स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेले मंदिर

स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेले मंदिर

राधाकृष्ण मंदिर - कोल्हापूरकरांनीच पाहण्याची गरज 
कोल्हापूर - मंदिराच्या इतिहासापेक्षा, मंदिराच्या पावित्र्यापेक्षा अलीकडे मंदिराच्या देखणेपणाला महत्त्व आले आहे. मंदिराला संगमरवरी फरश्‍या, शिखरावर सोन्याचा कळस, महाप्रसादाला पंचपक्वान्न आणि देवाचं सिंहासन, पालखीला सोने-चांदी म्हणजे ते मंदिर ‘भारी’ अशी ओळख ठरू लागली आहे. अशा नव्या ओळखीमुळे सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा असलेली मंदिरे त्यांची ओळख हरवून बसली आहेत. मंगळवार पेठेत पद्माळा परिसरातील राधाकृष्ण मंदिराच्या वाट्याला नेमके हेच आले आहे.

सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि चक्क स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असलेले हे मंदिर कोल्हापूरकरांनीच पाहण्याची गरज आहे. कारण आपल्या गावाचाच इतिहास, भूगोल आपल्याला माहीत नसेल तर ‘लय भारी कोल्हापूर’ म्हणण्याला अर्थच राहणार नाही.हे मंदिर पद्माळा तलावाच्या काठावर होते. आता तेथे तलाव नाही, तर क्रीडा संकुल आहे. या परिसरात या मंदिराचे शिखर आजही लांबवरून दिसते. शिंदेशाही पगडीतल्या राजाची या शिखरावर प्रतिमा आहे. कौलारू छत, त्यावर शिखर, मंदिराभोवती घोड्याच्या पागा व मंदिरात राधाकृष्णाची सुबक मूर्ती.

१८५७ मध्ये कोल्हापुरात क्रांतिकारक उठाव झाला. कोल्हापूर नेटिव्ह इन्फन्ट्री पलटणीतल्या सैनिकांनी बंड केले. ३१ जुलै १८५७ ला हा उठाव झाला. उठावानंतर पलटणीतल्या जवानांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर चाल केली. ही निवासस्थाने रेसिडेन्सीत म्हणजे आताच्या ताराबाई पार्कात होती. सैनिकांची ही चाल ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रोखली. त्यामुळे सैनिकांना माघार घ्यावी लागली; पण या बंडखोर सैनिकांनी त्यावेळी पद्माळा तलावाजवळच्या राधाकृष्ण मंदिरात आश्रय घेतला. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या मंदिरावर हल्ला केला. बंडखोर सैनिकांना पकडणे हा त्यांचा हेतू होता. 

यावेळी मोठी चकमक उडाली. गोळीबार झाला. अनेक बंडखोर सैनिक जखमी झाले. काही धारातीर्थी पडले. गोळीबारात कृष्णाच्या मूर्तीचा ओठ तुटला. अलीकडे पुन्हा या मूर्तीला मूळ स्वरूप देण्यात आले.

अनेकजण अनभिज्ञ
या मंदिरात स्वातंत्र्य चळवळीतला मोठा थरार घडला; पण या मंदिराचे महत्त्व या परिसरातले रहिवासी वगळता अन्य कोणालाही नाही. त्यामुळे या मंदिरात स्वातंत्र्य लढ्याचा क्रांतिकारी इतिहास घडला हे सांगितले तर अनेकांना पटत नाही. कोल्हापुरातल्या नव्वद टक्के लोकांनी कधी या मंदिराला पायही लावलेला नाही. या परिस्थितीत कोल्हापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीचा वारसा हळूहळू दडला गेला तर आश्‍चर्य वाटणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com