जिल्ह्यात सहा हजार बदलीपात्र शिक्षक 

राजेंद्र पाटील
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांसाठी बदल्यांचे जे नवे धोरण तयार केले आहे, त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 6,101 बदलीपात्र शिक्षक आहेत. याशिवाय संवर्ग एक व दोन मधील सुमारे 464 शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. नवीन धोरणानुसार खो-खो पद्धताने बदल्या होणार आहेत. कोण, कुणाला किती प्रमाणात खो देणार त्यावर बदल्यांची संख्या ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांपैकी बदलीपात्र सहा हजारांवर शिक्षकांत मोठी अस्वस्थता आहे. 

अवघड व सर्वसाधारण अशा दोन क्षेत्रांत बदली प्रक्रिया सुरू आहे. अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत असे शिक्षक बदली अधिकारास पात्र आहेत. जिल्ह्यात 157 शाळा दुर्गम (अवघड) शाळांतील 194 शिक्षक बदली अधिकारास पात्र आहेत. सर्वसाधारण (सुगम) क्षेत्रात ज्या शिक्षकाची सेवा दहा वर्षे पूर्ण झाली आहे असे जिल्ह्यातील सुमारे 5907 शिक्षक बदलीस पात्र आहेत. 

संवर्ग एकमध्ये आजारी, अपंग, विधवा, कुमारिका, वयाची 53 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. या सर्वांना बदली प्रक्रियेत प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात या संवर्गात एकूण 1144 शिक्षक आहेत, पैकी 267 जणांनी बदलीची मागणी केली आहे. 

संवर्ग दोनमध्ये तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असणाऱ्या पती-पत्नी शिक्षकांचा समावेश आहे. त्यांना बदलीसाठी प्राधान्य दिले असून, जिल्ह्यात या संवर्गानुसार सुमारे 197 जणांनी बदली मागितली आहे. नवीन धोरणानुसार बदली प्रक्रियेसाठी संवर्ग एक, दोन, तीन व चार असे चार टप्पे आहेत. टप्प्याटप्यानुसार बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

दृष्टीक्षेपात.... 
एकूण शाळा - 2002. 
एकूण शिक्षक - 8662. 
बदलीपात्र शिक्षक - 6101. 

जिल्ह्याची बदली प्रक्रियेची ऑनलाईन माहिती भरून पूर्ण झाली आहे. संगणकीकृत प्रणालीद्वारे राज्यस्तरावरून बदली आदेश मिळणार आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर कोणत्याही हस्तक्षेपास वाव राहणार नाही. रविवारपर्यंत जिल्ह्यातील संवर्ग 1 अथवा 2 च्या बदल्या झालेल्या नाहीत. 
- सुभाष चौगुले,  शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर

Web Title: kolhapur news teacher