टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 

टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 

कोल्हापूर - शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्ड आवारातील घाऊक भाजीपाला बाजारात आज दहा किलो टोमॅटोचे भाव १०० ते ३७० रुपये होते. किरकोळ बाजारात टोमॅटोला ४० ते ४५ रुपये किलोचा रास्त भाव होता; मात्र काही विक्रेत्यांनी दुप्पट ते अडीच पट दराने म्हणजेच ६० ते ९० रुपये प्रतिकिलो विक्री करीत ग्राहकांची लूट केली आहे. या लुटीवर कोणाचे, कसलेच नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य ग्राहकाला टोमॅटो नको; पण भाव आवर म्हणण्याची वेळ आली आहे. 

गेल्या पंधरा दिवसांत राज्यभर पावसाने दमदार हजेरी लावली. यात नाद्या-नाल्यांना पूर आल्याने भाजीपाल्याची काढणी व वाहतूक थांबली; त्यामुळे पुरेशा प्रमाणात भाजीपाल्याची आवक बाजारात झाली नाही. अशात काही भागांत टोमॅटो उत्पादन कमी आणि मालाची कमी आल्यामुळे भाव वाढले. असा प्रकार नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे बाजारपेठांत घडला. तेथील बाजारपेठांत ८० ते १०० रुपये किलो भावात टोमॅटो विकला गेला. याची माहिती सोशल मीडियावरून कोल्हापुरातही पोचली, तेव्हा कोल्हापुरात टोमॅटोची आवक पुरेशी असूनही मंडईतील काही विक्रेत्यांनी ६० ते ८० रुपये किलोपर्यंत टोमॅटोची विक्री केली. 

वास्तविक घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे घेतलेला टोमॅटो ३ ते ८ किलोमीटर परिघातील किरकोळ बाजारपेठेत आणण्यासाठी वाहतूक ३ ते ५ रुपये, घटतूट ५ रुपये, नफा ५ रुपये धरून ४० ते ४५ रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री रास्त होती; मात्र दूरवर कोठे तरी झालेल्या टोमॅटो भाववाढीच्या संधीचा लाभ उठवण्याच्या उद्देशाने ही लूट केली. याच वेळी अनेक विक्रेत्यांनी ४० ते ४५ रुपये किलोनेच टोमॅटो विकून काहीसा प्रामाणिकपणा जरूर जपला आहे. 

शहरात दहा मंडया आहेत. यात ७० ते ८० टक्के भाजीपाला मंडईमध्ये घाऊक बाजारातून भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. प्रत्येक पातळीवर कमिशन दिले जाते. तेव्हा भाजीपाल्याचे भाव वाढतात, हे सूत्र जरी खरे असले तरी नफा किती घ्यावा, याचा कसलाचा धरबंध नाही, त्यामुळे भाजीपाला खरेदी-विक्रीत सर्रास लूट होते. 

अनेकदा रेल्वे फाटकावर टोमॅटोचे भाव ४० रुपये किलो असतो,. तर शिवाजी चौक मंडईत हाच भाव ५० रुपये किलो असतो. तर काही भाज्यांचे भाव ३० रुपये किलो शिवाजी चौकात भाव असेल, तर इतर मंडईत त्याच भाजीचे भाव ४० रुपये किलो असतात, ज्यांना भाजी कमी भावात मिळाली. त्यांचे काही म्हणणे असत नाही; पण ज्यांना जादा भावात भाजी मिळाली त्यांची ओरड सुरू होते.

असा बसतो ग्राहकांना भुर्दंड
मंडईतील भाजीपाला बाजारपेठेत भावाचा एकसूत्रीपणा नसल्याने ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागतो. भाजीपाल्याचे बहुतेक भाव अस्थिर असतात, ज्या मालांची आवक वाढते, तेव्हा भाव पडतात. आवक कमी झाली, की भाव वाढतात. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव सतत बदलत राहतात. एका आठवड्यात वांगी महाग, तर दुसऱ्या आठवड्यात वांग्याचे भाव कमी होतात. साधारण चढे दर तीन ते पाच दिवस राहतात. यात टोमॅटो हा इतर भाज्यांच्या तुलनेत नाशवंत आहे. किरकोळ विक्रेत्याने खरेदी केला. तो एका दिवशी विकून संपला नाही, तर नुकसान होते, असे सांगत काहीजणांनी भाव वाढवून लावला; मात्र त्यासाठी दोन-तीन रुपये जादा दर समजता येईल; पण चक्क दहा ते वीस रुपये चढ लावल्यामुळे ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते.    

दरवाढीचे वास्तव
गेल्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक २० ते ३० गाडांनी घटली. 
सीमा भागातून टोमॅटोची आवक कमी झाली.
वाळवा तालुक्‍यातून येणारा भाजीपाला कमी झाला.
किरकोळ बाजारात काही ठिकाणी रास्त, तर काही ठिकाणी चढे भाव होते.
काही विक्रेत्यांनी दुप्पट दराने टोमॅटो विकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com