श्रमुदचे संपत देसाईंना धमकीचे पत्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

आजरा -  श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रातून त्यांना हिसका दाखवू, अशी धमकी दिली आहे. पत्र निनावी असून त्यावर हिंदुत्ववादी असा उल्लेख आहे.

आजरा -  श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रातून त्यांना हिसका दाखवू, अशी धमकी दिली आहे. पत्र निनावी असून त्यावर हिंदुत्ववादी असा उल्लेख आहे.  या धमकीच्या पत्राचा डाव्या पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनांनी निषेध केला आहे. दरम्यान, आज त्यांनी व पुरोगीमी कार्यकर्त्यांनी आजरा पोलिसात जावून याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

दोन दिवसापुर्वी त्यांना घरी धमकीचे पत्र आले. ते आज त्यांना मिळाले. त्या पत्रातील मजूकर असा, कम्युनिष्टांच्या, विद्रोहीवाल्यांच्या नादाला लागून तुझी नाटक चालली आहेत. तुमच्या विद्रोहीवाल्यांना कोणीही विचारत नाही. जादा नाटक करू नको, मर्यादेत वाग नाहीतर तुला हिसका दाखवू. आजरेकर फडाबद्दल कार्यक्रम घेवून वारकऱ्यांना फितवण्याचा प्रयत्न बंद करावा. आता राज्य व देशातील जनतेन हिंदुत्वाला डोक्‍यावर घेतले आहे. तुमचे कम्युनिष्ट व विद्रोही विचार कुठे चालणार. 

दरम्यान, आज येथील श्रमिक मुक्तीदलाच्या कार्यालयात विद्रोही व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत या भ्याड कृतीचा निषेध करण्यात आला. प्रा. राजा शिरगुप्पे, प्रा. सुनिल गुरव, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, संजय तर्डेकर, संग्राम सावंत यांनी आपले विचार मांडले.

कॉ. संपत देसाई म्हणाले, ""धरणग्रस्त, दिव्यांग, वंचित घटकांसाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. गेली पंचवीस वर्षे धरणग्रस्त, शेतमजूर, डंगे धनगर यांच्यासाठी लढत आहे. विचाराने विचाराशी लढावे. पण या काही वर्षात सनातनी प्रवृत्तींनी विचारवंतावर हल्ले सुरु केले आहे. डॉ. दाभोळकर, कॉ.पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यावर हल्ले करणारी ही प्रवृत्ती आहे.''

शंकर पावले, प्रकाश कांबळे, प्रकाश मोरुजकर, मायकेल फर्नांडीस, नारायण भडांगे, विष्णू मांजरेकर यासह पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. 

आजऱ्यात 5 ला निषेध, निर्धार मेळावा 
या पार्श्‍वभूमीवर पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींतर्फे 5 नोव्हेंबरला येथील बाजारमैदानात निषेध व निर्धार मेळावा होत आहे. या मेळाव्यात राज्यातील विचारवंत सहभागी होवून मते मांडतील. 

अशा विचारधारेंना मी भिक घालणार नाही व धमक्‍यांनाही घाबरणार नाही. याचे उत्तर माझ्या कामावर निष्ठा ठेवलेली जनता देईल. 
- कॉ. संपत देसाई, राज्य संघटक, श्रमुद 

Web Title: Kolhapur News Threatening letter to Sampat Desai