्या स्वच्छ भारत अभियानातही जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे; मात्र स्वच्छ विद्यालय परीक्षेत जिल्हा परिषद नापास झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

पुणे जिल्हा आघाडीवर 
’स्वच्छ विद्यालय’ स्पर्धेसाठी  विक्रमी नोंद पुणे जिल्ह्यातून झाली होती. पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ११२ प्राथमिक, तर ८ माध्यमिक शाळांची व शहरी भागातील ७ प्राथमिक व ६ माध्यमिक शाळांची स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६-१७ साठी नोंदणी केली.

पुरस्कार मिळालेल्या राज्यातील शाळा
माध्यमिक आश्रमशाळा- कोठाली, नंदूरबार, माध्यमिक आश्रमशाळा- किनवट, नांदेड, कस्तुरबा बालिका विद्यालय-धानोरा, गडचिरोली, एनएनएससी शाळा-आंबेडकरनगर, ठाणे, मुलांची निवासी शाळा-शिरूर, बीड, जि. प. शाळा-उंडेमळा, नगर, जि. प. पब्लिक स्कूल-नेप्ती, नगर, मराठी प्राथमिक शाळा-धरणगाव, बुलडाणा, उर्दू शाळा-टोणगाव, जळगाव, विद्यानिकेतन-देवळा, नाशिक, जि. प. शाळा-शेंडेवाडी, सातारा, जि. प. शाळा-शिवनगर, बाहुली (दोन्हीही पुणे), प्राथमिक शाळा-कोलवाडी, परभणी, प्राथमिक शाळा-कुरताडे, रत्नागिरी.

Web Title: kolhapur news swatch school competition