कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये "व्हिजीटर्स मॉनिटरिंग सिस्टीम' 

गणेश शिंदे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

जयसिंगपूर -  जिल्ह्यातील पोलिस ठाणी लवकरच "व्हिजीटर्स मॉनिटरिंग सिस्टीम' कार्यप्रणालीत जोडली जाणार आहेत. ऑनलाईन होणाऱ्या या सिस्टीममुळे तक्रारदाराला तत्काळ न्याय देण्यासाठी पाठपुरावा होणार असून उपविभागीय पोलिस अधिकारी तक्रारींचा फिडबॅक घेणार आहेत.

जयसिंगपूर -  जिल्ह्यातील पोलिस ठाणी लवकरच "व्हिजीटर्स मॉनिटरिंग सिस्टीम' कार्यप्रणालीत जोडली जाणार आहेत. ऑनलाईन होणाऱ्या या सिस्टीममुळे तक्रारदाराला तत्काळ न्याय देण्यासाठी पाठपुरावा होणार असून उपविभागीय पोलिस अधिकारी तक्रारींचा फिडबॅक घेणार आहेत. पोलिस ठाण्यात तक्रारदाराला मिळणारी वागणूक, झालेली कार्यवाही, तक्रारदाराचे समाधान आदी इत्यंभूत बाबी उपविभागीय पोलिस अधिकारी तपासणार आहेत. 

पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. याआधी पोलिस ठाण्यात स्वागत कक्षाची स्थापना झाली. महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने महिलांच्या तक्रारीसाठी महिला अधिकारी, कर्मचारी पोलिस ठाण्यात कार्यरत राहिल्या आहेत. तक्रारदारांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी सर्वच भागातून सुरु असतात. अशा आरोपांमुळे पोलिस प्रतिमेला तडा जात आहे. 

विविध उपाययोजनांमुळे पारदर्शी आणि न्यायप्रविष्ठ कार्यप्रणाली राबविण्याचा प्रयत्न पोलिस ठाण्यांमध्ये झाला. मात्र, अंतर्गत गटबाजी, एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याकडून वरकमाईसाठी दुटप्पी धोरणाचा अवलंब, पोलिसांप्रति विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी झालेली तोकडे प्रयत्न या बाबींमुळे अद्याप जनता आणि पोलिस यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले नाही. 

पण आता या नव्या उपक्रमातून लोकाभिमुख प्रशासनाची झलक तक्रारदार आणि नागरीकांना पहायला मिळेल, अशी आशा पोलिस दलाला वाटते. राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलिस अधिक्षकांची बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये प्रत्येक पोलिस ठाणे "व्हिजीटर्स मॉनिटरिंग सिस्टीम'ने जोडण्याचा निर्धार झाला. 

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यक्षेत्रात असलेल्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींचा फिडबॅक घेणार आहेत. यामुळे संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जागरुक राहून निरपेक्ष भावनेने कर्तव्य बजावावे लागणार आहे. 

प्रक्रिया होणार गतीमान 
पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराची तक्रार स्वागत कक्षात कार्यरत असणारा पोलिस संगणकात नमूद करणार आहे. तक्रार संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे पोहोचणार आहे. तक्रारीवर कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली व तक्रारदाराला न्याय देण्यासाठी केलेली कार्यवाही याची माहिती अधिकाऱ्यांना ऑनलाईन मिळणार आहे. 

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेल्या तक्रारदाला आपल्या तक्रारीच्या कार्यवाहीची माहिती मिळणार आहे. शिवाय न्यायप्रविष्ठ प्रक्रिया राबविणेही सोयीचे होईल. पोलिस आणि जनतेमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यासाठी हि यंत्रणा उपयुक्त ठरेल. 
कृष्णात पिंगळे,
उपविभागीय पोलिस अधिक्षक, जयसिंगपूर 

Web Title: Kolhapur News Visiters Monitering system in Police station