छंद जपायचा तर वयाची अट कशाला...

छंद जपायचा तर वयाची अट कशाला...

कोल्हापूर - कोल्हापुरात एकत्र यायला काहीही निमित्त पुरेसे ठरते. एकत्र येण्यासाठी कोणाला रस्सा मंडळ खुणावते. कोणाला गाण्यांची मैफल जवळ करते. कोणाला देवदर्शन, जत्रा-यात्रा यात गोडी असते... अशाचप्रकारे हे पंधरा-सोळा जण दर रविवारी पहाटे कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असे चालत जाण्याच्या निमित्ताने एकत्र आले. यातला एकहीजण पट्टीचा गिर्यारोहक नाही, यातल्या बहुतेकांकडे जोतिबा डोंगर चढल्याशिवाय इतर कोणताही अनुभव नाही; पण यांच्याकडे जिद्दीची कमी नाही. त्यातूनच त्यांनी चक्क लोणावळ्याजवळचा ड्यूक्‍स नोज हा १००० फूट उंचीचा कडा दोरीवरून खाली (रॅपलिंग) उतरण्याचा थरारक अनुभव घेतला. छंद जपायचा तर वयाची अट नाही, तब्येतीची कुरकूर करायची नाही आणि जग काय म्हणेल, या भीतीने आपला छंद दडवायचा नाही, असा संदेश त्यांनी या मोहिमेतून दिला. वयाच्या १७ वर्षापासून ते ६० वयापर्यंतची ही कोल्हापुरातली मंडळी केवळ हौसेच्या बळावर या मोहिमेत सहभागी झाली. दोन दिवस सवड काढून या मोहिमेवर जाऊन आली आणि आपापल्या दैनंदिन कामात पुन्हा गढूनही गेली. 

कोल्हापूर ते जोतिबा असे दर रविवारी पहाटे चालत जाणारे अनेक ग्रुप कोल्हापुरात आहेत. ग्रुप वेगवेगळे असले तरी भक्तीच्या निमित्ताने निसर्गाशी जवळीक आणि चालण्याचा व्यायाम हेच सर्वांचे समान सूत्र आहे. अशाच एका ग्रुपमधल्या पंधरा-सोळा जणांना जोतिबा डोंगर चढण्याच्या निमित्ताने उंच दरी, डोंगर खुणावू लागले; पण यांच्याजवळ साधने कमी, अनुभव कमी त्यामुळे केवळ प्लॅनवर प्लॅन रचले जाऊ लागले. अखेर लोणावळ्याजवळ ड्यूक्‍स नोज हा सुळका पार करण्याचे निश्‍चित केले. 

शिवाजी मार्केटच्या इमारतीवरून खाली बघितले तरी डोळे गरगरल्यासारखे होणारी ही सर्व मंडळी लोणावळ्याजवळ ड्यूक्‍स नोजवर पोहोचली. खाली दरी पाहून सुरवातीला खरोखरच गरगरून गेली; पण भक्कम दोराच्या भरवशावर दरीत उतरायला तयार झाली.

सर्वांनी मिळून जोतिबाच्या नावानं, काळभैरीच्या नावानं चांगभला अशी आरोळी दिली आणि एकेकाने सुळक्‍यावरून दोरीच्या साह्याने खाली उतरण्यास सुरवात केली. या सुळक्‍यावरून यापूर्वी अनेकजण खाली उतरले आहेत; पण या पंधरा सोळा जणांना हा अनुभव नवा होता आणि त्यांना फक्त आपल्या जिद्दीवर भरवसा होता. या भरवश्‍यावर ते ३५० फूट खोल दोरीवरून खाली उतरले. त्यानंतर २७५ फूट आडव्या दोरावरून (व्हॅली क्रॉसिंग) पूर्ण केले. मनात आणले तर आपण सर्वजण जिद्दीच्या बळावर हे आव्हान पेलू शकतो हेच त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले. 

मोहिमेतील सहभागी 
डॉ. दीपक आंबर्डेकर, शिवाजी आडूरकर, दीपक सावेकर, स्वरूप वाटवे, विनोद माने, मारुती शिंदे, अनिल भोले, प्रशांत पाटील, सुजय पाटील, नंदू जगताप, दिनकर कांबळे, विक्रम कुलकर्णी, किशोर कारंडे व ओंकार. 

उंच कडे, खोल दऱ्या प्रत्येकाला खुणावत असतात. त्यांचा अनुभव घ्यावा हे प्रत्येकाला वाटत असते; पण काही ना काही कारणांनी ते शक्‍य होत नसते; पण आम्ही ठरवलं हे आपण करायचंच आणि करून दाखवलं. 
- शिवाजी आडूरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com