वारणेचे पाणी आमच्या हक्काचे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

दानोळी - गावात फौजफाटा दाखल झाल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ ‘वारणा बचाव कृती समितीचा विजय असो,’ ‘प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

दानोळी - गावात फौजफाटा दाखल झाल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ ‘वारणा बचाव कृती समितीचा विजय असो,’ ‘प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

प्रांताधिकारी समीर शिंगटे, शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, इचलकरंजीचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, विनायक नरळे, अमरसिंह निंबाळकर यांच्यासह ४५ अधिकारी, ४५० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले.

वारणा बचाव कृती समिती अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, ‘‘प्रशासन आमचे शत्रू नाही, मात्र आमच्यावर शासनाने अन्यायाची भूमिका घेतली आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. कुणाच्या तरी दबावाखाली आमच्या हक्काचे पाणी नेऊ देणार नाही. योजना जोपर्यंत बंद होणार नाही, तोपर्यंत गाव बेमुदत बंद राहिल. स्वत:ची नदी घाण करून आमच्या हक्काचं पाणी देणार नाही. त्यासाठी हौतात्म्य पत्करायलाही वारणा काठ तयार आहे.’’ त्यानंतर सायंकाळपर्यंत गावात तणाव होता. कृती समितीच्या नेत्यांबरोबर प्रशासनाने चर्चेची तयारी सुरू ठेवली; मात्र नेत्यांसह ग्रामस्थही भूमिकेवर ठाम राहिल्याने याप्रश्‍नी चर्चाच होऊ शकली नाही. 

सायंकाळी साडेचार वाजता कृती समितीच्या निवडक पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी भूमिपूजन होणाऱ्या ठिकाणी भेट देण्याबाबत निर्णय झाला. पदाधिकारी पोलिस वाहनात बसून नदीकाठी जाण्याचा प्रयत्न केला; मात्र जमलेल्या महिलांनी ताफाच पुढे सोडला नाही. महिलांनी तीव्र विरोध केला. यामुळे नेत्यांचाही नाईलाज झाला. भूमिपूजनच्या ठिकाणी जाण्याचे अधिकाऱ्यांचे मनसुबे महिलांनी उधळून लावले. पाचशे ते सातशे जणांच्या समुदायापुढे प्रशासन हतबल ठरले.

अखेर याप्रश्‍नी लोकांचे मुद्दे वरिष्ठांकडे मांडणार असून, वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कार्यवाहीचे आश्‍वासन देऊन अधिकारी तेथून निघून गेले. दरम्यान, येथे झालेल्या सभेत हे संकट तात्पुरते टळले आहे. कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीला पाणी द्यायचे नाही. यासाठी गनिमी कावा करण्याचा निर्धार केला. या वेळी समितीचे उपाध्यक्ष केशव राऊत, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, मानाजीराव भोसले, सुकुमार सकाप्पा, गुंडू दळवी, सतीश मलमे, राम शिंदे, धन्यकुमार भोसले, पै. केशव राऊत, उमेश केकले आदींसह ग्रामस्थांनी आंदोलनात भाग घेतला.

दिवसभर गाव बंद
अमृत योजनेसाठी भूमिपूजन केले जाणार असल्याची कुणकुण लागताच सकाळपासून गाव बंद ठेवण्यात आले. दानोळीच्या पाणीपुरवठ्यासह शेतीचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले. तसेच एसटी आणि इतर प्रवासी वाहतूकही बंद राहिली. गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी एकजुटीने आंदोलनात सहभाग घेतला. 

रणरणत्या उन्हातही आंदोलनाची धग
अमृत योजनेला विरोधासाठी गावात मंगळवारी बैठक झाली. इतर गावांतील लोकांनीही या वेळी उपस्थिती लावली. बुधवारी अगदी सकाळपासून शेतीची कामे टाकून शेतकऱ्यांसह नोकरदारांनी कामाला दांडी मारत आंदोलनात सहभाग घेतला. दुपारी ४० डिग्री तापमानातही ग्रामस्थांनी किंचितदेखील निर्धार ढळू दिला नाही. 

Web Title: Kolhapur News Warana River water issue