ध्येयपूर्तीने हुरळून न जाता ती सुरुवात माना!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर - ‘‘आपण आयुष्यात विशिष्ट ध्येय ठरवतो आणि झपाटून कामाला लागतो. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी ध्येयपूर्ती होईल, त्यावेळी हुरळून न जाता ती यशोशिखराची पायरी माना आणि पुन्हा झपाटून कामाला लागा...’’ असा मौलिक मंत्र पद्मश्री शेखर नाईक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांनी दिला. 

कोल्हापूर - ‘‘आपण आयुष्यात विशिष्ट ध्येय ठरवतो आणि झपाटून कामाला लागतो. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी ध्येयपूर्ती होईल, त्यावेळी हुरळून न जाता ती यशोशिखराची पायरी माना आणि पुन्हा झपाटून कामाला लागा...’’ असा मौलिक मंत्र पद्मश्री शेखर नाईक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांनी दिला.

सुमारे दोन तासांच्या या संवादात त्यांनी प्रत्येकाच्या मनातील ऊर्जा आणखी टवटवीत केली. निमित्त होतं, सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित फिझिंगा - संजय घोडावत ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या कार्यक्रमाचं. 

शेखर नाईक यांना जन्मतःच अंधत्व. त्यांच्या कुटुंबातील तब्बल सोळा लोकांना अंधत्व; पण त्यांनी हा शाप नाही तर अंधत्व हेच अस्त्र मानले. अंध आई त्यांना कुठल्याही क्षेत्रात जा; पण यशाचे शिखर गाठ, अशी प्रेरणा द्यायची. वयाच्या आठव्या वर्षी नदीत पडून डोळ्याला दुखापत झाली आणि पुढे शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना काही अंशी दिसू लागले. आज त्यांना दोन मीटरपर्यंतचे म्हणजेच वर्तमानपत्रातील किमान शीर्षके वाचता येतील, एवढी दृष्टी लाभली आहे.

 त्यांचं शिक्षण आणि एकूणच अंध क्रिकेट विश्‍वचषकापर्यंतचा प्रवास साऱ्यांसाठीच प्रेरणादायी ठरला.

नीलिमा मिश्रा गावातील लोकांचं दारिद्य्र पाहून इतक्‍या संवेदनशील झाल्या की या उत्कट संवेदनशीलतेतूनच त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी गावातच राहून गावाचा विकास साधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतः विवाहच न करण्याचा वज्रनिर्धार केला आणि तो पूर्णही केला. जळगाव जिल्ह्यातील बहाद्दरपूर या गावाचा कायापालट करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर

ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल द्यायचे आहे. त्यासाठी नऊ-नऊ वर्षाचे तीन टप्पे केले असून दुसरा टप्पा आता संपतो आहे. याच दरम्यान, त्यांच्या कामाचा पद्मश्री व मॅगसेसे पुरस्काराने झालेला गौरव आणि एकूणच प्रवास साऱ्यांसाठी एक वेगळी दृष्टी देऊन गेला. 

दरम्यान, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे, मार्व्हलस इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संग्राम पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत झाले. योगेश देशपांडे यांनी हा संवाद आणखी खुलवला.

  शेखर नाईक म्हणाले...
 लहानपणी अंध असल्याने खेळायलाही कोण बरोबर घेत नव्हतं. घरचे दारिद्र्य इतके की औषधालाही पैसे नसायचे. 
 डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आईने अंध शाळेत दाखल केले आणि वसतिगृहात ठेवले. त्यामागचा उद्देश शिक्षणाबरोबरच रोजचे जेवण मिळेल, हाच होता.
 शाळेच्या क्रिकेट संघात एक खेळाडू कमी पडत असल्याने समावेश झाला. पहिल्याच सामन्यात ३९ धावा केल्या. तेव्हापासून मी क्रिकेटच्या आणि क्रिकेट माझ्या प्रेमात पडले. 
 क्रिकेटमध्येच मोठा हो, असा आशीर्वाद आईने दिला.  मात्र वडिलांनंतर तिचाही मृत्यू झाला. एकाकी पडल्यानंतर शाळाच माझी आई झाली. 
 शिमोगा संघातून खेळताना एका सामन्यात २४९ धावा केल्या आणि भारतीय संघात निवडीसाठी हीच धावसंख्या मोलाची ठरली. भारतीय संघाकडून पहिल्यांदाच २००२ मध्ये विश्‍वचषक स्पर्धेत सलामीवीर म्हणून खेळताना ९८ धावा केल्या. तेथून पुढे २०१० पर्यंत सलामीवीर म्हणूनच खेळलो.
 २००४ आणि २००६ च्या तिसऱ्या विश्‍वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेला पराभव जिव्हारी लागला आणि अखेर २०१० मध्ये कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारून पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झालो.
 २०१२ सालच्या पहिल्या टी-ट्‌वेन्टी विश्‍वचषक स्पर्धेत पाकिस्तानलाच अंतिम सामन्यात पराभूत करून विश्‍वचषक जिंकला आणि २०१७ मध्ये पाकिस्तानलाच अंतिम सामन्यात नमवून एकदिवसीय विश्‍वचषकावरही नाव कोरले.

ब्लाईंड क्रिकेट ॲकॅडमी...
आम्ही आजवर चार विश्‍वचषक आणले. देशभरात चाळीस हजारहून अधिक अंध क्रिकेट खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी ‘बीसीसीआय’ काहीच करत नाही. त्यामुळे आता ब्लांईंड क्रिकेट ॲकॅडमी काढायची आहे. ‘बीसीसीआय’कडून मानधन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंध किंवा विकलांगांना सरकारची पेन्शन नको तर ते करदाते झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की पैशासाठी कधीच खेळलो नसल्याचे शेखर नाईक यांनी सांगितले.

  नीलिमा मिश्रा म्हणाल्या...
 घरात आईजवळ गावातील एक महिला आली आणि उपाशीपोटी झोपावे लागत असल्याने पोटाला रुमाल बांधून झोपते, असे सांगताच आपले आयुष्य गावासाठीच खर्ची घालायचा निर्णय घेतला.
 आवश्‍यक प्रशिक्षणाला प्रारंभ केला. डॉ. श्रीनाथ कालबाग यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्‍टर चालवणे, शेती करणे, इलेक्‍ट्रिक कामे, वेल्डिंग अशी सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली. त्याच वेळी मानसशास्त्र विषय घेऊन पुण्यात पुढील शिक्षणाला प्रारंभ केला. 
 २००० साली प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करताना पहिल्यांदा संगणक असेंब्लड्‌ करून देण्याचे काम सुरू केले आणि महिलांना त्यात सक्रिय केले.  त्यासाठी आईने स्वतःचे मंगळसूत्र काढून हातात ठेवले आणि आर्थिक मदत केली.
 भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनच्या माध्यमातून विविध वस्तू तयार करून त्याची विक्री महिलांनीच करायची, असा नियम घालून घेतला. सुरवातीला १४ महिला ३३ वस्तू तयार करायच्या. याच दरम्यान २०२७ पर्यंतचा कृती आराखडा तयार केला.
 गावचा आर्थिक विकास, त्यासाठी अर्थ पुरवठा, महिला स्वावलंबन आणि वृद्धांना आधार अशा विविध पातळ्यांवर सध्या काम सुरू आहे.  
 निकेतनमध्ये तयार होणाऱ्या गोधड्यांना जगभरातून मागणी आहे. रोज एक हजार गोधड्यांची ऑर्डर पूर्ण करावी लागते, अशी सध्या स्थिती आहे आणि त्यासाठी तीन हजारांवर महिला कार्यरत आहेत. मार्केटिंगमध्येही महिलांनीच पुढाकार घेतला आहे. 

आत्मसन्मान जागा ठेवा...
सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय काम करण्याचा निर्णय घेतला आणि आजवर तो कायम आहे. कारण आत्मसन्मान आणि माणसांचा माणसांवरील विश्‍वास महत्त्वाचा. त्यासाठी महात्मा गांधी यांनी सांगितलेली आपला विकास आपणच करावा, ही शिकवण मोलाची. पुरस्कारांसाठी काम कधीच केले नाही. कारण अशा कामांत वेळ उगाचच खर्च होत असतो. कुठल्याही कामाच्या परिणामापेक्षा त्याच्या प्रोसेसमधील आनंद फार महत्त्वाचा असतो, असेही नीलिमा मिश्रा म्हणाल्या.

शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य 
‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या उपक्रमाला गेली चार वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 
विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मुलाखती होतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असून मोफत सन्मानिकाही उपलब्ध आहेत. 

प्रायोजकांविषयी... 
० सहप्रायोजक ः चाटे शिक्षण समूह, मार्व्हलस इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, तनिष्क ज्वेलर्स, 
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, श्री ट्रॅव्हल्स 
० हॉस्पिटॅलिटी पार्टनर ः हॉटेल सयाजी 
० रेडिओ पार्टनर ः रेडिओ सिटी 

जिद्दीला सलाम...!
क्रिकेटमध्ये कीपरचे महत्त्व कसे असते, नेतृत्वाने गेम प्लॅन कसा करावा इथपासून ते अंध क्रिकेट संघाची रचना या साऱ्यांची माहिती शेखर नाईक यांनी दिली आणि सारेच भारावून गेले. साहजिकच त्यांच्या संवादानंतर सर्वांनीच उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या एकूणच जिद्दीला सलाम केला.

Web Title: Kolhapur news Urja sanwad Dheyawadyanshi sakal event