नशीब बदलेल म्हणून मलेशियात पाठवलं! - लिंबाजी माने

लुमाकांत नलवडे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

19 वर्षांचा मुलगा दीपक "वर्किंग व्हीसा' संपल्यामुळे आज मलेशियातील तुरुंगात आहे. निरक्षर असलेल्या मानेंना काय करावं सुचत नाही. "सकाळ'ने आज औरवाडला उसाच्या फडात जावून माने कुटुंबियांना बोलते केले. 

कोल्हापूर - ""नशीब बदलेल म्हणून पोराला मलेशियात पाठवलं आणि काय होऊन बसलं, आमच्या नशिबी ऊस तोडणीच आली,'' लिंबाजी माने सांगत होते. ते मूळचे मानेवाडी (मु. हुन्नूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील आहेत.

औरवाड (ता. शिरोळ. जि. कोल्हापूर) येथे ते ऊस तोडणीसाठी पत्नी छायासह आले आहेत. त्यांचा 19 वर्षांचा मुलगा दीपक "वर्किंग व्हीसा' संपल्यामुळे आज मलेशियातील तुरुंगात आहे. निरक्षर असलेल्या मानेंना काय करावं सुचत नाही. "सकाळ'ने आज औरवाडला उसाच्या फडात जावून माने कुटुंबियांना बोलते केले. 

डोक्‍यावर निळसर कापड बांधलेले, हातात कोयता घेतलेले पन्नाशीतील लिंबाजी औरवाडला ऊसाच्या फडात तोड करत होते. त्यांचे मालक (ऊस तोड टोळी ज्या गाडीवर असते त्याचे मालक) अरुण रावळ आणि दत्त साखर कारखान्याचे अधिकारी पी. टी. पाटील यांच्यासह आम्ही तेथे पोचलो आणि त्यांचा मुलगा मलेशियातील तुरुंगात आहे हे दुःख विसरून ते ऊस तोडणीचे काम करीत होते.

आम्ही तेथे जावून त्यांना बोलते केले. ते म्हणाले,""आम्हाला फसवले. दीपकला शिकायला कऱ्हाडला नेले. तेथे दोन-तीन महिने थांबवले, नंतर महाबळेश्‍वरला नेले. तेथे हॉटेलात काहीही कामे करायला लावली. नंतर गोव्यात नेले. तेथेही कामे करायला लावली. सांगलीच्या पवारने आमच्याकडे येवून दीड लाख रुपये नेले. सगळ्यांकडे मागून कष्टाने मिळविलेले आणि ऊस तोडीचा ऍडव्हान्स घेऊन पैसे दिले. आता महिनाभर झाले दीपकशी बोलणे नाही. दीपकला अटक केल्याचे त्याच्या मित्रांकडून समजल्यावर पवारकडे सांगलीत गेलो. त्याच्याशिवाय कुठं जायचं हे आम्हाला माहितीच नाही. आजही सकाळी त्याच्या सांगलीतील घरी जावून आलो. लवकरच मुलगा परत आणतो, पैसे देतो असे म्हणत होता. पण कसं आणणार हे सांगत नव्हता. तुम्हीच सांगा आम्ही काय करायचे.'' 

थोड्याच वेळात त्यांची पत्नी छाया पदर सावरत तेथे आल्या. दीपक कुठे आहे विचारल्यावर मलेशियात जेलात असे सांगितले. त्या बोलत राहिल्या,"" ऊस तोडायचे काम कायमचं बंद होईल, असं वाटलं होते. पोरगं परदेशात जाणार, नोकरी करणार, पैसे मिळणार, आम्हाला सुख मिळणार असं वाटलं होतं; पण आमच्या नशिबी ऊस तोडणीच आली आहे. तुम्हीच त्याला सोडवून आणा.'' 

थोड्याच वेळात आम्ही त्या सर्वांच्या बरोबरीने उसाच्या फडापासून साधारण शंभर मीटरवरील त्यांच्या पालाच्या घराजवळ गेलो. उसाचा पाचाटातून चिखलातून त्यांनी पालात प्रवेश केला. अडीच फुटाच्या दरवाजातून दोघेही वाकून पालात गेले. दोघे मांडी घालून बसले. सूर्यास्त झाल्याने पालात दिवा लावला. पालात प्रकाश पडला पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाचेच सावट कायम होते. 

सुटकेसाठी पाच दिवस...! 
पाचवीला पुजलेल्या गरिबीतून बाहेर येण्यासाठी कुटुंबियांनी दीपकला शिकवले, हॉटेलातील नोकरीसाठी परदेशीही पाठविले, पण तेथेही त्यांची फसवणूकच झाली. दीपकसह राज्यातील चार तरुण आज "वर्किग व्हीसा' संपल्यामुळे मलेशियातील तुरुंगात आहेत. त्यांचे पालक निरक्षर आहेत. ऊस तोडणीचे ऍडव्हॉन्स घेऊन, नातेवाईकांकडून पैसे घेऊन त्यांनी मुलांना नोकरीसाठी परदेशात पाठविले. एजंटाने त्यांची फसवणूक केली. 12 डिसेंबरला त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाईल. भारत सरकारने तेथे वकील दिला तरच त्यांना शिक्षेत किंवा दंडात सवलत मिळेल, अशी आशा आहे. यासाठी आपण सर्वांनी जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहेत. त्यांना सोडविण्यासाठी आपल्याकडे केवळ पाच दिवस आहेत. 

संबंधीत बातम्या..

Web Title: Kolhapur News Visa Fraud Special