तामगाव, मोरेवाडीतील खुनाचा छडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

कोल्हापूर - खुनानंतर मृतदेह सिमेंटच्या खांबास बांधून करवीर तालुक्‍यातील तामगावच्या खणीत आणि मोरेवाडीतील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या दुहेरी खुनांचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले.

कोल्हापूर - खुनानंतर मृतदेह सिमेंटच्या खांबास बांधून करवीर तालुक्‍यातील तामगावच्या खणीत आणि मोरेवाडीतील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या दुहेरी खुनांचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले.

जागेच्या व्यवहारातून सख्ख्या भावाच्या मदतीने गोकुळ शिरगावातील गॅरेज मालकाचा, तर पैशाच्या व्यवहारातून तामगावातील कामगाराचा खून भैरू ऊर्फ सुनील मोरे याच्या टोळीने केल्याचे उघड झाले. या प्रकरणी भैरूसह पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. अजीज सैफुद्दीन वजीर व दस्तगीर महमदहनीफ तददेवाडी अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

सूत्रधार भैरू ऊर्फ सुनील दगडू मोरे (वय ३९, रा. मोरेवाडी, करवीर), रशीद सैफुद्दीन वजीर (४३, रा. गोकुळ शिरगाव, एमआयडीसी), जावेद अमरबाबू शेख (४९, रा. तामगाव, करवीर), सुनील पांडुरंग शिंदे (२३, रा. पाटीलनगर, नेर्ली, करवीर) आणि रोहित एकनाथ कांबळे (२६, रा. गिरगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

घटनाक्रम 

  •  ४ नोव्हेंबर २०१७ ला वजीर बेपत्ता 
  •  १८ जानेवारी २०१८ ला दस्तगीर तददेवाडींचे अपहरण
  •  १ फेब्रुवारी २०१८ ला मोरेवाडीतील विहिरीत मृतदेह सापडला
  •  २४ मार्च २०१८ ला तामगाव खणीत मृतदेह सापडला
  •  आज ओळख पटवून गुन्ह्यांचा छडा

एक खून जागा व्यवहारातून, दुसरा पैशांच्या देवघेवीतून
खून करून मृतदेह तामगावच्या खणीत आणि मोरेवाडीतील विहिरीत टाकण्यात आले होते. त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. एक खून जागेच्या व्यवहारातून; तर दुसरा पैशांच्या देवघेवीतून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.

जागेच्या व्यवहारातून वजीर यांचा खून
गोकुळ शिरगाव एमआयडीसी (ता. करवीर) येथे अजीज सैफुद्दीन वजीर (वय ४५) हे दोन वर्षांपूर्वी पुण्यातून येथे राहण्यास आले. गोकुळ शिरगाव येथील सहा ते सात गुंठ्याच्या जागेत ते गॅरेज चालवत होते. नोव्हेंबर २०१७ पासून ते अचानक गायब झाले. याबाबत त्यांच्या पत्नी फतिमा वजीर यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 

दरम्यान, मोरेवाडीतील चित्रनगरीच्या मागे असलेल्या विहिरीत खून करून मृतदेह सिमेंटच्या खांबाला बांधून फेकून दिल्याचे १ फेब्रुवारी २०१८ ला उघड झाले. सडलेल्या अवस्थेतील या मृतदेहाची ओळख पटविण्यात आणि मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना यश येत नव्हते. २४ मार्चला तामगाव (ता. करवीर) येथील खणीत अशाच पद्धतीने खून करून मृतदेह खांबाला बांधून फेकून दिल्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला. एकाच पद्धतीने केलेल्या दुहेरी खुनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करवीर, गोकुळ शिरगाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत संयुक्तरीत्या युद्धपातळीवर सुरू होता. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांच्या संशयाची सुई भैरू मोरेवरच केंद्रित होती. 

तपासात गोकुळ शिरगावातील अजीज वजीर बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद असल्याचे लक्षात आले. याबाबत करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी संबंधितांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. चौकशीत त्यांना वजीर यांचा लहान भाऊ रशीद (वय ४३) चैनीखोर असल्याचे व त्याने गोकुळ शिरगाव येथील गॅरेज असलेल्या सहा ते सात गुंठे जागेचा व्यवहार भैरू ऊर्फ सुनील मोरेशी केल्याचे समोर आले. त्याने ती जागा बाजारभावापेक्षा १० ते १५ लाख रुपये कमी किमतीला म्हणजे ३३ लाख रुपयांना विकली. त्या व्यवहारापोटी त्याने भैरूकडून तीन ते साडेतीन लाख रुपये ॲडव्हान्स घेतले होते.

मात्र, सदरचा व्यवहार अजीज वजीर यांना मान्य नव्हता. त्यांनी त्यास विरोध केला. एक तर पैसे परत कर, नाही तर व्यवहार कर असा तगादा भैरूने रशीदकडे लावला होता. व्यवहारात अडथळा ठरणाऱ्या भावाचा (अजीज) रशीदला राग होता. त्यातून त्यांचे खटके उडत होते. तसेच, त्यांच्या मोबाईलचे सिमकार्डही बदलले होते, अशी माहिती चौकशीत पुढे आली. 

पोलिसांनी रशीदला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यात त्याने भैरू, जावेद, सुनील आणि रोहितच्या मदतीने सख्ख्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भावाचा खून केल्यानंतर फक्त आईची स्वाक्षरी घेऊन जमीन विक्रीचा व्यवहार करण्याचे त्याने ठरविले. ४ नोव्हेंबर २०१७ ला रात्री साडेआठच्या सुमारास अजीज वजीर हे गोकुळ शिरगाव फाट्यावर गेले होते.

त्यावेळी दबा धरून बसलेल्या भाऊ रशीदने भैरू, जावेद, सुनील, रोहित या चौघांच्या मदतीने अजीज यांना उचलून मोटारीत घातले. त्यानंतर त्यांना घेऊन ते तामगाव (ता. करवीर) येथील विमानतळाजवळील पांडवे यांच्या खाणीजवळ नेले. तेथे त्यांना या पाच जणांनी मारहाण केली. त्यानंतर डोक्‍यात वर्मी घाव घालून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह परिसरातील सिमेंटच्या खांबाला बांधून तो खणीत फेकून दिल्याची सर्वांनी कबुली दिली असल्याचे करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले. अजीज वजीर यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि आई असा परिवार आहे. 

पैशांतून तामगावातील कामगाराचा खून  
मोरेवाडीतील विहिरीतही अशाच पद्धतीने खून करून मृतदेह फेकल्याचा संशय पोलिसांचा बळावला. त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयित भैरू मोरेसह रशीद, जावेद, सुनील आणि रोहितची चौकशी सुरू केली. त्या पाच जणांनी याच पद्धतीने तामगावातील कामगाराचा खून केल्याची कबुली दिली.

तामगाव (ता. करवीर) येथील माने कॉलनीत दस्तगीर महमदहनीफ तददेवाडी (वय ५०) हे कुटुंबाबरोबर राहत होते. ते मिळेल ते काम करायचे. त्यांची अजीज व जावेद यांच्याशी ओळख होती. याच ओळखीतून त्यांनी संशयित सुनील शिंदे याच्याकडून काही वर्षापूर्वी एक लाख रुपये घेतले होते. त्याच पद्धतीने अनेकांकडून हातउसने पैसे घेतले होते. मात्र, ते पैसे परत करता येत नसल्याने ते चार ते पाच वर्षांपासून घरी जात नव्हते. त्यांच्या विरोधात धनादेश न वटल्याचा (चेक बाऊन्स) न्यायालयात दावा सुरू होता. त्याच्या तारखेसाठी ते १८ जानेवारी २०१८ ला ते न्यायालयात गेले होते. ते सुनील शिंदेला समजले. त्याने भैरू, रशीद, रोहित आणि जावेद या चौघांच्या मदतीने तददेवाडी यांना रस्त्यात गाठले. त्यानंतर त्यांना मोटारीतून जबरदस्तीने घालून सुरवातीला पडवळवाडी येथे नेले.

येथून रात्री साडेआठच्या सुमारास कोगील (ता. करवीर) येथील सचिन पाटील याच्या घरी नेऊन चार ते पाच दिवस डांबून ठेवले. त्यानंतर २६ ते २७ जानेवारीदरम्यान त्यांना मोटारीतून मोरेवाडी येथील चित्रनगरीच्या मागे असणाऱ्या विहिरीजवळ आणले. तेथे लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्यांचा गळा आवळून खून केला. परिसरातील सिमेंटच्या खांबाला तारेने व नॉयलॉन दोरीने मृतदेह बांधून तो विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली असल्याचे गुरव यांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे. 

टी शर्टाचा खिसा 
अजीज वजीर यांना त्यांच्या पत्नीने एक ताबिज दिले होते. ते ठेवण्यासाठी त्यांनी टी शर्टला आतील बाजूस एक खिसा केला होता. तामगाव येथील खणीत सापडलेल्या मृतदेहाच्या अंगावरील कपडे वजीर यांच्या घरच्यांनी ओळखले. त्या टी शर्टच्या आतील बाजूस खिसा होता. त्यात ताबीजही सापडले. तशाच पद्धतीचे खिसे असणारे टी शर्टही वजीर यांच्या घरात मिळून आले. टी शर्टचा हाच खिसा मृतदेहाची ओळख पटविण्यात महत्त्वाचे ठरल्याचे करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले. 

डीएनए चाचणी 
दुहेरी खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मारेकऱ्यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, न्यायालयीन दृष्टीने ठोस पुरावा म्हणून मृत अजीज वजीर आणि दस्तगीर तददेवाडी यांचेच ते मृतदेह आहेत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने डीएनए चाचणी केली जात आहे. लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे गुरव यांनी सांगितले. 

मोटार जप्त 
अटक केलेल्या भैरू मोरेसह पाचही संशयितांनी दोन्ही गुन्ह्यांत एकच आलिशान मोटारीचा वापर केल्याची कबुली दिली आहे. ती मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र, गुन्ह्यात आणखी एका मोटारीचा वापर केला असून, ती सध्या पुण्याला भाड्याने दिल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. ती मोटारही पोलिस ताब्यात घेणार आहेत. तसेच, संबंधित मोटारमालकावरही गुन्हा दाखल केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.

बीएम बॉईजचा मोरक्‍या
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भैरू ऊर्फ सुनील मोरे मोरेवाडीतील ‘बी. एम. बॉईज’चा मोरक्‍या आहे. हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात चेन घालून तरुण वाहनातून फिरताना परिसरात दिसतात. भैरूचा आलिशान मोटारीतून वावर असतो. तो जमीन खरेदी-विक्रीचे कामही करतो, असे तपासात पुढे आल्याचे गुरव यांनी सांगितले. 

जाधव तीन दिवस तळ ठोकून
मोरेवाडीतील विहिरीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यापासून करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांचा संशयित भैरू मोरेवर संशय होता. भैरूला या खुनाबाबतची काय माहिती आहे का? अशी विचारणा अनेकदा त्यांनी केली. पण, त्याने ‘सांगतो साहेब, नक्की सांगतो’ असे म्हणत वेळ मारून नेली होती. दुहेरी खुनाची उकल होत असल्याचे जसजसे समोर येऊ लागले, तसतसे धागेदोरे शोधण्यासाठी करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव मोरेवाडीत तळ ठोकून होते, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. 

पाठबळाचा संशय 
राजकीय क्षेत्राचे वलय असणाऱ्या आणि सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या खून प्रकरणातील एका संशयिताचे भैरू व त्याच्या ‘बीएम बॉईज’ला पाठबळ असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी चौकशीची प्रक्रियाही सुरू केली आहे. 

पाचही जणांचे मोबाईल ‘स्विच ऑफ’ 
दुहेरी खून करण्याआधी दोन दिवस व घटनेनंतर दोन दिवस पाचही संशयितांनी आपले मोबाईल ‘स्विच ऑफ’ करून घरात ठेवले होते, असे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे मोबाईल लोकेशन व सीडीआर तपासताना त्यांची नावे पुढे येऊ शकली नव्हती, असे गुरव यांनी सांगितले. 

कोगील येथील घरात डांबले

कोगील (ता. करवीर) येथे दिलेल्या पैशांपोटी भैरूने सचिन पाटील नावाच्या व्यक्तीकडून घराचा ताबा घेतला आहे. त्याच घरात दस्तगीर तददेवाडी यांना १८ जानेवारीनंतर चार ते पाच दिवस डांबून ठेवले होते, असे तपासात पुढे आले आहे. या घराचा कब्जा भैरूने कसा घेतला याबाबतचीही चौकशी केली जात आहे.
सुनीलचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय

संशयितामधील सुनील शिंदेचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यानेच खुनानंतर मृतदेह तारेने व नायलॉन दोरीने सिमेंटच्या खांबाला बांधल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिस त्याची चौकशी करीत आहेत.

Web Title: Kolhapur News Tamgaon, Morewadi Murder case