सूत्रधार शोधण्यासाठी इंटेलिजन्सची टीमच - विश्‍वास नांगरे-पाटील

सूत्रधार शोधण्यासाठी इंटेलिजन्सची टीमच - विश्‍वास नांगरे-पाटील

कोल्हापूर - ‘‘कोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर उमटलेल्या प्रतिक्रिया यांचा सूत्रधार शोधण्यासाठी इंटेलिजन्सची टीमच नेमली आहे. पुराव्यासह त्यामधील माहिती पुढे येईल. कोरगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीतील बारा जणांना अटक केली आहे, ती कारवाई पुराव्यासहितच केली आहे,’’ अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

‘‘आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी प्रशासन गावोगावी पोचेल. तेथे शांतता प्रस्थापित करेल. शांतता समितीची फेररचना करेल. रस्त्यांवर, चौकांत उभारण्यात येणारे अनधिकृत डिजिटल बोर्ड उभारले जाणार नाहीत, याचीही प्रशासन काळजी घेईल,’’ असेही नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले,‘‘कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल्यामुळे गालबोट लागले. त्यानंतर जिल्ह्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी सर्व समाजातील संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांच्या स्वतंत्र बैठका पोलिस अधीक्षक कार्यालयात आज घेण्यात आल्या. या बैठकांतून जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सामाजिक हित, सलोखा राहण्यासाठी दुहीची भिंत कमी करण्यासाठीही प्रयत्न करू, असे नेते, कार्यकर्त्यांनी सांगितले. हुल्लडबाजी बाहेरून आलेल्या तरुणांनी केल्याचे काहींनी सांगितले; मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहूनच कारवाई केली जात आहे. पूर्वग्रह ठेवून पोलिस कारवाई केली जात नाही. ज्यांचे वर्तन दंगलखोरांसारखे आहे, जे दोन-तीन ठिकाणी सीसीटीव्हीत दिसले आहेत, अशांवरच कारवाई केली आहे.’’

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक दिनेश बारी, उपाधीक्षक आर. आर. पाटील, डॉ. प्रशांत अमृतकर, कृष्णात पिंगळे आदी उपस्थित होते.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश
नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पोलिस रेकॉर्डवरील अनेक जण असून, त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. नेमकी कोणी दंगल घडवून आणली, याच्या मुळापर्यंत आम्ही जात आहोत. पुराव्यासहित त्यांची माहिती पोलिसांकडे आहे.’’

डिजिटल बोर्डसाठी परवानगी आवश्‍यक
नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती; तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी तात्पुरते उभे केलेले डिजिटल फलक, झेंडे यांवरून वाद निर्माण होऊ नयेत, याची काळजी प्रशासन घेईल. त्यावर पोलिसांचे नियंत्रण असेल. डिजिटल छपाई करणाऱ्यांनाही याबाबत नोटिसा पाठविल्या जातील. संबंधित पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेची परवानगी असल्याशिवाय डिजिटल प्रिंटिंग करू नये, असेही आदेश काढण्यात येतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटिंग युनिटवर, कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.’’

अफवा शोधणारे ‘ॲप’ पोलिसांकडे 
नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘नवीन मोबाइल ॲपद्वारे पोलिसांना एका क्‍लिकवर कोणाच्या मोबाइल हॅंडसेटवर काय मेसेज आहेत, कोठे फॉर्वर्ड केले आहेत याची माहिती मिळत आहे. सध्या आम्ही त्याचा वापर करीत आहोत. त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नये. अफवांचे मेसेज फॉर्वर्ड करू नयेत. अन्यथा ग्रुप ॲडमीनसह ग्रुपमधील सदस्यांवरही गुन्हे दाखल केले जातील.’’

२०० कॅमेऱ्यांद्वारे कारवाई
शहरात असलेल्या सेफ सिटी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आणि अनेकांनी पोलिसांना पुरविलेल्या छायाचित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. साधारण दोनशे कॅमेऱ्यांद्वारे ही कारवाई केली आहे, त्यामुळे कोणतीही कारवाई विनाकारण होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे.

शांतता समितीची फेररचना
नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘पत्रकारांच्या बैठकीत आलेल्या मुद्‌द्‌यानुसार ज्या व्यक्तीचे अनेक जण ऐकू शकतील; ज्या व्यक्ती समाजात शांतता निर्माण करण्यासाठी मदत करतील, अशा व्यक्तींना शांतता समितीच्या बैठकीत घेतले जाईल. गावोगावी जाऊन प्रशासन जनजागृती करेल, शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल. यासाठीच शांतता समितीची फेररचना करण्यात येईल.’’

जिल्ह्यात १३४ अटक, दोन हजारांवर गुन्हे
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत १३४ जणांना अटक केली आहे; तर दोन हजारांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात ५६ जणांना अटक केली आहे. त्यांमध्ये दोन्ही बाजूंच्या तरुणांचा समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com