कोल्हापूरातील नागाळा पार्कात तरुणावर तलवार हल्ला 

राजेश मोरे
गुरुवार, 15 मार्च 2018

कोल्हापूर - नागाळा पार्क येथे पूर्ववैमन्यसातून पाच ते सात जणांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे. नितीन सुहास साळोखे (वय 29, रा. साळोखे पार्क) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर - नागाळा पार्क येथे पूर्ववैमन्यसातून पाच ते सात जणांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे. नितीन सुहास साळोखे (वय 29, रा. साळोखे पार्क) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

गजबजलेल्या रस्त्यावर भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते. 

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नितीन साळोखे हे एसएससी बोर्ड जवळील साळोखे पार्क येथे कुटुंबासोबत राहतात. ते नागाळा पार्क येथे मोटार चालक म्हणून काम करतात. घराशेजारील काही तरुणांशी वाद आहे. याच वादातून काही दिवसापूर्वी त्यांचा भावाने शिवीगाळ केल्याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा संबधित तरुणांना राग होता. यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

आज सकाळी साळोखे हे कामावर जाण्यासाठी मोटारसायकल काढत होते. त्यावेळी गाडी लावण्याच्या कारणावरून संबधित तरुणांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून साळोखे हे नागाळा पार्क येथे कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी संबधित तरुण व त्यांचे साथिदार मोटारसायकल व रिक्षातून नागाळा पार्कात गेले. कामाच्या ठिकाणावरून त्यांनी साळोखे यांना बाहेर बोलवून घेतले.

त्यानंतर त्यांच्यावर तलवार आणि काठ्यांनी हल्ला केला. हल्ल्यात साळोखे यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. साळोखे यांनी यावेळी आरडाओरड केली. तसे रस्त्यावरील नागरिक तेथे जमा झाले. ते पाहून हल्लेखोर तेथून पसार झाले. नागरिकांनी जखमी साळोखे यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. ते तातडीने सीपीआरमध्ये दाखल झाले.

दरम्यान याची माहिती साळोखे यांच्या नातेवाईकांना समजली. त्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम शाहूपुरी पोलिस करीत आहेत

Web Title: Kolhapur News sword attack on youngster in Nagala Park