बदली आदेश कागदावर "मास्तर' जिपच्या दारावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कोल्हापूर - आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश दिले असले, तरी गैरसोयीचे ठिकाण मिळालेल्या शिक्षकांनी शाळेत न जाता आजही जिल्हा परिषदेत गर्दी केली होती. त्यामुळे "बदलीचा आदेश कागदावर आणि मास्तर जिल्हा परिषदेच्या दारावर,' अशी आज परिस्थिती दिसत होती. 

दरम्यान, गैरसोयीचे ठिकाण मिळालेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी आज शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेऊन सोयीचे ठिकाण मिळण्यासाठी साकडे घातले. 

आंतरजिल्हा बदलीचा घोळ जवळपास गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या शिक्षकांना सोयीचे ठिकाण मिळावे, अशी अपेक्षा आहे. प्रशासन मात्र नियमानुसार सेवाज्येष्ठतेप्रमाणे बदल्या करण्यावर ठाम आहे. बदलीहून आलेल्या शिक्षकांपैकी 106 शिक्षकांना सोमवारी सेवाज्येष्ठतेनुसार पदस्थापना करण्यात आली. रात्रीच त्यांना बदलीचे आदेशही निर्गमित करण्यात आले. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना नेमणुका देण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. 

बदली करत असताना सेवाज्येष्ठतेबरोबरच ज्या शाळांमध्ये एकही शिक्षक नाही, अशा 33 शाळांमध्ये प्रथम शिक्षकांची नियुक्‍ती करण्याचा आग्रह प्रशासनाने धरला. बिनशिक्षकांच्या शाळांना किमान एकतरी शिक्षक मिळावा, हीच यामागची प्रशासनाची भूमिका होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शिक्षक संघटनांना तसे बोलूनही दाखविले. जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांसाठी की विद्यार्थ्यांसाठी, असा सवालही त्यांनी केला होता. 

""बदली झालेल्या ठिकाणी उद्या (ता. 26) पर्यंत शिक्षक रुजू झाले नाहीत, तर त्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल.'' 
डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद 

शिक्षकांनी मांडली गाऱ्हाणी 
बदलीचे आदेश मिळाल्यानंतर गैरसोय झालेल्या शिक्षकांपैकी काहीनी बदली केलेल्या गावांतील शाळांत न जाता थेट आज सकाळी जिल्हा परिषदेच्या दारासमोर हजर झाले. शिक्षण समिती सभापती अबंरीश घाटगे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. एवढी वर्षं बाहेरच्या जिल्ह्यात काढल्यानंतर आपल्या जिल्ह्यात किमान सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. घाटगे यांनी यामध्ये प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार त्यांनी प्रशासनाशीही चर्चा केली; मात्र प्रशासनाकडून त्यांना फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. 

Web Title: kolhapur news teacher zp