वारणा योजनेप्रश्‍नी चर्चेऐवजी संघर्षाचे वळण घातक - प्रकाश आवाडे

पंडित कोंडेकर
सोमवार, 21 मे 2018

वारणा योजना मार्गी लागण्यासाठी सुरवातीपासून समन्वयाची भूमिका न घेता संघर्षाची भूमिका घेण्यात आली. दंडूकशाहीची भाषा वापरण्यात आली. यातूनच ग्रामीण भागातून या योजनेच्या विरोधात मोठा संघर्ष उभा राहिला आहे.

- प्रकाश आवाडे

इचलकरंजी - "वारणा योजना मार्गी लागण्यासाठी सुरवातीपासून समन्वयाची भूमिका न घेता संघर्षाची भूमिका घेण्यात आली. दंडूकशाहीची भाषा वापरण्यात आली. यातूनच ग्रामीण भागातून या योजनेच्या विरोधात मोठा संघर्ष उभा राहिला आहे. चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी त्याला जाणीवपूर्वक संघर्षाचे वळण दिले जात असून ते योजनेसाठी घातक आहे.""असा आरोप माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर आज पत्रकार परिषदेत केला. 

जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व खासदार राजू शेट्टी यांचा निषेध करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचेही श्री. आवाडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक विलास गाताडे, जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, पालिकेतील कॉंग्रेसचे पक्षप्रतोद सुनिल पाटील आदी उपस्थीत होते.

श्री. आवाडे म्हणाले, ""वारणा पाणी योजनेचा वाद समन्वयाने सोडवण्याची गरज होती. तसे अवघड कांही नव्हते, पण चर्चेतून हा वाद न सोडविता त्याला वेगळे वळण देण्याचे दुर्देवी चित्र सध्या शहरात सुरू आहे. यातून वारणा नदीचे पाणी पाहिजे की वारणा योजनेचे राजकारण पाहिजे हा प्रश्‍न सर्वांसमोर पडला आहे.""

श्री. आवाडे म्हणाले "" पंचगंगा नदीतून पाणी कमी पडल्यानंतर इचलकरंजी शहरासाठी कृष्णा योजना आम्ही राबवली. आता वारणा योजना पाहिजे, असा आक्रोश करणाऱ्या मंडळींनी या योजनेला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी त्यांचा विरोध मोडून आम्ही कृष्णेचे पाणी आणले. त्यामुळेच नागरिकांना मुबलक पाणी मिळाले."

Web Title: Kolhapur News Warana water issue