कोल्हापूर आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये उकाड्याने रूग्ण बेजार

डॅनियल काळे
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - आजाराने बेजार आणि उकाड्याने हैराण होण्याची वेळ महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची झाली आहे. शहरातील तापमान वाढत आहे. पण या रुग्णालयात पंखेच नाहीत. त्यामुळे रुग्णाला हाताचा, कपड्याचा अथवा पेपरचा पंखा करून वारे घालत बसण्याची वेळ नातेवाइकांवर येत आहे. महापालिकेने येथे किमान पंखे तरी बसवावेत, अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईकांकडून केली जात आहे.

कोल्हापूर - आजाराने बेजार आणि उकाड्याने हैराण होण्याची वेळ महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची झाली आहे. शहरातील तापमान वाढत आहे. पण या रुग्णालयात पंखेच नाहीत. त्यामुळे रुग्णाला हाताचा, कपड्याचा अथवा पेपरचा पंखा करून वारे घालत बसण्याची वेळ नातेवाइकांवर येत आहे. महापालिकेने येथे किमान पंखे तरी बसवावेत, अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईकांकडून केली जात आहे. तुम्हीच घरातून पंखा घेऊन या, असा सल्ला नातेवाइकांना दिला जात आहे. 

आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये साथरोगावर उपचार केले जातात. येथे ३६ खोल्या आहेत. सध्या येथे २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाची इमारत ही आरसीसी आहे. त्याचा स्लॅब अंदाजे दहा फूट उंचीवर आहे. रणरणत्या उन्हामुळे दिवसभर ही इमारत उन्हाने तापत आहे. त्यामुळे दिवसभर आणि रात्रीही येथे प्रचंड उष्मा आहे. पंखे नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक यांचा जीव कासावीस होत आहे. रुग्णाला हातात कापड, पेपर घेऊन वारे घालत बसण्याची वेळ नातेवाइकांवर आली आहे. रुग्णालयाकडे तक्रार केली तर रुग्णालयात पंखा नाही, असे सांगितले जाते. 

कोणी मदतीला येईल का?
महापालिकेची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. त्यात येथे तातडीने काही करता येत नाही. प्रस्ताव, निविदा, मंजुरी या प्रक्रियेत हिवाळा आला तरी पंखे बसणार नाहीत. त्याऐवजी शहरातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढाकार घेउन येथे किमान पंखे भेट दिले तर समस्या सुटू शकेल.

तीन वर्षे पंखे नाहीत
या रुग्णालयातील खोल्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पंखे नाहीत. रुग्णांना उकाड्याने तर हैराण व्हावे लागतच आहे, त्याशिवाय डासांचा उपद्रवही मोठा आहे. त्यामुळे आजारपण बरे, पण उपचार नको, असे म्हणण्याची वेळ येथे दाखल झालेल्या रुग्णांवर येत आहे. रुग्णालयात पंख्यांची आवश्‍यकता आहे. तशी मागणी आरोग्य विभागाने केली आहे. पण अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही. प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी हा खेळ तरी नाही ना, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: Kolhapur News unavailability of fans in Isolation Hospital