उचललेल्या कचऱ्याची माहिती ॲपवर

मोहन मेस्त्री
गुरुवार, 31 मे 2018

कोल्हापूर - कोल्हापुरात ठिकठिकाणी ठेवलेले कोंडाळे (कंटेनर) कचऱ्याने भरून वाहत असतात. या कोंडाळ्यातील कचरा आर. सी. व्हॅनद्वारे उचलून नेला जातो. अनेकदा काही भागांत आर. सी. व्हॅन पोचत नाही आणि कचऱ्याने वाहणाऱ्या कोंडाळ्याजवळ नाक धरण्याशिवाय पर्यायच राहत नाही.

कोल्हापूर - कोल्हापुरात ठिकठिकाणी ठेवलेले कोंडाळे (कंटेनर) कचऱ्याने भरून वाहत असतात. या कोंडाळ्यातील कचरा आर. सी. व्हॅनद्वारे उचलून नेला जातो. अनेकदा काही भागांत आर. सी. व्हॅन पोचत नाही आणि कचऱ्याने वाहणाऱ्या कोंडाळ्याजवळ नाक धरण्याशिवाय पर्यायच राहत नाही. याच्या तक्रारी नागरिकांतून सतत होत असतात. त्या निवारण्यासाठी महापालिकेने ‘कंटेनर ट्रॅकिंग सिस्टीम’ नावाचे ॲप तयार केले आहे.

हे ॲप आर. सी. वाहनांतील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर दिलेले आहे. कचरा उठावापूर्वीचा आणि कचरा उचलल्यानंतरचा फोटो या ॲपवर अपलोड करण्याची यंत्रणा राबविली आहे. यामुळे कोणी कोठे कसा कचरा उचलला याची माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे.

राज्याला पथदर्शी ठरेल असा उपक्रम कोल्हापूर महापालिकेने सुरू केला आहे. शहरातील आरोग्य कर्मचारी घंटागाडीद्वारे नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करतात. हा कचरा प्रभागात असलेल्या पाच ते सहा कचराकुंडीत (कंटेनर) टाकतात. मात्र प्रत्यक्षात या कंटेनरमधील कचरा उचललाच जात नव्हता. त्यावर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने ॲप तयार करण्याचे ठरले.

कचरा उचलण्यासंबंधातील ॲप वापरण्यात येत असल्याने समस्या निकाली निघाली आहे. राज्यातील इतर पालिकांसाठीसुद्धा हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. 
-सोनाली जगताप-पाटील, 
ॲप डिझायनर

ॲपनुसार कचरा उचलण्याचे काम अकरा गाड्यांच्या साह्याने तीन शिफ्टमध्ये होते. ॲपमुळे कचरा उठावाच्या तक्रारी संपल्या आहेत.
- डॉ. विजय पाटील, आरोग्याधिकारी

Web Title: Kolhapur News waste collection information on App