मलेशियातील ‘त्या’ तरुणांना सोडविण्यासाठी उरले सहाच दिवस

लुमाकांत नलवडे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कोल्हापूर - महाराष्ट्रातील ४ तरुण मलेशियातील तुरुंगात आहेत. याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तरुणांची सुटका करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे.

कोल्हापूर - महाराष्ट्रातील ४ तरुण मलेशियातील तुरुंगात आहेत. याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तरुणांची सुटका करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे.

सोलापुरातील राजकीय कार्यकर्ते, नेते यांच्याकडूनही प्रयत्न सुरू झाले आहेत. सहा-सात जिल्ह्यांतील पोलिसांकडून याची दखल घेतली आहे. सांगलीतील पोलिस पुत्र एजंटावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एजंटाच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा कर्जत (जि. नगर) मधील तरुणाच्या पालकांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला आहे.

अटक झालेल्या तरुणांचे आई-वडील शेतकरी, शेतमजूर आहेत. त्यांना मुलगा मलेशियाला गेला एवढंच माहिती आहे. त्याला अटक केली आहे, त्याची दाद कोठे मागायची हेसुद्धा माहिती नाही. ‘सकाळ’ने याची बातमी केली आणि एक-एक आधार मिळत चालला आहे. परराष्ट्र मंत्र्यांपासून ट्विटर, ई-मेलद्वारेही तरुणांना महाराष्ट्रात आणण्याचा धडपड सुरू झाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी आता फक्त सहाच दिवस शिल्लक आहेत. या तरुणांना १२ डिसेंबरला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तेथे दंड किंवा शिक्षा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिल्लीतून याबाबत गतिमान हालचाली अपेक्षित आहेत.

‘सकाळ’च्या बातमीवरून सुरू झाली आधार मोहीम

मूळचे कागलचे, सध्या मलेशियात उच्च पदावर नोकरीस असलेले प्रवीण मधुकर नाईक यांनी ‘सकाळ’ची बातमी वाचून मलेशियात तुरुंगात असलेल्या तरुणांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सकाळ’च्या मदतीने आणि कागलमधील त्यांचे मित्र संदीप जिरगे यांच्या सहकार्याने ते आज मलेशियातील तुरुंगात असलेल्या अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील गुरुनाथ कुंभार (वय १९) याला जाऊन भटले. याबाबत त्यांनी ‘सकाळ’कडे दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत...

आज गुरुनाथ कुंभार (मूळ अक्कलकोट, जि. सोलापूर) याला मलेशियातील तुरुंगात भेटलो. भेट पंधरा मिनिटांची होती. त्याला मानसिक बळ मिळावे, या हेतूने चर्चा केली. (भेट प्रत्यक्षात नसून समोरासमोर उभे राहून फोनवरून होती.) त्याच्या सोबत अजून तीन मुले अटकेत आहेत; पण त्यांच्या सोबत बोलण्याची परवानगी नव्हती. अधिकृत व्हिसा नसल्यामुळे १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ‘इमिग्रेशन ऑफिसर्स’ने छापा टाकून घरातून त्यांना अटक केली. या मुलांना ‘लेबर व्हिसा’ (कामासाठी लागणारा परवाना) विषयी काहीच कल्पना नव्हती. सर्वांचे पासपोर्ट एजंटाने काढून घेतले आहेत. त्यांना अटक झाल्यापासून कोणताही एजंट त्यांना भेटलाही नाही की त्यांच्या सोबत बोललाही नाही. फक्त फसवी आश्‍वासने त्यांच्या नातेवाईकांना देत आहेत. या लोकांनी लाखो रुपये देऊन मलेशियात नोकरी मिळविल्या होत्या. १२ डिसेंबरला त्यांना कोर्टात सादर करण्यात येणार आहे. तेथे शिक्षा व दंड ठोठविण्यात येण्याची शक्‍यता आहे. मी इमिग्रेशन डिपार्टमेंटला  विनंती केली आहे. कोणतीही शिक्षा न करता, फक्त दंड भरून व माझी जबाबदारी लिहून घेऊन भारतात परत पाठविण्यात यावे. ही विनंती अधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे. मिनिस्टरी ऑफ एक्‍स्टर्नल अफेअर्स सोबत आम्ही ई-मेल द्वारे चर्चा करीत आहोत.’’

आईची आठवण येते...मलेशिया कारागृहातील गुरुनाथ कुंभार
प्रवीण नाईक यांनी गुरुवाथ संवाद साधला. त्यासंदर्भात नाईक यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आईची आठवण येते, असे गुरुनाथने सांगितले. दररोज सकाळी पाव आणि दिवसातून दोन वेळा भात असे त्यांचे जेवण आहे. महाराष्ट्रातील चौघेही तेथे एकाच खोलीत आहेत. सर्वच घाबरले आहेत. मी भेटल्यावर त्यांना आधार वाटला. आम्ही व्यवस्थित आहे म्हणून घरी सांगा असेही त्याने मला सांगितले.’’

पोरगं परदेशात जाऊन पैसे मिळवणार म्हणून पाठविले

मलेशियातील तुरुंगात असलेल्या चार तरुणांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला आहे. त्यापैकी कर्जत (जि. नगर) येथील मोहन अशोक शिंदे याच्या वडिलांशी संपर्क झाला. ते म्हणाले, ‘‘आम्ही शेतकरी आहोत. आमची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. पोरगं परदेशात जाणार, नोकरी करणार, पैसे मिळवणार म्हणून आम्ही खूश होतो. अडीच-तीन महिन्यापूर्वी सांगलीतील एजंटाने आमच्याच्या भागातील काही तरुणांशी संपर्क साधला. मुलगा परदेशात जाऊन पैसे कमविणार म्हणून आम्ही त्याला मलेशियाला पाठविण्यास तयार झालो.  

त्यासाठी दीड लाख रुपये आमच्याकडून एजंटाने घेतले. मुलगा परदेशात जाणार म्हणून नातेवाईकांनीही आम्हाला पैशाची मदत केली. साधारण अडीच महिन्यांपूर्वी तो गाव सोडून परदेशात गेला. त्याच्या बरोबर आमच्या भागातील एक तरुण आहे. हरियाणातीलही एक तरुण आहे. सध्या त्याच्याकडील वर्किंग व्हिसा (परमीट) संपल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या मित्रांनी आम्हाला ही माहिती दिली. गेली २३-२४ दिवस तो तुरुंगात आहे. आम्ही येथील जिल्हा परिषद सदस्यांच्या ओळखीने येथील पोलिस ठाण्यातील निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही पोलिस ठाण्याची पायरी चढलो आहे. पुढे तपासाचे काय झाले, असे आम्ही निरीक्षकांकडे विचारणा केली; तेंव्हा त्यांनी हे सगळ वरच्या (दिल्ली) लेव्हलचे आहे.

आम्ही फक्त एजंटाची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला पाठविण्याचे काम केले आहे. पुढील तपास तेच करतील, असे सांगितले आहे. आम्ही आता काय करायचे हेच समजत नाही. आम्हाला तुम्ही मदत करा. शिरवळ (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील गुरुनाथ कुंभारसुद्धा मोहन बरोबर तुरुंगात आहे. त्यांचे दाजी (बहिणीचे पती) नामदेव कुंभार सांगलीत एजंटाकडे माहिती घेण्यासाठी गेले आहेत; पण तो मिळाला नाही. पोलिस ठाण्यातही ते जावून आले आहेत. आता आम्ही आठ-दहा जण मिळून आज (ता. ६) सांगलीत येऊन पोलिस अधिक्षकांनाही भेटणार आहोत. एजंटाच्या घरासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत. काय करावे हेच सुचत नाही.’’

Web Title: Kolhapur News Visa Fraud special