कोल्हापूरात पाणी शुद्धीकरणाचे विनापरवाना कारखाने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पॅकेजिंग असोसिएशनने ४२ विनापरवाना व्यवसायांची यादीच अन्न-औषध प्रशासनाकडे दिली आहे. प्रामुख्याने हातकणंगले तालुक्‍यात असे उद्योग सुरू असल्याचे या विभागाच्या ध्यानात आले आहे. 

कोल्हापूर - वीस रुपयांची शुद्ध पाण्याची बाटली घेत असताना माणसाचा जीव वरखाली होत असताना कूपनलिकेचे पाणी हेच शुद्ध पाणी समजून त्याची विक्री करणाऱ्या व्यवसायाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. पॅकेजिंग असोसिएशनने ४२ विनापरवाना व्यवसायांची यादीच अन्न-औषध प्रशासनाकडे दिली आहे. प्रामुख्याने हातकणंगले तालुक्‍यात असे उद्योग सुरू असल्याचे या विभागाच्या ध्यानात आले आहे. 

असोसिएशनने जी यादी दिली आहे, त्यातील नेमके किती व्यवसाय विनापरवाना आहेत, याची खात्री करूनच कारवाई होणार असल्याचे ‘अन्न-औषध’कडून सांगण्यात आले. पाणी प्रदूषणामुळे अलीकडे शुद्ध पाण्याचे कॅन आणि बाटलीबंद पाणी घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्‍स, रुग्णालये, कार्पोरेट कार्यालये येथे कॅनमधील पाण्याचा वापर होतो. कॅनमधील पाणी याचा अर्थ ते शुद्धच असते, असा अनेकांचा गैरसमज आहे.

कमी भांडवलात पैसे मिळवून देणारा उद्योग म्हणून याकडे अनेक जण वळले. पाणी शुद्धीकरणाचे जे नियम आहेत, मानांकन आहे, त्याचा विचार न करता पाणी शुद्धीकरणाचे कारखाने टाकले गेले. मुलाच्या हाताला काम नाही म्हणून उद्योग टाकून दिला, अशी कारणे अन्न-औषधच्या अधिकाऱ्यांना नमुने घेताना सांगण्यात आले. पाण्याचे नमुने घेतले गेले, त्यावेळी त्यात ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले. गंगा मिनरल, स्वामी समर्थ पेयजल, एएसआय रिच, प्राईम ॲक्वा या व्यवसायावर कारवाई होऊन त्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

विनापरवाना व्यवसायांना काही ठिकाणी देवदेवतांची नावे देण्यात आली आहेत. जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात, पाणी शुद्धीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळतात, त्यांना विनापरवाना व्यवसायांची झळ बसल्यानंतर ही मंडळी आता जागी झाली आहेत. यादीत हातकणंगले, इचलकरंजी परिसरातील विनापरवाना व्यवसायांची संख्या अधिक आहे.

पॅकिंग होते म्हणून शुद्ध कसे...

शुद्ध पाण्याच्या नावाखाली फसवणूक राजरोसपणे सुरू आहे. पाण्यासारखा पैसा तोही कमी भांडवलात डोळ्यांसमोर दिसू लागल्याने अलीकडच्या पाच-सहा वर्षांत या व्यवसायाची संख्या वाढत गेली. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची गरज अधिक असते. त्यावेळी उद्योग-व्यवसाय जोरात चालतात. पर्यटक हे नेहमी बाटलीबंद पाण्याला पसंती देतात. पाणी नेमक्‍या कोणत्या कंपनीचे आहे, त्याची खात्री केली जात नाही. बाटलीबंद असो अथवा कॅन, एखादी विहीर अथवा कूपनलिकेला कनेक्‍शन जोडून पाणी फिल्टर केले जाते. याच पाण्याचे पॅकिंग होते आणि ते शुद्ध पाणी म्हणून विकले जाते.

Web Title: Kolhapur News Unauthorized water treatment plants