वारणेच्या पाण्यासाठी सोमवारी इचलकरंजी बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

इचलकरंजी - इचलकरंजीला वारणा नदीचे पाणी मिळालेच पाहिजे, असा निर्धार आज येथे झालेल्या आमसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी केला. जनआंदोलनातून निर्माण होणाऱ्या तीव्र भावना शासनाला समजण्यासाठी सोमवारी (ता. १४) ‘इचलकरंजी बंद’ची हाक देण्यात आली. या दिवशी प्रांत कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार आहे. 

इचलकरंजी - इचलकरंजीला वारणा नदीचे पाणी मिळालेच पाहिजे, असा निर्धार आज येथे झालेल्या आमसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी केला. जनआंदोलनातून निर्माण होणाऱ्या तीव्र भावना शासनाला समजण्यासाठी सोमवारी (ता. १४) ‘इचलकरंजी बंद’ची हाक देण्यात आली. या दिवशी प्रांत कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार आहे. 

वारणेचे पाणी इचलकरंजीत येत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आमसभेत करण्यात आला. नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मंगलधाम सभागृहात आमसभा झाली. आमदार सुरेश हाळवणकर, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, हिंदुराव शेळके, अशोक स्वामी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ‘एक दिवस पाण्यासाठी’ अशी घोषणा देत ‘बंद’मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. 

दानोळीकरांचा विरोध मोडू

कोल्हापूरच्या धर्तीवर इचलकरंजीतील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दानोळीकरांचा अमृत पाणी योजनेला होणारा विरोध मोडून काढू या, असा निर्धार आमसभेत करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी भावना मांडत वारणेच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या चळवळीत आपण, आपली संस्था, राजकीय पक्ष सक्रिय राहतील, अशी ग्वाही दिली. वारणेच्या पाण्यासाठी लढा उभा केला नाही तर भविष्यात भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार असून पिण्यास पाणी देण्याची आपली संस्कृती असताना पाणी न देण्याच्या भूमिकेवर जोरदार टीका झाली.

आम्ही आतापर्यंत संयमाने घेतले आहे. आता संयम संपत चालला आहे. पाण्यासाठी आंदोलनाशिवाय आमच्यासमोर पर्यायच राहिलेला नाही. 
- ॲड. अलका स्वामी, 
नगराध्यक्षा, इचलकरंजी पालिका

वारणा नदीचे पाणी इचलकरंजीत आलेच पाहिजे, यासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. संघर्ष करण्याची आपली तयारी असली तरी शांततेने हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. 
- प्रकाश आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री 

इचलकरंजीला सध्या केवळ अर्धा टीएमसी पाणी लागणार असताना आठ-दहा जणांच्या टोळीने खोटे आरोप करून सर्वांची दिशाभूल केली आहे. पाण्यासाठी त्यांनी केलेला विरोध अमानवी आहे.’
- सुरेश हाळवणकर, आमदार इचलकरंजी

 

Web Title: Kolhapur News warana water issue