दारूच्या नशेत धिंगाणा; तीन पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - गगनबावड्यातील रुग्णालयात मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याप्रकरणी आज तीन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी निलंबित केले. हवालदार प्रवीण काळे, इजाज गुलाब शेख आणि अमोल अनिल पाटील अशी त्यांची नावे असल्याचे गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी सांगितले.

कोल्हापूर - गगनबावड्यातील रुग्णालयात मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याप्रकरणी आज तीन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी निलंबित केले. हवालदार प्रवीण काळे, इजाज गुलाब शेख आणि अमोल अनिल पाटील अशी त्यांची नावे असल्याचे गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी सांगितले.

हवालदार काळे, शेख आणि पाटील जवळपास २२ मित्रांसह ११ जून २०१७ ला गगनबावड्याला फिरायला गेले होते. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले. पाण्यात खेळत असताना एकाच्या पायाला काच लागली. उपचारासाठी सर्वजण गगनबावडा येथील  एका रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी धिंगाणा घालण्यास सुरवात केली. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर लघुशंकाही केली. त्यांचा हा धिंगाणा रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला. याबाबत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १५ दिवसांनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना दिले. त्यानुसार शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यामार्फत चौकशी सुरू झाली. दरम्यान, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांनी रुग्णालयात केलेल्या धिंगाण्याचे सीसीटीव्हीतील चित्रीकरण पोलिस प्रशासनासह थेट गृहविभागाकडेही पाठविले होते.

पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबंधित पोलिसांचे जबाब नोंदवले. त्याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला. अहवालात ते तिघे दोषी आढळले. त्यानुसार तिघांना पोलिस अधीक्षक मोहिते यांनी निलंबित केले. ही कारवाई आज पोलिस दलात चर्चेचा विषय बनली होती.

दोघांचे यापूर्वीही निलंबन?
निलंबित केलेल्यांपैकी दोघांचे यापूर्वीही निलंबन झाले होते, अशी चर्चा पोलिस वर्तुळात दिवसभर सुरू होती. पोलिस खात्याची बदनामी नको म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांनी निलंबनाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास टाळाटाळ केली.

निलंबित झालेले
हवालदार प्रवीण काळे -
(बक्कल नंबर १४४, सध्या नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष)
इजाज गुलाब शेख 
(बक्कल नंबर १२०५, सध्या नेमणूक गगनबावडा  पोलिस ठाणे)
अमोल अनिल पाटील -
(बक्कल नंबर ९२२, सध्या नेमणूक करवीर पोलिस ठाणे)

Web Title: kolhapur news three police suspend