कोल्हापूरात वनक्षेत्रपालांसह तिघे निलंबित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

तपासणी होणार या भीतीने जुन्या खड्ड्यातच ३२० झाडे लावल्याच्या कारणावरून करवीर वनक्षेत्रपाल विश्‍वजित जाधव, हातकणंगले वनपाल वसंत चव्हाण, वनरक्षक मारुती ढेरे व तमदलगे वनरक्षक सुप्रिया मदने यांना मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी निलंबित केले.

कोल्हापूर - करवीर वनक्षेत्रात येणाऱ्या मौजे आळते व मौजे घोसरवाड येथे केलेल्या वृक्षलागवड कागदोपत्री दाखवली आहे. तसेच जी वृक्षलागवड केली ती रोपे करपून गेली आहेत. 
दरम्यान, तपासणी होणार या भीतीने जुन्या खड्ड्यातच ३२० झाडे लावल्याच्या कारणावरून करवीर वनक्षेत्रपाल विश्‍वजित जाधव, हातकणंगले वनपाल वसंत चव्हाण, वनरक्षक मारुती ढेरे व तमदलगे वनरक्षक सुप्रिया मदने यांना मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी निलंबित केले.

राज्यात १६ टक्के असणारे वनक्षेत्र ३३ टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तीन वर्षांत राज्यातील ५० कोटी वृक्षरोपण केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर करवीर वनक्षेत्रात मौजे आळते येथे २७०० हून अधिक आणि मौजे घोसरवाड येथे ४१०० हून अधिक वृक्षलागवड केल्याची कागदोपत्री दाखवले आहे. खड्डे खोदाई, शेणखत, गाळमाती यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे, मात्र हा सर्व खर्च खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे व घोसरवाड येथे निदर्शनास आले. जी झाडे लावली ती करपून गेली आहेत. 

दरम्यान, सोमवार (ता. ११) या कामाची तपासणी 
करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी येणार होते. याची कुणकुण लागताच अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत ३२० हून अधिक वृक्षांची लागवड केली. त्यामुळे या सर्वांची तपासणी करून मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी आज करवीर वनक्षेत्रपाल विश्‍वजित जाधव, हातकणंगले वनपाल वसंत चव्हाण, वनरक्षक मारुती ढेरे व तमदलगे वनरक्षक सुप्रिया मदने यांना 
निलंबित केले.

जुन्या खड्ड्यात ३२० नवीन झाडे
आळते व घोसरवाड येथील वनक्षेत्रातील करपलेल्या आणि कागदोपत्री दाखवलेल्या वृक्षांची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी ११ डिसेंबरला येणार होते. या पार्श्‍वभूमीवर वनअधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत ९ व १० डिसेंबरला जुन्या खड्ड्यात ३२० नवीन झाडे लावली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मधून ११ डिसेंबरला प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे तपासणी अधिकाऱ्यांनाही याची सखोल चौकशी करावी लागली.

Web Title: Kolhapur News three forest labors suspended