इचलकरंजीला वारणेतून पाणी योजनेचे उपसा केंद्र बदलणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

इचलकरंजी - इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा केंद्राच्या नव्या जागेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्वेक्षण करेल, तसेच कृष्णा योजना दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

इचलकरंजी - इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा केंद्राच्या नव्या जागेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्वेक्षण करेल, तसेच कृष्णा योजना दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

पाणीवाटपाच्या संघर्षातून दानोळी ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय झाला, तसेच दोन्ही बाजूंकडील साखळी आंदोलने थांबविण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. 

गेल्या १० वर्षांत दर वर्षी पाच टीएमसीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी चांदोली धरणात शिल्लक राहत असल्याने ते पाणी पिण्यास देण्यास हरकत नाही.
- श्री. सी. ए. बिराजदार, 

जलसंपदा विभागाचे सचिव 

इचलकरंजी शहराला वारणा नदीतून दानोळीजवळून पाणी देण्यास होत असलेल्या विरोधामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी दुसरी बैठक आज झाली. बैठकीला पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, आमदार सुजित मिणचेकर, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, महादेव धनवडे, विक्रांत पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विनय कोरे, नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी, जलसंपदा विभाग लाभक्षेत्र सचिव श्री. बिराजदार, पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, उपजिल्हाधिकारी श्री. काटकर, पाणीपुरवठा उपसचिव श्री. कानडे, नगरविकास कार्यासन अधिकारी निलेश पोतदार उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपसा केंद्रासाठी पर्याय सुचविला. त्यावर सर्वांचे एकमत झाले. बैठकीत दोन्ही बाजूने इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चार पर्याय समोर आले. त्यावर चर्चा झाली. कृष्णा-वारणा नदी संगमातून इचलकरंजीला पाणी देण्याचा तोडगा सर्वानुमते काढण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या पर्यायी पाणी उपसा केंद्राचा अहवाल १५ दिवसांत देऊन शासनाकडे मान्यतेसाठी सादर करतील, अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या.

नवी पाणी योजना मार्गी लागेपर्यंत कृष्णा योजना दुरुस्तीसाठी निधी देण्यास पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ मान्यता दिली. दानोळी ग्रामस्थांवर नोंद झालेले गुन्हेही मागे घेण्याची तयारी दर्शवत दोन्ही बाजूंनी सुरू असलेले आंदोलन आजच मागे घेण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

पिण्याच्या पाण्याला विरोध नाही. पण वारणा काठावरील दुष्परिणामसुद्धा विचारात घेऊन सर्वमान्य तोडगा काढा.
- विनय कोरे,
माजी मंत्री

पंचगंगा नदीचे बॅक वॉटर राजापूरपासून २८ किलोमीटर मागे जाते. पाण्याची पातळी १४ फूट राहत असल्यामुळे याच पर्यायाचा विचार करावा. 
- उल्हास पाटील,
आमदार

वारणा नदीतून पाणी उपसा करू शकणाऱ्या सर्व गावांना वारणेचे पाणी देण्यात यावे.
- राजू शेट्टी,
खासदार

इचलकरंजी योजनेमुळे दानोळीत वारणा कोरडी पडेल, असे पाटबंधारे, मजिप्राने सांगितल्यास आम्ही उपसा केंद्र बदलण्यास बदलण्यास तयार आहोत.
- सुरेश हाळवणकर,
आमदार

दानोळीत आनंदोत्सव
दानोळी - अमृत जल योजना दानोळी येथून रद्द झाल्याने वारणा बचाव कृती समितीच्या माध्यमातून वारणा काठच्या लढ्याला यश आले. दानोळीसह वारणा काठावरील गावांत फटाक्‍यांची आतषबाजी करून तसेच साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Web Title: Kolhapur News Warana water issue