कोल्हापूरात स्वाईन फ्लूने दोघींचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

चंदगड-जयसिंगपूर - विंझणे (ता. चंदगड) येथील सौ. लक्ष्मीबाई दत्तू पोवार (वय ४५) यांचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात; तर जयसिंगपूर येथील सौ. सन्मती अनिल फराटे (वय ३६) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. लक्ष्मीबाई यांचा रविवारी सकाळी, तर सन्मती फराटे यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला.

चंदगड-जयसिंगपूर - विंझणे (ता. चंदगड) येथील सौ. लक्ष्मीबाई दत्तू पोवार (वय ४५) यांचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात; तर जयसिंगपूर येथील सौ. सन्मती अनिल फराटे (वय ३६) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. लक्ष्मीबाई यांचा रविवारी सकाळी, तर सन्मती फराटे यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला.

चंदगड-गडहिंग्लज मार्गावर अडकूर येथून तीन किलोमीटरवर विंझणे या दुर्गम गावातील सौ. पोवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सुरवातीला स्थानिक खासगी डॉक्‍टरकडे उपचार केले. त्यानंतर गडहिंग्लज येथे नेल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या घशाचे नमुने घेतले असता स्वाईन फ्लूचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांचे निधन झाले.

संबंधित महिलेला स्वाईन फ्लूचे निदान झाल्यापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार अडकूर (ता. चंदगड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ व त्यांचे पथक गावात तळ ठोकून आहेत. संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य तसेच गावातील नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप केले असून, रोज तपासणी शिबिर सुरू आहे. माजी सरपंच चंद्रकांत शिवणगेकर यांनी खबरदारी म्हणून प्रत्येक घरात कापराच्या डबींचे वाटप केले. सौ. पोवार यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 

जयसिंगपूर : शहरातील बाराव्या गल्लीतील सौ. सन्मती अनिल फराटे (वय ३६) यांचा रविवारी पहाटे स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. सौ. सन्मती ताप व खोकल्याने आजारी होत्या. उपचारासाठी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतरही त्यांचा आजार कमी न झाल्याने १२ सप्टेंबरला त्यांना सांगली येथील भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीनंतर त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. नांद्रे (जि. कोल्हापूर) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागावमध्ये रुग्ण
नागाव  ( ता. हातकणंगले ) येथेही एकास स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांच्या तपासण्या केल्या असता स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात पुणे, मुंबईहून आलेल्यांकडून स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला असण्याची शक्‍यता आहे. वैद्यकीय पथक गावातील स्थितीवर नजर ठेवून आहे. सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आलेले आहेत.
- डॉ. बी. डी. सोमजाळ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अडकूर

Web Title: Kolhapur news swine flu