‘च्या पाव’ ते चहा बनमस्का...

‘च्या पाव’ ते चहा बनमस्का...

‘चहा-पाव’ला नवा लुक - शहरात रोज तीन लाख पावांचा खप

कोल्हापूर - नाष्ट्याचे जरूर वेगवेगळे प्रकार आहेत. चहा चपाती, कांदापोहे हा तर बहुतेक मध्यमवर्गीयांच्या घरातला नाष्टा आहे; पण नाष्ट्यात पावाचा वापर ही खाद्य क्षेत्रातला एक नवा बदल कोल्हापुरातल्या बेकरी उद्योगावर चांगलाच जाणवू लागला आहे. 

पाव म्हणजे एक आयताकृती पदार्थ आणि सुरीने केलेल्या त्याच्या छोट्या छोट्या फाकी असे न राहता कोल्हापुरात दहा प्रकारचा पाव आता सकाळच्या नाष्ट्याचा घटक झाला आहे. ‘च्या पाव’ हा नाष्ट्याचा पारंपरिक प्रकार तर ‘टी वुईथ बनमस्का’ या नावाने आला आहे. 

हॉटेलात जाऊन ‘च्या पाव’ची ऑर्डर देणे म्हणजे कमीपणाचे मानण्याचे दिवस बदलले आहेत. कोल्हापुरात फक्त फक्कड चहा आणि ब्रेड ही नाष्ट्याची खासियत झाली आहे. फरक एवढाच की, पावाची ओळख ब्रेड अशी झाली आहे. आणि तीन लाख नग अशा स्वरूपात रोज पावाची विक्री होत आहे. चहा आणि पाव हा तसा गरीब मध्यमवर्गीयांच्या नाष्ट्याचा प्रकार.

एक कप चहात भिजवून पावाच्या दोन फाकी घेतल्या की दुपारपर्यंत पोटाची काळजी नाही. बिंदू चौक जेल रोडला नॅशनल या नावाचे हॉटेल होते. तेथे भजी नाही, वडा नाही, मिसळ नाही, शेवचिवडा नाही, फक्त आकडी दुधाचा चहा आणि पाव मिळायचा. लोकांची झुंबड उडायची. घरात नाष्टा न करता बाहेर पडलेल्यांना तेथे चहा पाव खाऊन आधार मिळायचा किंवा ज्याच्याकडे फार पैसे नाहीत, अशांचा नाष्टा या चहा पावातून व्हायचा.

नंतर नंतर चांगले लोकही या चहा पावसाठी येऊ लागले. हॉटेल आठ तास फुलून जाऊ लागले. 

आता मात्र हाच चहा पाव नवे रूप घेऊन आला आहे. नाष्ट्यात पावाचा वापर मसाला टोस्ट, मस्का पाव, खांडोळी, वडा पाव, मिसळ पाव या माध्यमातून चालूच आहे. पण आता हाच चहा पाव नटूनथटून ‘टी वुईथ बनमस्का’ या नावाने आला आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या इराणी हॉटेलात त्याचा डिस्प्ले झाला आणि आता जरा इकडे तिकडे फरक करून तो अन्यत्रही मिळू लागला. 

नव्या स्वरूपातला हा चहा पाव बनपाव मस्का असे रूप घेऊन आला आहे. चहा तसे नाष्ट्यानंतर पेय. पण चहा हा या मूळ नाष्ट्याचा घटक झाला आहे. आता साधा, मिल्क, पावभाजी, बन, व्हिट, ब्राऊन, गार्लिक, सॅन्डवीज, डोनेट अशा १० प्रकारांत पाव मिळतो. पाव बनवण्याच्या पद्धतीबद्दल पूर्वी खूप गैरसमज; पण आता बहुतेक ठिकाणी पीठ मळण्याचे काम यंत्राद्वारे होत आहे. स्वच्छता व दर्जा याबाबतीत लोक जागरूक झाल्याने पावाचा दर्जा राखण्यावरच बहुतेकांचा भर आहे. त्याचा परिणाम त्याच्या नित्य वापरावर झाला आहे. लहान-मोठ्या आकाराचे रोज कोल्हापुरात तीन लाखाच्या आसपास पाव खपतात हे वास्तव झाले आहे.

बेकरी व्यवसायाचे स्वरूप कालानुरूप बदलत चालले आहे. पूर्वी साधा, मिल्क हे दोन पाव होते. आता दहा प्रकारचे पाव आहेत. मशिनरी अद्ययावत झाली आहे. वेगवेगळ्या आहारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाव बनवावे लागत आहेत. सँडवीच, बाँबेवडा, पावभाजी, मस्कापावसाठी स्वतंत्र पाव ग्राहकच मागत आहेत. साधारण अशा वेगवेगळ्या प्रकारचे तीन लाख पाव रोज कोल्हापुरात खपतात. पावाचा वापर उच्च दर्जाच्या नाष्ट्यात होऊ लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे. 
- राजाराम खाडे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन

इराणी चहा व त्याच्यासोबत बनपावाची एक खासीयत आहे. पुण्या-मुंबईत इराणी हॉटेलची एक वेगळी ओळख आहे. हा चहा करण्याची प्रक्रियाच वेगळी आहे. चहा व ब्रेड ज्या समाधानाने लोक घेतात, ते समाधानच खूप वेगळे आहे. 
- शरजील देसाई, (शाज), चहा-पाव व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com