इचलकरंजीला पाणी देण्याच्या विरोधात दानोळीत आंदोलन 

राजकुमार चाैगुले
बुधवार, 2 मे 2018

कोल्हापूर - इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी पुरवठा करण्यास वारणा काठच्या गावांचा विरोध आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या नियोजित पाणी योजनेस विरोध करण्यासाठी दानोळीत (ता. शिरोळ) आज आंदोलन सुरु झाले आहे. दानोळी ग्रामस्थ पूर्ण शक्तीनीशी याला  विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

कोल्हापूर - इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी पुरवठा करण्यास वारणा काठच्या गावांचा विरोध आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या नियोजित पाणी योजनेस विरोध करण्यासाठी दानोळीत (ता. शिरोळ) आज आंदोलन सुरु झाले आहे. दानोळी ग्रामस्थ पूर्ण शक्तीनीशी याला  विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

पाणी पुरवठा योजनेचे हे काम सुरु होण्याची चर्चा सुरु झाल्याने सकाळी दहा वाजता संपूर्ण दानोळी गाव रस्त्यावर उतरले. तातडीने गाव बंद करुन गावातील सर्व रस्ते वाहतूकीस बंद करण्यात आले. गावात मोठा तणाव आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्यातून सुमारे साडेतीनशे पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यासह दानोळीकडे रवाना झाले आहेत. गावातील मुख्य चौकात जोरदार घोषणाबाजी सुरु असून उद्घाटनास अधिकारी आल्यास त्यांना गावात फिरकू न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. यातून गावात संघर्षाची चिन्हे आहेत. 

 

इचलकरंजीला वारणा नदीतून पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने नुकतीच अमृत योजना योजना मंजूर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचे ऑनलाईन उद्घाटनही केले आहे. यानंतर येत्या दोन दिवसात योजनेचे काम सुरु होण्याच्या हालचाली सुरु झाल्याने ग्रामस्थांनी काल ( 1 मे) रोजीच एक विशेष सभा घेवून या योजनेला कडक विरोध करण्याचे ठरविले होते. या योजनेला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा काठावरील गावांनीही ही विरोध केला आहे. हे काम आज(बुधवार) सकाळी सुरु होण्याच्या हालचाली होत्या. हे लक्षात येताच सकाळी नऊच्या दरम्यान गावातील भोंगे वाजवून ग्रामस्थ एकत्र करण्यात आले. दहाच्या सुमारास गावातील मुख्य शिवाजी चौकात संपूर्ण ग्रामस्थ एकत्र झाले. या वेळी या योजनेच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. याच दरम्यान ग्रामस्थांनी गाव बंदची घोषणा केली. गावाकडे येणारे सर्व रस्ते दगड टाकून व टायर पेटवून बंद करण्यात आले. गावातील परिस्थिती लक्षात घेवून जयसिंगपूरहून सुमारे साडेतीनशे पोलिसांचा फौजफाटा दानोळीकडे रवाना केला आहे. 
 

Web Title: Kolhapur News warna water distribution issue