ऑनलाईन बँक व्यवहार करताना घ्या काळजी...

ऑनलाईन बँक व्यवहार करताना घ्या काळजी...

कोल्हापूर - सायबर क्राईम अधिक करून बॅंकिंग व्यवसायाशी संबंधित आहे. फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे, हीच महत्त्वाची बाजू ठरू शकते. बॅंक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत आणि ग्राहकाला फसवून बॅंक खात्याची माहिती घेण्यापासून ते खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत ही गुन्हेगारी वाढते. यासाठी पोलिसांनी प्रबोधन सुरू केलेच आहे.

फिशिंग 
फिशिंग दोन प्रकारे होते.
अ) पहिल्या प्रकारात एखाद्या अज्ञात मेल आयडीवरून तुम्हाला लॉटरीचे बक्षीस लागले आहे, अशा मजकुराचा मेल येतो. बक्षीस रक्कम घेण्यासाठी बॅंक खाते, एटीएम, एटीएम पिन, पॅन कार्ड अशी महत्त्वपूर्ण माहिती मागण्यात येते. नायजेरियन व्यक्ती या प्रकारात मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या असल्याने या प्रकाराला ’नायजेरियन फ्रॉड’ असेही म्हटले जाते. 

(ब) दुसऱ्या प्रकारात बॅंकेची खोटी वेबसाइट तयार करून तुम्हाला फसविण्यात येते. अशा खोट्या वेबसाइटच्या लिंकमध्ये https च्या ऐवजी http असे असते; पण केवळ s नसलेल्या या वेबसाइटकडे घाईघाईत क्‍लिक करून माहिती दिली जाते आणि पैसे गमावण्याची वेळ येते. 

वॉशिंग 
व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलने (व्हीओआयपी) ही फसवणूक केली जाते. यात लक्ष्य असलेल्या व्यक्तीला फोन येतो. यात रेकॉर्ड केलेल्या मेसेजसारखा भासणाऱ्या आवाजात तुमच्या अकाउंटमध्ये काही गैरप्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करण्यात येते, त्यासाठी एटीएम पिन मागण्यात येतो किंवा तुमच्या कार्ड विषयी असलेली अपूर्ण माहिती घेऊन त्या माध्यमातून पैसे काढण्यात येतात. 

मोबाइल फ्रॉड 
बॅंकेचे ॲप मोबाइलवर डाऊनलोड करून त्याआधारे बॅंकिंग करण्याची पद्धत रूढ होत आहे. परंतु, कंपनीचे बनावट ॲप तयार करून त्याआधारे माहिती मिळवण्याचे प्रकारही वाढले आहेत. बॅंकेचे बनावट ॲप सॉफ्टवेअर डेव्हलपर तयार करतात, त्या माध्यमातून बॅंकेविषयी तसेच तुमची महत्त्वपूर्ण माहिती मिळवून पैसे काढून घेण्यात येतात. विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचेही बनावट ॲप तयार केले आहे. 

मालवेअर 
अशाप्रकारचे फ्रॉड हे कधीही एकट्या-दुकट्या व्यक्तीसोबत होत नाहीत. ग्राहकांच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहिती साठवून ठेवणाऱ्या रिटेल दुकानांमध्ये असे प्रकार घडतात. या दुकानांमध्ये कार्डांविषयी माहिती साठवलेल्या सिस्टीममध्ये सॉफ्टवेअरच्या साहाय्याने घुसखोरी करण्यात येते. हे सॉफ्टवेअर साठवलेली माहिती मिळवते. याचा वापर ई-ट्रान्झॅक्‍शन करण्यासाठी किंवा बनावट कार्ड तयार करून खरेदी करण्यात येते. 

बटणांना गोंद लावणे 
एटीएम मशीनच्या बटणांना खळ, गम किंवा सोल्युशन लावून ती बटणे काम करणार नाहीत याची काळजी घेतली जाते. एखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्याचे एटीएम कार्ड मिश्रमध्ये टाकल्यानंतर बटण दाबताना ती दाबली जात नाहीत. अशावेळी भामटे तुमच्याजवळ येऊन तुम्ही कोणती बटणे दाबताय हे पाहतात. तुम्हाला मदत करण्याचा किंवा तुमची समस्या ऐकण्याचा बहाणा करत पिन नंबर जाणून घेतला जातो. तसेच, तुमचे कार्ड अडकून असल्यास तुम्ही गेल्यानंतर पिन नंबर वापरून पैसे काढून घेतले जातात. 

स्कीमर 
एटीएम मशीन किंवा कार्डद्वारे पैसे आदा करण्याच्या ठिकाणी मशिनना स्कीमर लावण्यात येतात. हे स्कीमर जिथे कार्ड स्वाइप करण्यात येते, त्याच ठिकाणी अशाप्रकारे लावण्यात येते, की तो एटीएम मशिनचाच एक भाग असल्यासारखे दिसते. जेव्हा तुम्ही मशिनमध्ये कार्ड टाकता किंवा स्वाइप करता त्या वेळी हा स्कीमर तुमच्या कार्डमधील माहिती मिळवते. 

मॅन-इन-दी-मिडल 
सार्वजनिक ठिकाणी वायफाय क्षेत्रात दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये घुसखोरी करून माहिती मिळवण्याचा प्रकार म्हणजे  मॅन-इन-दी-मिडल. यात हॅकर विविध सॉफ्टवेअरचा वापर करत मोबाइलचा डेटा पाहतो. मोबाइल बॅंकिंग किंवा इतर काही माहिती असल्यास ती काढून घेतली जाते. 

पिन कोड कव्हर करा 
पॉइंट ऑफ सेल किंवा दुकानात पैसे देण्याच्या काउंटरवर कार्ड वापरून पेमेंट करण्याची वेळ आल्यास कार्डाचा पिन टाइप करताना काळजी घ्या. विक्रेत्याला कधीही पिन देऊ नका. तुमच्या कार्डावर कुठेही पिन लिहून ठेवू नका किंवा कार्ड ठेवत असलेल्या कव्हरमध्ये पिन लिहून ठेवू नका. 

मोबाइल क्रमांक नोंदवा 
व्यवहारांची माहिती एसएमएसने संबंधित ग्राहकाला निःशुल्क देण्याचे बंधन सर्व बॅंकांवर आहे. तुम्ही खात्यात करत असलेल्या कोणत्याही व्यवहारांचा ॲलर्ट बॅंकेकडून मागा. त्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या बॅंकेकडे नोंदवा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com