शिक्षक बदलीत काही पदाधिकाऱ्यांचा ढपला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - आंतरजिल्हा बदलीमध्ये अध्यक्षांच्या अनुपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी ढपला पाडल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जोरात सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश दिले आहेत. मात्र, सोयीच्या ठिकाणासाठी त्यातील अनेक शिक्षक हजर झालेले नाहीत. बदली रद्द करण्यासाठी ते पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये गर्दी करू लागले आहेत. 

कोल्हापूर - आंतरजिल्हा बदलीमध्ये अध्यक्षांच्या अनुपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी ढपला पाडल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जोरात सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश दिले आहेत. मात्र, सोयीच्या ठिकाणासाठी त्यातील अनेक शिक्षक हजर झालेले नाहीत. बदली रद्द करण्यासाठी ते पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये गर्दी करू लागले आहेत. 

जिल्हा परिषदेत बदली हा काही अधिकाऱ्यांपासून सदस्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा विषय असतो. काही बदलीच्या प्रयत्नात असतात, तर काहीजण बदली रद्द व्हावी, म्हणून प्रयत्न करत असतात. या बदलीच्या प्रक्रियेत सर्वांत अधिक विभाग गाजतो तो शिक्षण आणि आरोग्य विभाग. कारण या दोन विभागांत कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. यापूर्वी बदल्या झालेल्या देखील कळत नसत. अधिकारी ही प्रक्रिया राबवत असत. त्यामध्ये पदाधिकारी फारसे लक्ष घालत नसत; पण आता परिस्थिती बदलली आहे. विकासकामांची एखादी फाईल नाही दाखविली तरी चालेल; मात्र बदली आपल्याला विचारल्याशिवाय करू नये, असा काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह नियमित बदल्यांमध्ये असतो. 

आंतरजिल्हा बदलीत तर अधिकाऱ्यांना दमबाजीच केली जाते. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या 106 शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटतो न्‌ मिटतो तोच दुसऱ्या टप्प्यात आलेल्या 70 शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ सुरू झाला आहे. 

प्रशासन प्रत्येकाला बोलावून रिक्‍त असलेली गावे दाखविते. त्यातून त्या शिक्षकाने आपल्याला जवळचे असणारे गाव निवडायचे आहे; पण काही गावांमध्ये जागा रिक्‍त असूनही त्या जागा लपविण्यात आल्याची चर्चा सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. प्रशासनाने बदली केली आणि ती सोयीच्या ठिकाणी झाली नसेल तर त्यातून मार्ग काढण्याचा सल्ला काही पदाधिकारी देत असतात. अर्थात हा सल्ला कोणी फुकट देताना दिसत नाही. त्यासाठी काही पदाधिकारी संबंधितांशी "अर्थ'पूर्ण चर्चा करत असतात. त्यातूनच प्रशासनाचा बदलीचा आदेश धुडकावण्याचे धाडस कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते. हे आपणास नुकत्याच झालेल्या बदलीत दिसून आले. शेवटपर्यंत काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. 

दुसऱ्या टप्प्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या 70 शिक्षकांची पदस्थापना करण्यात आली. या सर्व शिक्षकांना पत्रे देण्यात आली आहेत. मात्र, अजूनही त्यातील अनेक शिक्षक बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाही. बदली रद्द करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये घिरट्या घालू लागले आहेत. बदलीच्या ठिकाणी हजर होणाऱ्या शिक्षकांची माहिती आज सायंकाळपर्यंत देण्याच्या सूचना तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, अद्याप ही माहिती शिक्षण विभागाकडे आलेली नाही. दुसऱ्या टप्प्यातील बाहेरून आलेल्या 70 शिक्षकांपैकी शिरोळ तालुक्‍यात 13, करवीर 12, आजरा 1, भुदरगड 4, चंदगड 9, गडहिंग्लज 2, हातकणंगले 7, कागल 5, पन्हाळा 4, राधानगरी 4, शाहूवाडी 9 व करवीर तालुक्‍यातील 12 शाळांमध्ये शिक्षकांची पदस्थापना केली आहे. 

दुर्गम भागातील सर्व  शाळांमध्ये शिक्षक 
दुर्गम भागातील गावांतील शाळांमध्ये शिक्षक जाण्यास तयार नसल्याने या शाळांमधील मुलांना शिक्षकांची प्रतीक्षा असायची. बिन मास्तरचीच शाळा अनेक ठिकाणी भरायची. आता मात्र शिक्षक नाही, अशी दुर्गम भागातील एकही शाळा राहिलेली नाही.

Web Title: kolhapur news teacher