विनय पवार, सारंग अकोलकर फरार घोषित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विनय पवार व सारंग अकोलकर यांना जिल्हा न्यायालयाने आज फरारी घोषित केले. या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. 

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विनय पवार व सारंग अकोलकर यांना जिल्हा न्यायालयाने आज फरारी घोषित केले. या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. 

पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज), सारंग दिलीप अकोलकर (रा. शनिवारपेठ, पुणे) याचा तपास यंत्रणेकडून शोध सुरू आहे; मात्र दोघे अद्याप हाती लागत नसल्याने त्यांना फरार घोषित करण्याची मागणी सरकार पक्षातर्फे जिल्हा न्यायालयात केली होती. या संदर्भात कलम ८२ प्रमाणे ८ ऑगस्ट २०१७ रोजी जाहीरनामा काढला होता. त्याची अंमलबजावणी सातारा पोलिस अधीक्षक व पुणे पोलिस आयुक्तांतर्फे केली होती. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत दोघेही शरण आले नाहीत किंवा तपास यंत्रणेला सापडले नाहीत.

जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात आज पानसरे हत्येसंदर्भात सुनावणी झाली. त्या वेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पवार व अकोलकर यांना फरार घोषित करण्यासंदर्भात पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी केली. न्यायाधीश बिले यांनी त्या दोघांना फरार घोषित केले. या संदर्भातील पोलिस प्रशासनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या दोघांची छायाचित्रे बक्षिसाच्या रकमेसह प्रसिद्ध केली जातील. त्यानंतर त्यांच्या मालमत्ता जप्तीबाबतची प्रक्रिया सुरू होईल, असे ॲड. राणे यांनी सांगितले. 

दरम्यान, श्रमिक पतसंस्थेतील पानसरे यांच्या ठेवीबाबत संशयित समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात दिलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली. याबाबत न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यात सरकार पक्षातर्फे ॲड. राणे यांनी पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे या हत्येचा तपास सुरू आहे. तो कशा पद्धतीने करायचा, याचा अधिकार तपासी अधिकाऱ्यांना आहे. संशयितांकडून आलेल्या सूचनेचा विचार करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असा युक्तिवाद केला. त्याचबरोबर दुसरा संशयित डॉ. तावडेच्या जामीन अर्जाबाबत ॲड. राणे यांनी म्हणणे सादर केले. त्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुण्यात दाखल असलेला गुन्हा, याप्रकरणी न्यायालयाने फेटाळलेला जामीन अर्ज आणि पानसरे हत्येप्रकरणातील त्यांच्याबाबतचे ठोस पुरावे याचा संदर्भ सरकार पक्षातर्फे देण्यात आल्याचे ॲड. राणे यांनी सांगितले. या जामीन अर्जावरची पुढील सुनावणी न्यायाधीश बिले यांनी १९ जानेवारीला ठेवली आहे. सुनावणीवेळी दिलीप पवार, एम. बी. पडवळे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Vinay Pawar, Sarang Akolkar declared the absconding