प्राथमिक शिक्षकांची 15 हजार पदे रिक्त 

राजेंद्र पाटील
मंगळवार, 20 जून 2017

कोल्हापूर - राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. 2009 च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे आजघडीला राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची 15 हजार 423 पदे रिक्त आहेत. लाखो बेरोजगार उमेदवार भरतीकडे डोळे लावून बसल्याने शासनाने त्वरित शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. 

कोल्हापूर - राज्यात गेल्या सात वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. 2009 च्या शिक्षण कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही भरती झालेली नाही. त्यामुळे आजघडीला राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची 15 हजार 423 पदे रिक्त आहेत. लाखो बेरोजगार उमेदवार भरतीकडे डोळे लावून बसल्याने शासनाने त्वरित शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. 

राज्यात प्राथमिक शिक्षकांची 2 लाख 73 हजार 843 पदे मंजूर असून सध्या 2 लाख 58 हजार 520 शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त असणाऱ्या 15 हजार 423 पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून जोरदारपणे केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक पदे भरण्यासाठी मे 2010 मध्ये सीईटी परीक्षा झाली. त्यावेळी राज्यात सुमारे 14 हजार शिक्षक पदे भरण्यात आली. त्यानंतर मात्र भरती झालेली नाही. 

दरम्यान, 2013 पासून आरटीई कायद्यानुसार शिक्षक निश्‍चिती करण्यात आली. त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे अतिरिक्त झाली. या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा घोळ गेली तीन-चार वर्षे सुरूच आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरती करण्यात येऊ नये असे आदेश शासनाने दिल्याने भरती प्रक्रिया थंडावली होती. गेल्या सात वर्षांत शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक भरतीसाठी चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने 30 मे 2017 ला घेतला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासन पवित्र (PAVITRA-Portal for Visible to ALL Teachers Recrutment) ही संगणकीय प्रणाली विकसित करणार आहे. शिक्षण आयुक्‍त यांच्याकडे ही प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी दिली आहे. ही प्रणाली विकसित झाल्यानंतरच शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत गती येण्याची शक्‍यता आहे. 

लाखो बेरोजगार प्रतिक्षेत 
शिक्षक पदासाठी आवश्‍यक शैक्षणिक पात्रता असलेले लाखो उमेदवार राज्यात आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) सुमारे सहा लाखांवर उमेदवार बसले होते. अनेक वर्षे भरती न झाल्याने ही संख्या वाढली आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने हे बेरोजगार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. 

Web Title: kolhapur news teacher