तंबाखू सेवन करणाऱ्यांत कर्करोगाची पूर्वलक्षणे

तंबाखू सेवन करणाऱ्यांत कर्करोगाची पूर्वलक्षणे

कोल्हापूर - ज्या व्यक्तींना दहा ते पंधरा वर्षे विविध मार्गांनी तंबाखू सेवनाची सवय आहे, अशा व्यक्तींमध्ये कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळली आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात १०० पैकी ६० लोकांना तंबाखूची सवय असून, शहरी भागात सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 

१ ते ३१ डिसेंबरदरम्यान सुरू असणाऱ्या मोफत मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तंबाखू सेवनाचे हे भीषण चित्र समोर आले आहे. ३१ डिसेंबरला सर्वेक्षणाद्वारे आकडेवारीचे जेव्हा विश्‍लेषण केले जाईल, तेव्हा तंबाखू सेवनामुळे मौखिक आरोग्यावर काय गंभीर परिणाम झालेत, त्याचे विदारक चित्र समोर येईल. महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील १.२५ कोटी लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यात सीपीआर रुग्णालयातर्फे १ डिसेंबरपासून मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेस प्रारंभ झाला. यामध्ये सर्व ३० वर्षांवरील स्त्री-पुरुषांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, नगरपालिका, महापालिका रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मौखिक आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाने केले. 

तंबाखू सेवन हे तंबाखू मळून खाणे, सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्का, पानमसाला, गुटखा, खैनी, मिश्री (मशार), सुपारीद्वारे केले जाते. मिश्रीच्या सवयीमुळे ग्रामीण भागात महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अनेक महिला दिवसातून दहा ते १५ वेळा मिश्री (मशार) लावतात. यासाठी सकाळी विस्तवावर तंबाखू भाजून डबा भरून ठेवला जातो. अनेकदा तर मिश्री लावून तोंड न धुताच चहा पिणे, जेवणे असे प्रकार केले जातात. यामुळे मौखिक आरोग्याची तर वाट लागतेच, शिवाय भाजलेल्या तंबाखूचे कण पोटातही जातात. अनेकांना तंबाखू सेवन केल्याशिवाय चैन पडत नाही. तंबाखू मिळाला नाही, तर हे लोक अस्वस्थ होतात.

डॉ. बांगर म्हणाल्या, ‘‘तंबाखू सोडण्यासाठी आपण तंबाखू खाणाऱ्यास सतत कामात व्यस्त ठेवणे, एक ते १०० अंक मोजणे, भरपूर पाणी पिणे, चणे, शेंगदाणे, बडीशेप, कुरमुरे खायला देणे, गरजेनुसार औषधोपचार देणे याबरोबरच समुपदेशन करू शकतो.’’ 

ज्यांच्यामध्ये कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळली आहेत, त्यांची बायोप्सी करण्यात येईल. कर्करोग झाला आहे, हे सिद्ध झाल्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर सेंटरमध्ये संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात येतील. याअंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांतील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
- डॉ. शिल्पा बांगर, जिल्हा सल्लागार

कर्करोगाची पूर्वलक्षणे
जीभ, ओठ, हिरड्या, टाळू, गालांवर पांढरे चट्टे उमटणे, तोंड पूर्णपणे न उघडणे, १५ दिवसांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी तोंडातील जखम, गिळताना त्रास आणि वेदना होणे, तिखट पदार्थ सहन न होणे ही कर्करोगाची पूर्वलक्षणे आहेत.

तंबाखूमुळे काय होते?
दमा, हृदयरोग, टीबी, लकवा, नपुंसकता, वंध्यत्व, मोतीबिंदू, गॅंगरीन, मधुमेह होतो. डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात. दातांची समस्या, वास घेण्याची क्षमता कमी होते, घोटे काळे पडतात. तोंड, फुफ्फुसे, गळा, स्वरयंत्र, अन्ननलिका, पोट, मूत्राशय, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो.  

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...
मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तंखाबू खाणाऱ्याला तंबाखूचे व्यसन करतो आहोत, याची अजिबात जाणीव नसते. थोडीफार असली तरी तो दुर्लक्ष करतो. कुटुंबात, मित्रमंडळींसमोर, रस्त्यावर उभे राहून, कार्यक्रमांमध्ये, लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्तींसमोर, कार्यालयामध्ये, काम करत असताना कसलाही विधिनिषेध न बाळगता तो तंबाखू सेवन करतो. समाजात मद्य पिणे हे जसे व्यसन मानले, तसे तंबाखू हे व्यसन आहे, हे अनेकजण मान्यच करत नाहीत. तंबाखू खाताना शेजारील व्यक्तीला किळस वाटते, तेव्हा तंबाखू खाऊ नये, अशी भावनाच या व्यक्तीमध्ये निर्माण होत नाही. जे लोक तंबाखू खातात, त्यांच्या तोंडाचा किळसवाणा वास तर येतोच, पण हे लोक जवळून गेले तरी त्यांच्या अंगाला तंबाखूचा वास येतो. तंबाखू खाणारे लोक वैयक्तिक स्वच्छतेबाबतही उदासीन असतातच. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणेही घाण करून टाकतात
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com