मुद्दा एकच - पाणी माझ्याच हक्काचे !

संजय खूळ
शुक्रवार, 4 मे 2018

वस्त्रनगरी इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाखांवर गेली आहे. तेथील पाणीप्रश्‍न गंभीर आहे. त्यासाठी वारणेतून पाणी आणण्याचा निर्णय झाला. दुसऱ्या बाजूला भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असलेल्या शिरोळ तालुक्‍यातील वारणाकाठच्या गावांना नदीतील एक थेंबही पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. इचलकरंजी शहर आणि दानोळीसह इतर गावांतील लोक आज पाण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या प्रश्‍नाची नेमकी स्थिती काय, याचा आढावा घेणारी मालिका आजपासून.

पाणी मिळविण्यासाठी आणि गावाच्या कुशीत असलेल्यांना नदीतील पाणी न देण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असणारी गावे आणि शहर संघर्षाच्या वळणावर येऊन ठेपले आहेत. इचलकरंजीला पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्‍यकता आहे. शहराला पाणी दिल्यास भविष्यात पाणी संकट येईल, अशी भीती शिरोळ तालुक्‍याला वाटू लागली आहे. यातूनच पेटलेला पाणीप्रश्‍न कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्याला आत्मचिंतन करावयास लावणारा ठरला आहे.

इचलकरंजीने देशभरातील नागरिकांना सामावून घेतले आहे. येणाऱ्या प्रत्येकाला काम आणि दाम दिला आहे. येथे तयार झालेले कापड देश-विदेशांत नावलौकिक मिळवत आहे. पंचगंगेच्या कुशीत वसलेल्या शहराला पाण्यासाठी मात्र झळ सोसावी लागत आहे. शहराची लोकसंख्या तब्बल ३ लाख तर रोजगाराच्या निमित्ताने येणारे ५० ते ६० हजार नागरिक अशी लोकसंख्या सुमारे साडेतीन लाखांच्या घरात गेली आहे.

या सर्वांना शुद्ध आणि मुबलक पाणी हवे आहे. पंचगंगा प्रदूषित झाल्यानंतर कृष्णेचा आसरा घेतलेल्या शहराला तेथीलही पाणी बाधक ठरू लागले आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी पाण्यामुळेच अख्खं गाव वेठीस राहिले. एवढेच नव्हे, तर दूषित पाण्यामुळे हजारो नागरिकांना काविळीची बाधा झाली. ३४ नागरिकांना जीव गमवावा लागला. परिसराला उद्योगातून रोजीरोटी देणाऱ्या या शहराला आता शुद्ध आणि मुबलक पाण्यासाठी वारणेच्या पाण्याची गरज आहे. त्यासाठीच राज्य शासनाने शहरासाठी वारणेतून पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पास मंजुरी दिली.

भाजीपाल्यातून प्रगती केलेल्या शिरोळ तालुक्‍याला समृद्धतेचा वारसा आहे. कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगेचे वरदान लाभलेल्या तालुक्‍यातील काही गावे आता पाणीप्रश्‍नावर संघर्षासाठी पुढे येत आहेत. वारणेचे पाणी दुसरीकडे दिल्यास भविष्यात शेतीसाठी दूरच, पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची भीती येथील नागरिकांना आहे.

इचलकरंजीतील स्थिती...

  •     लोकसंख्या - ३ लाख
  •     दैनंदिन पाण्याची गरज - ६६ दशलक्ष लिटर
  •     कृष्णेतून उपलब्धता - ४० दशलक्ष लिटर
  •     पंचगंगेतून उपलब्धता - ९ दशलक्ष लिटर
  •     दैनंदिन पाण्याचा तुटवडा - १७ दशलक्ष लिटर
Web Title: Kolhapur News Warna River water issue