तरुणाईचा ‘चोरी चोरी चुपके चुपके’ व्हॅलेंटाईन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - प्रिय सख्या, तू रोज दिसतोस, हळूच खुदकन हसतोस, तुझं कर्तृत्वही सिद्ध करतोस, मला तुझं कर्तृत्व आवडतं, मलाही तुझ्यासारखंच कर्तृत्व संपन्न व्हायचं, त्याची प्रेरणाही तुझ्याकडूनच मिळावी म्हणून तू माझ्या आयुष्याचा जोडीदार व्हावास असं माझं स्वप्न आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मनातलं स्वप्न तुला सांगायचं आहे.

कोल्हापूर - प्रिय सख्या, तू रोज दिसतोस, हळूच खुदकन हसतोस, तुझं कर्तृत्वही सिद्ध करतोस, मला तुझं कर्तृत्व आवडतं, मलाही तुझ्यासारखंच कर्तृत्व संपन्न व्हायचं, त्याची प्रेरणाही तुझ्याकडूनच मिळावी म्हणून तू माझ्या आयुष्याचा जोडीदार व्हावास असं माझं स्वप्न आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मनातलं स्वप्न तुला सांगायचं आहे.

उज्ज्वल भविष्याचं स्वप्न साकारण्याचा निर्धारही करायचा आहे. मग भेटशील ना... असाच जणू भाव घेऊन अनेक प्रियकर-प्रेयसी विविध ठिकाणी घुटमळत राहिले. काहींनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’ संधी साधली. काहींनी ओठांवर आलेले शब्द मनातच गिळले. तसा व्हॅलेंटाईन डे म्हटलं तर सुना सुना, म्हटलं तर आनंददायी ठरला. 

व्हॅलेंटाईन डे हा प्रियकर-प्रेयसी यांच्या संवादाचा प्रातिनिधीक दिवस. गेल्या काही वर्षांत स्थानिक स्तरावरही साजरा होत गेला. त्यातून सामाजिक स्तरावर टीकाटिप्पणी सुरू झाली. गुलाबाचं फूल देऊन एकमेकांविषयी प्रियकर-प्रेयसींना आदरभाव व्यक्त करण्याची संधीच वादात आली. त्यानिमित्ताने होणारी भेटवस्तूंची देवाणघेवाण, त्यातील सूचकता याचेही विविध अर्थ काढून टिंगलटवाळी वाढू लागली. त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांत खुला व्हॅलेंटाईन डे बंदिस्त झाला. काहींनी मनातला भाव सोशल मीडियातून तिच्याकडे-त्याच्याकडे पाठविला. तोच कित्ता आजही मोबाईलवरील काही ठराविक संदेशांतून दिसत होता.

रात्री बारापासून काहींनी सुविचारांपासून मनातल्या सूचक भावनांपर्यंतचे संदेश व्हॉटस्‌अप, फेसबुक, ई मेल, ट्विटरच्या माध्यमातून एकमेकांना पाठविले. प्रेमिकांच्या व्हॉटस्‌अप, फेसबुकवर आज अभिनेत्री प्रिया वरियार हिची व्हायरल झालेली अदा झळकत होती. काहींनी व्हॅलेंटाईनचा मुहूर्त साधून महाविद्यालय परिसरात सकाळीच प्रिय व्यक्तीस गुलाबपुष्प, भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त केले. चित्रपटगृह, हॉटेल्स्‌, उद्याने, कॉफी शॉपमध्ये जाऊन अनेकांनी भेटीगाठींचा आनंद द्विगुणित केला. 

याउलट दुसरे चित्र असे, की काहींनी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा पाश्‍चिमात्य, तो आपल्या देशात संशयित अर्थाने साजरा होऊ नये, तर तो सामाजिक आशयाने साजरा व्हावा, अशी अपेक्षा ठेवून थेट सामाजिक, कौटुंबिक उपक्रम राबविले. राजारामपुरी पहिल्या गल्लीत युवा ऑर्गनायझेशनतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे रक्तदान शिबित झाले. त्यात ५०० हून अधिक जणांनी रक्तदान केले. वृद्धाश्रमांना भेटी देऊन अनेक जण तेथील ज्येष्ठ व्यक्तींच्या सान्निध्यात राहिले. अनेकांनी कौटुंबिक सहल काढून भोजन, अल्पोपाहाराचा आनंद घेत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. 

शांती प्रकाश हायस्कूलचा ‘कृतज्ञता दिन’
गांधीनगर येथील शांती प्रकाश हायस्कूल व स्वामी सर्वानंद प्रायमरी स्कूलमध्ये व्हॅलेंटाईन डे हा ‘कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा झाला. विद्यार्थ्यांनी पालक आणि गुरूजनांचे पूजन करून त्यांचे अशिर्वाद घेतले. त्याचबरोबर त्याना तयार केलेल्या भेट वस्तू दिल्या. शहरातून रॅली काढून विविध शासकीय कार्यालये पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या.  

शाळेच्या व्यवस्थापिका प्रियंका परचानी, विजय परचानी, संस्थेचे अध्यक्ष रमेश तनवाणी, महेश चावला, बलराम सालानी संयोजन केले केले. शाहूपुरी पोलिसांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन कामकाजाची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पोवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, अनिता मेणकर, शिवाजी पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.

गुलाबी रंगाला पसंती
‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात गुलाबी दिवस. आजच्या दिवशी अनेकांनी गुलाबी रंगाचे ड्रेस परिधान करणे पसंत केले होते. प्रेम व्यक्त करणाऱ्या गुलाबपुष्पाला बाजारात मोठी मागणी होती. त्यामुळे त्याचे आज बाजारातील दर प्रतिगुलाब दहा रुपयांहून अधिक होते. 

पोलिसांचाही ‘वॉच’
‘व्हॅलेंटाईन डे’चा आधार घेत मुलींची टिंगलटवाळी करणाऱ्या टवाळखोरांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी महाविद्यालय परिसर, उद्याने, चित्रपटगृहांच्या बाहेरही पोलिसांचा ‘वॉच’ होता. 
 

Web Title: Kolhapur News Valentine Day special