टेंबलाईवाडी शाळा दोन शिफ्टमध्ये !

संभाजी गंडमाळे
सोमवार, 4 जून 2018

दोन महिन्यांच्या सुटीनंतर आता नव्या शैक्षणिक वर्षाचे वेध लागले आहे. गेल्या काही वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांतील पटसंख्या वाढू लागली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर येथे भर दिला जातो आहे. या पार्श्‍वभूमीवर या शाळांतील सकारात्मक स्थित्यंतरं आणि या शाळांना बळ देणाऱ्या विविध उपक्रमांविषयी...

कोल्हापूर - तीनशेपैकी तीनशे गुण मिळवत गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या वर्धन माळीची टेंबलाईवाडी विद्यालय ही शाळा आता दोन शिफ्टमध्ये भरणार आहे. दोन दिवसांत याबाबतचा प्रस्ताव शाळा प्राथमिक शिक्षण मंडळाला देणार असून वर्गखोल्याच यंदा कमी पडत असल्याने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्‍यता आहे.  

महापालिका असो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांनी काही वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला आहे. प्रत्येक वर्षी पटसंख्या वाढू लागली आहे. या शाळांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेच्या जरगनगर शाळेला दोन शिफ्ट कराव्या लागल्या होत्या. आवश्‍यक वर्गखोल्या बांधून झाल्यानंतर पुन्हा ही शाळा नियमित वेळेत भरू लागली. यंदा टेंबलाईवाडी विद्यालयाची पटसंख्या वाढल्याने चार वर्गखोल्या कमी पडणार आहेत.

त्यामुळे दोन शिफ्टमध्ये शाळेचे वर्ग भरवण्याशिवाय शाळेपुढे दुसरा पर्यायच नाही.  गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत टेंबलाईवाडी विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी राज्य तर सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा यादीत स्थान मिळवले. शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्व क्रीडाप्रकारांत यश मिळवत जनरल चॅम्पियनशिप उपविजेतेपद तर कवायतीसह विविध सांस्कृतिक स्पर्धांतही घवघवीत यश मिळवले. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून शाळेत शिक्षण दिले जाते. शाळेला केंद्र सरकारच्या उपक्रमातून आधुनिक प्रयोगशाळा मंजूर झाली असून लवकरच त्याचे काम सुरू होईल. ई-लर्निंगची सुविधाही शाळेत उपलब्ध आहे.  

  • टेंबलाईवाडी शाळेची गेल्या वर्षीची पटसंख्या     ६८६
  • पहिलीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी सुमारे     १०० 
  • आवश्‍यक वाढीव वर्गखोल्या     ४
  • महापालिकेच्या एकूण शाळा     ५९
  • एकूण पटसंख्या     १२,०००
Web Title: Kolhapur News Tembaliwadi school special