मनाला पटेल तेच करिअर निवडा!

मनाला पटेल तेच करिअर निवडा!

कोल्हापूर - ‘‘आपल्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर निवडा... कुठल्याही बंधनात न अडकता आपण जे काही करतो ते मग सर्वोत्कृष्टच होते... कितीही मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करीत असला तरी काही विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन काम करता येत नाही... योग्य वेळी निर्णय घ्या आणि स्वतःचा छोटासा का असेना, व्यवसाय सुरू करा...’’ अशी सळसळती ऊर्जा आज आंतरराष्ट्रीय जाहिरातकार राज कांबळे आणि ‘इंडस ओएस’चे जनक आकाश डोंगरे यांनी दिली.

निमित्त होते सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित फिझिंगा - संजय घोडावत ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या उपक्रमांतर्गत तिसऱ्या पुष्पाचे. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्राने तिसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांची उत्स्फूर्त हजेरी अनुभवली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, मार्व्हलस इंजिनिअर्सचे गौरव पाटील यांच्या हस्ते श्री. कांबळे व श्री. डोंगरे यांचे स्वागत झाले. मिलिंद कुलकर्णी (पुणे) यांनी हा संवाद अधिक खुलवला.

राज व आकाश सांगतात...

  •  वेडेपणा असावाच. त्याशिवाय झपाटून आणि मनाला पाहिजे तसे शक्‍यच नाही.
  •  नोकरी सोडून व्यवसायात येण्याचा निर्णय योग्य वेळी घ्यायलाच हवा.
  •  भाषांची अडचण असली तरी त्याला सामोरे गेले की त्यावरही मात करता येते.
  •  दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सोडवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मोठे समाधान देतो.
  •  संतुष्ट होऊ नका. रिस्क घ्यायला शिका, त्यातून यशस्वी होण्याचा मार्ग अधिक सुंदर असतो.
  •  कोल्हापूरला गूळ आणि चप्पलचे ब्रॅंडिंग करून व्यवसायाची मोठी संधी.
  •  २०१९ ची निवडणूक ‘गाफा’ गाजवणार. अर्थात जी फॉर गुगल, ए फॉर ॲप्पल, एफ फॉर फेसबुक आणि ए फॉर ॲमेझॉन. 
  •  सोशल मीडिया कितीही विस्तारला तरी मुद्रित माध्यमांना धोका नाही. कारण गेल्या वर्षभरात मुद्रित माध्यमांचा विस्तार ४९ टक्के इतका झाला आहे.

बाथ आणि शॉवर..!
राज कांबळे यांनी एक रंजक अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘‘एका परदेशी मित्रांबरोबर बोलताना मी रोज बाथ घेतो, असे सांगायचो. त्यामुळे तो हसायचा आणि मी महिन्यातून एकदा बाथ घेतो, असे त्यांना सांगायचा. राज यांना महिन्यातून एकदाच बाथ घेणाऱ्या या मित्राचे हसू यायचे. एक दिवशी त्यांनी ठरवून त्या मित्राला विचारलेच आणि त्यातून या रंजक किश्‍श्‍यातील क्‍लायमॅक्‍स उलगडला. रोजच्या अंघोळीला राज ‘बाथ’ म्हणायचे आणि परदेशात त्याला ‘शॉवर’ म्हणतात. परदेशात ’बाथ’ या शब्दाला शाही स्नान म्हणून संबोधतात.’’
 

राज कांबळे यांचा जन्म मिरज तालुक्‍यातील आरग गावचा. त्यांच्या जन्माचीही कथा रंजक आहे आणि म्हणूनच याच मातीतून सर्जनशीलतेची बीजं मनात रोवली गेल्याचे सांगून त्यांनी आपला प्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘‘आजी लहानपणी गोष्टी सांगायची. ती ऐकूनच मोठे होत असताना आपणही भविष्यात चांगले ‘स्टोरीटेलर’ व्हायचे, हा निर्धार केला. पुढे मुंबईत लहानाचा मोठा झालो. ‘आयआयटी’मध्ये प्रवेशही मिळाला. पण त्यात मन रमले नाही आणि म्हणूनच जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ला ॲडमिशन घेतले. कॉलेज करत एका वृत्तपत्रात रात्री उपसंपादक म्हणून नोकरीही केली. पण एक आर्टिकल लिहिल्यानंतर वरिष्ठांशी वाद झाला आणि नोकरी सोडली.’’ 

अभिजात चित्रकलेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘लिंटास’ कंपनी जॉईन केली आणि मग विविध जाहिराती सुरू झाल्या. अगदी ऑफिसमधील एका मुलाला सचिन तेंडुलकरचा डमी उभारून केलेली जाहिरात असो किवा ‘यलो पेजीस’ची जाहिरात, या जाहिरातींना मानाचे पुरस्कार मिळाले आणि कंपनीने मुख्य ऑफिसला लंडनला प्रमोशन केले. लंडन पुढे न्यूयॉर्क असा प्रवास सुरू होता. अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा यांच्यासाठीही प्रमोशनचे काम केले. पण चार वर्षांपूर्वी पुन्हा भारतात आलो आणि मुंबईत स्वतःची फेमस इनोव्हेशन कंपनी स्थापन केली आणि अनेक ब्रॅंड नावारूपाला आणत त्यांची व्यवसाय वृद्धी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या विविध जाहिरातींची झलकही यावेळी पाहायला मिळाली. 

आकाश डोंगरे सॉफ्टवेअर क्षेत्रातील तंत्रज्ञ. आपल्या दोन मित्रांसह नोकरी सोडून त्यांनी ‘स्टार्ट अप’ छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. मोबाईल पेमेंटचा विषय आत्ता चर्चेत असला तरी दहा वर्षांपूर्वी त्यांनी मोबाईल पेमेंट डिव्हाईस बनवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला. २००७-०८ या दरम्यान अमेरिकेत स्मार्टफोन आले आणि त्याच वेळी मोबाईल ॲपची निर्मिती सुरू केली आणि कंपनीचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. पुढे ‘इंडस ओएस’ ही भारतातील पहिली ऑपरेटींग सिस्टीम सुरू केली आणि आज त्याचे एक कोटीहून अधिक युजर्स आहेत. इंग्रजीशिवाय विविध भारतीय प्रादेशिक भाषांत मोबाईलधारकांना विविध सुविधा दिल्या जात आहेत आणि म्हणूनच कंपनीचा विस्तार अधिक गतीने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य 
‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या उपक्रमाला गेली चार वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 
विद्यापीठाच्या लोककला केंद्रात सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मुलाखती होतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश आहे. 

प्रायोजकांविषयी... 
० सहप्रायोजक ः चाटे शिक्षण समूह, मार्व्हलस इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, तनिष्क ज्वेलर्स, 
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, श्री ट्रॅव्हल्स 
० हॉस्पिटॅलिटी पार्टनर ः हॉटेल सयाजी 
० रेडिओ पार्टनर ः रेडिओ सिटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com