तिलारी घाटात दोन पुरुषांचे सांगाडे

तिलारी घाटात दोन पुरुषांचे सांगाडे

चंदगड - तिलारी घाटात कोदाळी (ता. चंदगड) गावच्या हद्दीत दोन ठिकाणी दोघा अनोळखी पुरुषांचे सांगाडे सापडले. दोन किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही मृतदेह सडलेल्या स्थितीत होते. घाट रस्त्याची दुरुस्ती करताना मजुरांना कुजल्याचा वास आल्याने खात्री केली असता काल एक मृतदेह सापडला. तरीही वास येऊ लागल्याने आज पुन्हा पोलिसांनी तपास केला असता दुसरा मृतदेह सापडला.

गुरुवारी (ता. ४) कोदाळी या रस्त्यावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल कांबळे (रा. माडवळे, ता. चंदगड) व ट्रॅक्‍टरचालक शिवाजी खणगुतकर यांना कुजल्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी मागोवा घेतला. जयकर कॉलनीच्या पश्‍चिमेकडील बाजूस पुरुषाचा मृतदेह दिसला. त्यावर त्यांनी पोलिसपाटील सदानंद सुतार यांना मोबाईलवरून माहिती दिली. त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील, कॉन्स्टेबल दीपक पाचवडेकर, दिलीप येसादे, संग्राम पाटील, संतोष वडेकर, शैलेश शिंदे, मुसा मुजावर, हणमंत नाईक यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली. मृतदेहाचे अवशेष गोळा करून ते उत्तरीय तपासणीसाठी आणले.

दरम्यान कुजलेला वास न थांबल्याने रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांनी पुन्हा शोध घेतला असता गुरुवारी सापडलेल्या मृतदेहापासून दोन किलोमीटर अंतरावर दुसरा मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आज हा मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह अर्धवट कुजलेल्या व सडलेल्या स्थितीत आहेत. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिस निरीक्षक अशोक पवार अधिक तपास करीत आहेत.

आंबोलीतील आठवण....
दोन महिन्यांपूर्वी आंबोली येथील कावळेसादच्या दरीत अशाच प्रकारे चुलत भाऊ व बहिणीचा मृतदेह सापडला होता. तेथील वाढते अनैतिक प्रकार थांबवण्यासाठी आंबोली पोलिसांनी कडक धोरण अवलंबल्याने संशयितांनी या भागाचा आधार घेतला असावा, असा संशय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com