महापुरात पोहण्याची १८ जणांची जिगर

सुधाकर काशीद
सोमवार, 23 जुलै 2018

कोल्हापूर - महापुरामुळे आक्राळ-विक्राळ रूप धारण केलेले नदीचे पात्र पाहताना अंगाचा थरकाप उडतो. पण, पंचगंगा नदीच्या अशा पात्रावर स्वार होत, आज येथील पंचगंगा विहार मंडळाच्या १८ तरुणांनी १६ किलोमीटर अंतर जिद्दीने पार केले.

कोल्हापूर - महापुरामुळे आक्राळ-विक्राळ रूप धारण केलेले नदीचे पात्र पाहताना अंगाचा थरकाप उडतो. पण, पंचगंगा नदीच्या अशा पात्रावर स्वार होत, आज येथील पंचगंगा विहार मंडळाच्या १८ तरुणांनी १६ किलोमीटर अंतर जिद्दीने पार केले. बालिंगा ते पंचगंगा शिवाजी पूल असे नदीच्या पात्रातून पोहत त्यांनी त्यांच्यातले धाडस तर दाखवलेच, पण हे अंतर पार करताना एकमेकांना सांभाळून घेत त्यांनी जिवाभावाच्या दोस्तीचे दर्शन घडविले. 

आज सकाळी हे सर्वप्रथम बालिंगा पुलावर गेले. तेथून त्यांनी भोगावती नदीच्या पुराने भरलेल्या पात्रात सूर मारले. तेथून ते जेथे भोगावती, कासारी, कुंभी, धामणी या नद्यांचा संगम होऊन पंचगंगेत रूपांतर होते, त्या प्रयाग संगमावर आले. तेथून शिंगणापूर, हणमंतवाडी, चिखली, आंबेवाडी नदीमार्गे शिवाजी पुलाजवळ आले. हे अंतर त्यांनी २ तास १६ मिनिटांत पूर्ण केले. 
पंचगंगचे पात्र खूप वेगवान आहे. बालिंगा येथून पोहायला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी पोहताना एकमेकांसोबत कसे राहायचे.

पाण्यात एखाद्या कोणी पुढे जायचे नाही किंवा मागे राहायचे नाही, अशा सूचना दिल्या व त्यानंतर ‘जोतिबाच्या नावाने चांगभल’ असे एकसुरात म्हणत त्यांनी पात्रात सूर मारले. पाण्याला ओढ जरूर होती; पण अनेक वेळा हा प्रवाह कडेला असलेल्या झाडी झुडपाकडे ओढत होता. आणि तेथेच खरा धोका होता. नदीत अर्धवट बुडालेल्या झाडी झुडपात अडकले तर त्यातून बाहेर पडणे केवळ अशक्‍य असते, त्यामुळे या सर्वांनी नदीच्या मध्य भागातूनच पोहण्याचा रोख ठेवला. प्रयागाजवळ पंचगंगेच्या पाण्याचा वेग अधिक वाढतो. त्यामुळे तेथून सर्वजण एकमेंकाच्या जवळपास अंतरावरूनच पोहत राहिले.

 एखाद दुसरा दमतोय किंवा एखाद्याच्या पायात गोळा आला, असे वाटले तर त्यालामध्ये घेत ते पुढे पुढे जाऊ लागले. ‘पशा हात मार’, ‘तानाजी लई पुढ जाऊ नकोस’ ‘उम्या कडेला कशाला जातयस ?’ ‘दिलप्या भेंडाळलायस काय?’ ‘संज्या स्पिड घे’ अशा पाण्यातूनच एकमेकाला आधारवजा सूचना देत राहिले. मधूनच ‘जोतिबाच्या नावान चांगभल’, ‘शिवाजी महाराज की जय’, ‘शाहू महाराज की जय’ अशाही घोषणा देत राहिले. आपल्यातला कोणीही मागे राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेत ते शिवाजी पुलाजवळ आले. तेथून काठावर आले आणि गारठलेल्या अंगानेच आंनदाने नाचायला लागले. 

धाडसी मोहिमेत सहभागी असे
प्रशांत कदम, तानाजी धनवडे, उमेश सुर्वे, दिलीप केसरकर, राजू मगदूम, संजय पायशेट्टी, अजित माने, योगेश माने, नीलेश माने, दिनकर जाधव, महादेव बेळगावकर, विलास भोपळे, विशू भोपळे, बबन सांगावकर, दत्ता कचरे, साईराज कचरे, आनंद ससे. 

बापलेकही सहभागी
या मोहिमेत तिघे बापलेक सहभागी झाले. विलास भोपळे यांचा मुलगा विशू भोपळे याने आपले वडील व त्यांच्या मित्रांसोबत न थकता हे अंतर पार केले. याशिवाय अजित माने, नीलेश माने, दत्ता कचरे व साईराज कचरे हे बापलेकही सहभागी झाले. 

 

Web Title: Kolhapur News swimming in Flood special story