पगारी पुजारी संदर्भात कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत लढा - संजय पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

कोल्हापूर - पगारी पुजारी विधेयक हा अंबाबाईनेच पुजाऱ्यांना शिकवलेला धडा आहे. विधेयकावर समाधान न मानता त्याचे कायद्यात रूपांतर होऊन तो अमलात येईपर्यंत श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी संघर्ष समिती पाठपुरावा करेल, अशी माहिती समितीचे प्रवक्ते संजय पवार यांनी दिली.

कोल्हापूर - पगारी पुजारी विधेयक हा अंबाबाईनेच पुजाऱ्यांना शिकवलेला धडा आहे. विधेयकावर समाधान न मानता त्याचे कायद्यात रूपांतर होऊन तो अमलात येईपर्यंत श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी संघर्ष समिती पाठपुरावा करेल, अशी माहिती समितीचे प्रवक्ते संजय पवार यांनी दिली.

विधानसभा व विधान परिषदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर समितीच्या वतीने पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी समिती सदस्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. 

उद्या कॅव्हेट 
विधेयकाच्या विरोधात पुजाऱ्यांकडून न्यायालयात जाण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगून दिलीप पाटील म्हणाले, ‘‘पुजाऱ्यांकडून न्यायालयातून स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे संघर्ष समितीनेही न्यायालयात जाण्याची तयारी केली असून, शनिवारी कॅव्हेट दाखल करणार आहे.’’

श्री. पवार म्हणाले, ‘‘शाहूंच्या नगरीत पगारी पुजारी विधेयकाला मंजुरी हा क्रांतिकारी निर्णय आहे. हा लढा एका व्यक्ती किंवा विशिष्ट जातीविरुद्ध कधीच नव्हता आणि येथून पुढेही नसेल. पुजाऱ्यांच्या वाईट प्रवृत्तीविरोधातील या लढ्याची बुद्धी देवीनेच आम्हाला दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यांचे समितीतर्फे आभार मानले असून, त्यांनीच पुढाकार घेऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करायला हवेत.’’ 

प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘‘पुजारी वंशपरंपरागत हक्कदार मानतात; पण कायदा हा सर्वोच्च आहे हे पुजारी विसरले आहेत. घटनेनुसार त्यांचे सर्व अधिकार बरखास्त करता येतात. त्यांना किती रुपये नुकसानभरपाई म्हणून दिली जाणार आहे याकडेही समितीचे लक्ष असणार आहे.’’   

दरम्यान, दसरा चौकात झालेल्या आनंदोत्सवात महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते नागरिकांना साखर-पेठे वाटले. महापौर स्वाती यवलुजे यांनी या वेळी फुगडीचा फेर धरला.
या वेळी माजी आमदार सुरेश साळोखे, आर. के. पोवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, राजू लाटकर, मधुकर रामाणे, दुर्गेश लिंग्रस, ॲड. चारुलता चव्हाण, शरद तांबट, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, शिवाजीराव जाधव, तौफिक मुलाणी, दुर्वास कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News wage Pujari in Ambabai Temple issue