बेडरूममध्ये मारले, आंबोलीच्या दरीत टाकले

भडगाव : विजयकुमार गुरव यांच्या खुनप्रकरणातील संशयीत पत्नी जयलक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे याला घरात नेवून चौकशी केल्यानंतर वाहनाकडे नेताना पोलिस.
भडगाव : विजयकुमार गुरव यांच्या खुनप्रकरणातील संशयीत पत्नी जयलक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे याला घरात नेवून चौकशी केल्यानंतर वाहनाकडे नेताना पोलिस.

गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा चोथेवाडीतील राहत्या घरीच बेडरूममध्ये डोकीत लोखंडी रॉडने हल्ला करून खून केला. त्याच रात्री येथूनच त्यांच्याच मोटारीने त्यांचा मृतदेह नेऊन आंबोलीच्या कावळेसाद दरीत टाकल्याची कबूली संशयीत आरोपी पत्नी जयलक्ष्मी व तिचा प्रियकर सुरेश चोथे याने दिल्याचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

सुरूवातीला घरातून बेपत्ता, त्यानंतर आंबोलीच्या दरीत मृतदेह मिळालेल्या गुरव यांच्या खुनाचा उलगडा सावंतवाडी पोलिसांनी करून हा खून पत्नी जयलक्ष्मी व तिचा प्रियकर चोथेने केल्याचे बुधवारी (ता. 28) उघडकीला आणले. अधिक चौकशीत संशयीतांनी भडगावातच खून केल्याचे सांगितल्याने आज सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, निरीक्षक श्री. धनावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जयलक्ष्मी व सुरेश चोथेला घेवून येथे आले होते. दुपारी दीडच्या सुमारास गडहिंग्लज-हलकर्णी मार्गावरच्या चोथेवाडीतील गुरव यांच्या "आसरा" या निवासस्थानी हे पथक पोहचले. सोबत कोल्हापूरचे फॉरेन्सिक टीमही होती.

पोलिस पथक आल्याचे कळताच शेजारील ग्रामस्थांनी गुरव यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती. तपासात अडथळा नको म्हणून पोलिसांनी गर्दीला हटवले. नातेवाईकांनाही घरातून शेजारच्या शेडमध्ये आणले. त्यानंतर संशयीत सुरेशला आधी घरात घेवून जावून गुरव यांना कोठे मारले, याची माहिती घेतली. काही वेळाने जयलक्ष्मीलाही वाहनातून बाहेर काढून घरात नेले. तिच्याकडूनही खुनाबद्दलची माहिती काढली. गुरव सोमवारी (ता. 6) रात्री बेडरूममध्ये मद्यधुंद होवून झोपी गेले होते. दोन्ही मुले घरातील हॉलमध्ये झोपली होती. रात्री अंदाजे एकच्या सुमारास सुमारास सुरेश व जयलक्ष्मी दोघेही बेडरूममध्ये गेले. त्यावेळी सुरेशने लोखंडी रॉडने गुरव यांच्या डोकीत जोराने मारले. गुरव ठार झाल्याची खात्री होईपर्यंत रॉडनेच त्यांचे डोके ठेचल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेह गुरव यांच्याच मोटारीत (एमएच 14, एएम 7790) घातले. त्याच रात्री आंबोलीतील कावळेसाद दरीमध्ये मृतदेह नेऊन टाकला, अशी कबूली दोन्ही संशयीतांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे हा तपास सुरू असतानाच फॉरेन्सिक पथकाने घरात कोठे रक्ताचे डाग आढळतात का, याची माहिती घेत होती. बेडरूममध्ये कॉटखाली रक्ताचे डाग आढळून आले. त्याचे नमुने त्यांनी घेतले आहेत. यामुळे हा खून बेडरूममध्येच झाल्याचा शिक्कामोर्तब पोलिसांनी केला आहे. 

 जयलक्ष्मीला चप्पल फेकले
संशयीत जयलक्ष्मी व सुरेशला पोलिस वाहनातून थेट गुरव यांच्या घरासमोर आणले. तेथे या दोघांना पाहताच मृत गुरव यांच्या बहिणी, भाच्यासह इतर नातेवाईकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दोघांनाही शिविगाळ करू लागले. पोलिसांनी नातेवाईकांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, हे सर्वजण इतके आक्रमक होते. त्यातील एका महिलेने जयलक्ष्मीच्या दिशेने चप्पलच फेकले. मृत गुरव यांच्याकडून बहिणींना सर्वदृष्टीने मोठी मदत होत होती. यामुळे त्यांच्याबद्दल बहिणी व भाच्यामध्ये वेगळी आपलुकी आहे. यामुळे बहिणी व भाच्याचा संताप यावेळी अधिक जाणवला. त्यांच्यासह इतर नातेवाईकांनीही जयलक्ष्मी, सुरेशवर शिव्यांची लाखोली वाहत होते. त्यांना घेवून वाहन गेल्यानंतरही ही लाखोली सुरूच होती. 

वाहनात घुसून मारण्याचा प्रयत्न
दरम्यान, सुरूवातीला चोथेला घरात नेवून चौकशीनंतर पुन्हा वाहनात बसविले. त्यानंतर जयलक्ष्मीला घरात नेले. तिच्याकडून चौकशी पूर्ण होताच तिला घेण्यासाठी वाहन मागे नेत असताना नातेवाईकातील एक तरूण वाहनाच्या खिडकीतून घुसून चोथेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वेळीच लक्षात आल्याने पोलिसांनी त्या तरूणाला बाजूला घेतले. 

महागावजवळ जाळले मृताचे कपडे
सोमवारी (ता. 6) रात्रीच मृतदेह आंबोलीच्या कावळेसाद दरीत टाकला. त्यावेळी त्यांच्या अंगावरील कपडे सुरेशने काढून घेतले होते. दुसऱ्या दिवशी सुरेशने महागाव (ता. गडहिंग्लज) येथे चंदगडरोडवरून अंतर्गत डोंगराकडे जाणाऱ्या सुमारे दोन किलोमीटरवरील निर्मनुष्य असलेल्या रामतीर्थनगर परिसरात हे कपडे जाळले. आजच्या चौकशीत त्याने ही घटना सांगितल्यानंतर पोलिस पथक व फॉरेन्सिक टिम महागावजवळच्या डोंगरात पोहचले. तेथे जळालेल्या कपडांचे तुकडे फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेतले आहेत. 

बेपत्ता बनावानेही वाढला संताप
सहा नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास विजयकुमार गुरव यांना कोणीतरी हाक मारली, त्यानंतर ते बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा अभिषेकने पोलिसात दिली होती. त्यानंतर पत्नी जयलक्ष्मी रोजच्याप्रमाणेच घरी वावरत होती.

दरम्यान, आठवड्यांनी मृतदेह सापडल्यानंतरही तिच्या हालचालीत फरक जाणवला नाही. परंतु सुरेश लगेचच बेपत्ता झाला. जसजसे सावंतवाडी पोलिस जयलक्ष्मीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते, त्याचा अंदाज घेतच ती चार दिवसापूर्वी बेपत्ता झाली. अखेर या दोघांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले. प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून उलट बेपत्ताचा बनाव रचल्याने नातेवाईकांच्या संतापात आणखीन भर पडल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com