त्सुनामीग्रस्त फुटबॉलपटूंची संघर्ष एक्स्प्रेस

त्सुनामीग्रस्त फुटबॉलपटूंची संघर्ष एक्स्प्रेस

कुटुंब गमावलेल्या मुलींचा प्रेरणादायी प्रवास; खेळाबरोबरच करिअरसाठीही धडपड 
कोल्हापूर - फुटबॉलपटू एस. प्रदीपा ही फॉरवर्डची खेळाडू आणि फिजिक्‍समधून पीएच.डी.ची तयारी करणारी, के. राधिका ही मध्यफळीत उत्कृष्ट पास देणारी व एम. कॉम.मधून एम. फिल. करणारी, के. सुमित्रा कामराज ही मध्यफळीत खेळणारी आणि वाणिज्य शाखेतून एम. फिल.चा अभ्यास करणारी... त्सुनामीच्या तडाख्यात ज्यांनी आपले आई-वडील गमावले, त्या तमिळनाडूतील कुडलोर येथील इंदिरा गांधी ॲकॅडमी फॉर स्पोर्टस्‌ ॲण्ड एज्युकेशनकडून (आयजीएएस) खेळणाऱ्या या तीन खेळाडू. केवळ फुटबॉल नव्हे, तर शिक्षणातून आपल्या करिअरला आकार देण्यासाठी धडपडणाऱ्या. 

त्सुनामीच्या तडाख्यात २६ डिसेंबर २००४ ला कोणी आई-वडील, कोणी भाऊ, बहीण, तर कोणी काका, मामा यांना गमावले. इंडोनेशिया, श्रीलंका, भारत व थायलंडसह १४ देशांतील दोन लाख ३० हजार लोक मृत्युमुखी पडले. तमिळनाडूच्या पूर्व व दक्षिण किनाऱ्यावरही त्सुनामीचा तडाखा बसला. त्यात हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. प्रदीपा, राधिका व सुमित्रा यांनीही आपल्या पालकांना गमावले आणि त्यांच्या जगण्याचा नवा प्रवास सुरू झाला. शासनाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. मरिअप्पन यांनी त्सुनामीत पालक गमावलेल्या ३३ मुलींना दत्तक घेतले आणि ॲकॅडमीमध्ये ऑमुलींचा फुटबॉल संघ सुरू केला. तत्पूर्वी, केवळ मुलांचा फुटबॉल संघ होता. 

मुलींच्या संघात या तिन्ही खेळाडूंनी फुटबॉलमधील तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. फुटबॉलमधील त्यांनी आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांची मने जिंकताना शिक्षणातही तितकेच मनापासून लक्ष दिले. एखाद्या क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळविताना शिक्षणाची पाटी कोरीच, अशीच बहुतेक खेळाडूंची स्थिती असते. दहावी-बारावी अथवा पदवी मिळविण्यात चालढकल करीत शिक्षण घेणे, हेच त्यांचे ध्येय असते. मात्र, ही परिस्थिती या तिन्ही खेळाडूंनी आपल्यावर ओढवू दिली नाही. सेंट जोसेफ महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आता त्या वेलोर येथील तिरुवेलूर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. 

विशेष म्हणजे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी फुटबॉल स्पर्धा गाजविण्यात ॲकॅडमीच्या खेळाडू कधीच कमी पडत नाहीत. सलग चार वर्षे या खेळाडूंनी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीचे विजेतेपद पटकावले आहे. साऊथ झोन सीनिअर नॅशनल स्पर्धेत खेळाडूंनी संघाला विजयी केले आहे. इंडियन वुमेन्स लीगच्या पात्रता फेरीत सलग दुसऱ्यांदा इंदिरा गांधी ॲकॅडमी फॉर स्पोर्टस्‌ ॲण्ड एज्युकेशन खेळत असून, ॲकॅडमीच्या खेळाडूंनी आजपर्यंतच्या सामन्यात समाधानकारक कामगिरी केली आहे. सुमित्रा, राधिका व प्रदीपा यांनी उत्कृष्ट खेळ करीत प्रेक्षकांची वाहवाही मिळवली आहे. तसेच, ‘एसआरपी’ म्हणून संघात ओळख असलेल्या या खेळाडूंच्या करिअरची धडपड पाहून अनेकांना त्यांचा अभिमानही वाटत आहे. 

स्पर्धा परीक्षेचीही तयारी
त्सुनामीच्या तडाख्यात कुटुंब गमावलेल्या मुलींपैकी व्ही. वनिता, के. इंदूमती, एस. सुरनिया, के. तेनमोली यांनी पोलिस उपनिरीक्षक, आर. पद्मावती, आर. रमिया व व्ही. अँजलक्ष्मी काँन्स्टेबलपदी तमिळनाडूत कार्यरत आहेत. ॲकॅडमीतील मुली स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी करीत असल्याचे मरिअप्पन यांनी सांगितले. 

पदरमोड करून ॲकॅडमीचे काम
माजी मंत्री जी. के. मुपनार यांच्या प्रमुख उपस्थितीत १९९१ मध्ये ॲकॅडमीचे उद्‌घाटन झाले. मरिअप्पन, त्यांची पत्नी आशालता, मुले सुदीलकुमार, ओमप्रकाश यांच्या देखरेखीखाली ॲकॅडमीचे काम सुरू आहे. मरिअप्पन हे निवृत्तीपर्यंत वेतनातून ॲकॅडमीचा खर्च पेलत होते. ते आता पदरमोड करून व निधी मिळवून ॲकॅडमीचे काम पाहत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com